Stray Dogs Attack: ‘वाघ बकरी चहा’ समूहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई अहमदाबाद मधील त्यांच्या घराजवळ सकाळी वॉक साठी गेले असता त्यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. ज्यामुळे त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली. त्यानंतर प्रकृती अधिक खालावल्याने रविवारी त्यांनी अहमदाबाद येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. अलीकडे भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत चालली आहे. अनेकदा ही भटकी कुत्री गटागटाने फिरत असतात. माणसं आणि इतर प्राण्यांवरही हल्ला करतात. महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांसह दुचाकीस्वारांनाही त्यांचा त्रास सहन करावा लागतो आहे. अलीकडच्या काळात पाळीव प्राण्यांनी माणसांवर हल्ला केल्याच्या अनेक घटनाही चर्चेत आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका अहवालानुसार, देशात १ कोटीहून अधिक पाळीव कुत्रे आहेत, तर भटक्या कुत्र्यांची संख्या सुमारे ३.५ कोटींच्या घरात आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो डेटानुसार, २०१९ मध्ये देशात कुत्रा चावण्याच्या ४,१४६ घटना घडल्या, परिणामी माणसांचा मृत्यू झाला. आणखी एका डेटानुसार, २०१९ पासून, देशात कुत्रा चावण्याच्या १.५ कोटीहून अधिक प्रकरणे आढळली आहेत. उत्तर प्रदेशामध्ये सर्वाधिक २७.५२ लाख प्रकरणे आढळली, त्यानंतर तामिळनाडू (२०.७ लाख) आणि महाराष्ट्र (१५.७५ लाख) या राज्यातही कुत्रा चावण्याच्या घटना घडल्या असल्याचे वृत्त एका इंग्रजी वेबसाइट्सने प्रकाशित केले आहे.

(हे ही वाचा : डाॅक्टर इंजेक्शन देताना तुमच्या हाताच्या दंडावर अन् कंबरेवरच का टोचतात? ‘हे’ आहे यामागील खरं कारण )

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याला जबाबदार कोण?

भटके कुत्रे वेडे, दुखापत, भुकेले किंवा त्यांच्या पिल्लांचे संरक्षण करणारे असू शकतात. अशा परिस्थितीत, कुत्र्यांना त्रास दिल्यास किंवा त्यांना भिती जाणवल्यास ते हिंसक होऊन हल्ला करू शकतात. याशिवाय, काही प्रकरणांमध्ये कुत्रे सतत भूंकू शकतात. तर काही कुत्रे चावल्यामुळे रेबीज होऊ शकतो. सरकार आणि प्राणी कल्याण संस्थांच्या दुर्लक्षामुळे भटक्या कुत्र्यांचे हल्ले देशात मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्यात सरकार अपयशी ठरले आहे. प्राणी कल्याण संस्था आणि नागरी समाज गटांचा दृष्टिकोन उदासीन आणि दुर्लक्षित राहिला आहे.

कायदा काय म्हणतो?

कायद्यानुसार, रस्त्यांवरून कुत्रे हटवणे बेकायदेशीर असून कुत्र्यांना रस्त्यावर राहण्यापासून कोणी रोखू शकत नाही. कुत्र्याला दत्तक घेतलं जाईपर्यंत त्याला रस्त्यावर राहण्याचा अधिकार आहे. भारतात २००१ पासून कुत्र्यांना मारण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने २००८ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या उपद्रवी कुत्र्यांच्या मारण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.

भारतीय राज्यघटनेच्या कलम ५१A(G) मध्ये असे नमूद केले आहे की, वन्यजीवांचे संरक्षण करणे आणि सर्व सजीवांबद्दल सहानुभूती बाळगणे हे भारतातील प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे. भटक्या कुत्र्यांना खायला देणे हे कोणत्याही समाजात कायदेशीर आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी नागरिक आपल्या भागातल्या भटक्या कुत्र्यांना खाऊ घालू शकतात असं नमूद केलं होतं. सर्वाेच्च न्यायालयानेही तो आदेश कायम ठेवला होता.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why stray dogs attack what laws say regarding dogs and who is responsible for such attacks pdb
First published on: 27-10-2023 at 14:21 IST