१९८४ ची दंगल घडून गेली हे मी शीख बांधवांच्या जखमांवर मीठ चोळण्यासाठी बोललो नव्हतो. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. जर माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगीर आहे असं म्हणत सॅम पित्रोडा यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे. काँग्रेस नेते सॅम पित्रोडा यांनी गुरूवारी एका पत्रकाराने १९८४ च्या दंगलीचा आदेश त्यावेळी पंतप्रधान कार्यालयातून आला होता त्याबाबत काय म्हणणं आहे असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना दंगलीचं काय घेऊन बसलात? ती होऊन गेली असं वक्तव्य सॅम पित्रोडा यांनी केलं. १९८४ च्या वेळी जे झालं ते वाईट झालं असं मला म्हणायचं होतं. मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला ते पूर्णपणे बदलण्यात आलं असा आरोप करत सॅम पित्रोडांनी या वादाचं खापर मीडियावर फोडलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सॅम पित्रोडा यांनी हे वक्तव्य केल्यानंतर पुन्हा भाजपाच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीकेचे आसूड ओढले. इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सॅम पित्रोडा यांच्यावर टीका करत काँग्रेसला शीख बांधवांचे जे बळी गेले त्याबाबत काहीही वाटत नाही का? असा प्रश्न विचारला. सॅम पित्रोडा यांच्या एका वक्तव्यानंतर वाद पेटल्याने काँग्रेसनेही सॅम पित्रोडांची साथ दिली नाही. सॅम पित्रोडा यांचं १९८४ च्या दंगलीबाबत ते व्यक्तीगत मत होतं ते काँग्रेस पक्षाचं मत नाही असं स्पष्टीकरण काँग्रेसनं दिलं. ज्यानंतर आता आपल्याला तसं म्हणायचं नव्हतं असं म्हणत सॅम पित्रोडा यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे.

१९८४ ची दंगल झाली, त्याबाबत बोलू नका मोदींना विकासासाठी, रोजगारनिर्मितीसाठी जनतेने निवडून दिले आहे. मोदी याबाबत काहीही भाष्य का करत नाहीत? दंगलीचं काय घेऊन बसलात ती दंगल तर घडून गेली. असं वक्तव्य सॅम पित्रोडांनी केलं होतं. या वक्तव्यावर सर्वच स्तरातून टीका झाली. शीख बांधवांच्या भावना दुखावल्यानंतर मात्र सॅम पित्रोडा यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं म्हटलं आहे. तसंच मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असंही म्हटलं आहे. या वादावर पडदा टाकण्याचा पूर्ण प्रयत्न सॅम पित्रोडांकडून झाला आहे. मात्र भाजपाकडून या उत्तराचा समाचार घेतला जातो आहे आणि घेतला जाईल यात शंका नाही.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The statement i made was completely twisted says sam pitroda