भारतातील आघाडीची एअरलाइन्स कंपनी विस्तारा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. विस्तारा एअरलाइन्सची अनेक उड्डाणे आज (२ एप्रिल २०२४) पुन्हा रद्द करण्यात आली आहेत. आता नागरी उड्डाण मंत्रालयाने विमान कंपनीला मोठ्या प्रमाणात उड्डाण रद्द आणि विलंबाबाबत तपशीलवार अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. सोमवारी (१ एप्रिल) देखील विस्ताराने वैमानिकाच्या कमतरतेमुळे ५० हून अधिक उड्डाणे रद्द केली होती. आता नागरी उड्डाण मंत्रालयाने गेल्या आठवड्यात रद्द झालेल्या आणि तासाभराने उशीर झालेल्या १०० हून अधिक उड्डाणांबाबत उत्तरे मागवली आहेत. आजही सुमारे ७० उड्डाणे रद्द होण्याची शक्यता आहे. विस्ताराला गेल्या काही काळापासून वैमानिकांची कमतरता आणि ऑपरेशनल समस्यांचा सामना करावा लागत आहे. सातत्याने उड्डाणे रद्द होत असल्याने प्रवाशांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने विस्ताराकडून विमान रद्द आणि विलंबाबाबत सविस्तर अहवाल मागवला आहे.’

विस्ताराची उड्डाणे रद्द का होत आहेत?

विमान कंपनीला काही काळापासून अडचणींचा सामना करावा लागत आहे. याचे कारण म्हणजे कंपनीच्या A320 एअरबसमधील कर्मचारी नवीन करारांतर्गत त्यांच्या पगारात कपात करण्यास विरोध दर्शवत आहेत. गेल्या काही दिवसांपासून एअरलाइन्सकडून विमान रद्द करणे आणि विलंब होण्याचे प्रमाण वाढले आहे. याची अनेक कारणे आहेत, तसेच क्रू मेंबर्सची अनुपलब्धता हेदेखील एक प्रमुख कारण आहे, असंही विस्ताराच्या प्रवक्त्याने मान्य केलेय. मंगळवारी सकाळी प्रमुख शहरांमधून विस्ताराने किमान ३८ उड्डाणे रद्द केली आहेत. रद्द करण्यात आलेल्या उड्डाणांमध्ये मुंबईतील १५ उड्डाणे, दिल्लीतील १२ उड्डाणे आणि बंगळुरूतील ११ उड्डाणांचा समावेश आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, काल विस्ताराची ५० उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत आणि आणखी १६० उड्डाणांना विलंब झाल्याचीही माहिती मिळाली आहे. अनेक प्रवाशांनी विस्ताराने उड्डाणांना विलंब केल्यामुळे आणि काही उड्डाणे रद्द केल्यामुळे एक्सवर नाराजी व्यक्त केली आहे. इन्फोसिसचे माजी मुख्य आर्थिक अधिकारी (CFO) मोहनदास पै त्यांच्यापैकी एक आहेत, ज्यांनी बंगळुरू ते अहमदाबादला पोहोचण्यास उशिरा झालेल्या विस्तारा विमानाबद्दल आपला संताप व्यक्त केला आहे. लेखक आणि इतिहासकार विक्रम संपत यांनी शेवटच्या क्षणी त्यांचे उड्डाण रद्द केल्यानंतर सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. एका प्रवाशाने एअरलाइन्सवर कठोरपणे टीका केली आणि X वर “#Vistara #UK827” हॅशटॅगसह एक लांब मेसेज पोस्ट केला. “मुंबई ते चेन्नई विमानाला ५ तासांपेक्षा जास्त उशीर झाला आणि अद्याप त्याचे कारण समोर आलेले नाही. विस्ताराची अवस्था अत्यंत दयनीय आहे,” अशीही एका युजर्सने तक्रार केली आहे. विस्ताराने आपल्या ग्राहकांना बोर्डिंग गेटवर तासनतास वाट पाहायला लावायची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या महिन्यात वैमानिकांच्या कमतरतेमुळे दिल्ली आणि मुंबईतील विमानतळांवर विमानांचे कामकाज विस्कळीत झाले होते, तेव्हा विमान कंपनीला अशाच संकटाचा सामना करावा लागला होता.

वैमानिकांच्या अनुपलब्धतेमुळे विस्तारा अडचणीत?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एअरलाइनने त्यांच्या A320 एअरबसच्या अधिकाऱ्यांबरोबर नवीन करार केला आहे. या करारानंतर त्यांचे पगार कमी होण्याची शक्यता असल्याने वैमानिकांमध्ये नाराजी आहे. विस्ताराच्या प्रवक्त्याने सांगितले की, आमच्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी टीम सतत काम करीत आहे. त्यामुळे आमच्या नेटवर्कमधील कनेक्टिव्हिटीसाठी आम्ही आमच्या विमानांच्या उड्डाणांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, एअर इंडियामध्ये विस्तारा विलीन झाल्यानंतर पगारात कपात केल्याबद्दल विस्तारामधील वैमानिकांमध्ये नाराजी आहे. सुधारित वेतन रचना वैमानिकांना मेल करण्यात आली होती, ज्यांना त्यावर स्वाक्षरी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. वैमानिकाने तसे न केल्यास त्यांना विलीनीकरणातून वगळण्यात येईल, असेही सांगण्यात आले होते. त्याचा निषेध करण्यासाठी वैमानिक कर्तव्यावर येण्यापासून कारणं देत आहेत, त्यामुळे क्रू मेंबर्सची कमतरता जाणवते आहे. या सुधारणेमुळे विस्तारा वैमानिकाच्या पगारात ५० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे,” असे आणखी एका वैमानिकाने सांगितले. उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या पगारात सुमारे ९० हजार ते १ लाख रुपयांची घट झाली आहे, असे नाव न सांगण्याच्या अटीवर एका वैमानिकाने सांगितले. अनेक वैमानिक सध्या मिळत असलेल्या पगारावर नाराज आहेत. त्यांना ४० फ्लाइंग तासांसाठी पैसे दिले जात आहेत, ज्यामुळे वैमानिकांना सध्याच्या पगारापेक्षा कमी पगार मिळतो आहे, असंही दुसऱ्या एका वैमानिकाने सांगितले.

हेही वाचाः विश्लेषण: शांत, युद्धविरोधी जपानकडून विध्वंसक शस्त्रे निर्यात पुन्हा का सुरू होतेय?

एअर इंडिया आणि विस्तारा एअरलाइन्सचे विलीनीकरण

विस्तारा एअरलाइन्स ही टाटा समूहाची कंपनी आहे. एअर इंडिया आणि विस्तारा एअरलाइन्सच्या विलीनीकरणाअंतर्गत दोन्ही कंपन्यांच्या क्रू मेंबर्सला समान वेतन रचनेत आणण्याची योजना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन करारामध्ये विस्ताराच्या वैमानिकांना ४० तासांच्या उड्डाणासाठी निश्चित पगार मिळणार आहे. मात्र, त्यांनी जादा विमान उड्डाण केल्यास त्यांना वेगळा पगार मिळेल. सध्या विस्तारा वैमानिकांना ७० तासांच्या उड्डाणासाठी पगार देते. मात्र नवीन पगार रचनेनंतर विस्तारा वैमानिकांमध्ये नाराजी आहे, कारण त्यामुळे त्यांचा पगार कमी होणार आहे.

हेही वाचाः अरविंद केजरीवाल यांना १४ दिवस तुरुंगात राहावे लागणार; तिहारमध्ये काय मिळणार? कोणाला भेटण्याची परवानगी?

भाडे परताव्याबाबत कंपनीने काय म्हटले?

तसेच एअरलाइनने सध्या सुरू असलेल्या उड्डाणातील अडचणीबद्दल प्रवाशांची माफी मागितली आहे, परंतु यावेळी रद्द केलेल्या उड्डाणांची संख्या उघड करण्यास नकार दिला. ज्या प्रवाशांना समस्या आल्या आहेत त्यांना इतर उड्डाण पर्याय किंवा परतावा दिला जात आहे आणि कोणत्याही गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत, असंही विस्ताराने सांगितले आहे. एएनआयच्या म्हणण्यानुसार, नागरी उड्डाण मंत्रालयाने (एमओसीए) विस्ताराकडून फ्लाइट रद्द करणे आणि मोठ्या विलंबाबाबत तपशीलवार अहवाल मागितला आहे. नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही विमान कंपनीला प्रवाशांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी काय पावले उचलत आहेत, याची विचारणा केली आहे. प्रवाशांना विमानतळाकडे जाण्यापूर्वी विमान कंपनीकडे त्यांच्या विमानाची स्थिती तपासण्याचा सल्ला दिला जातो आहे.