दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कायदेशीर अडचणी दिवसागणिक वाढताना दिसत आहेत. कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी (१ एप्रिल) त्यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अटक केली होती. तेव्हापासून ते केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीच्या फेऱ्यात आहेत. ईडीने आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची पुढील कोठडी मागितली नसल्याने दिल्ली न्यायालयाने त्यांना पुढील १४ दिवसांसाठी तुरुंगात पाठवले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कथित मद्य घोटाळ्यातील सूत्रधार असल्याचा आरोप आहे. कोर्टात हजर होण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवादही साधलाय. जे पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत, ते देशासाठी चांगले नाही, असंही ते म्हणाले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या तिहार तुरुंगात आणण्यात आले आहे, जिथे ते पुढील दोन आठवडे राहणार आहेत. मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन आणि संजय सिंह यांसारखे ‘आप’चे इतर ज्येष्ठ नेतेही याच तुरुंगात आहेत. मुख्यमंत्री केजरीवाल यांचे तुरुंगातील दिवस कसे असतील? हे जाणून घेऊ यात.
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात कुठे ठेवणार?
मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल तिहारच्या तुरुंग क्रमांक २ मध्ये राहणार आहेत. त्यांना दुपारी उशिरा राऊस अव्हेन्यू न्यायालयातून कारागृहात आणण्यात आले. त्यांचे सहकारी आणि माजी उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना तुरुंग क्रमांक १ मध्ये ठेवण्यात आले आहे, तर राज्यसभा खासदार संजय सिंह यांना तुरुंग क्रमांक ५ मध्ये ठेवले आहे, अशी माहिती NDTV ने दिली आहे. दिल्लीचे माजी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन तुरुंग क्रमांक ७ मध्ये आहेत. भारत राष्ट्र समिती (BRS) नेत्या के कविता तिहारच्या महिला विभागातील तुरुंग क्रमांक ६ मध्ये आहेत. दिल्लीत मद्य परवाने मिळवण्यासाठी AAP ला कथितपणे लाच देणाऱ्या ‘दक्षिण ग्रुप’चा भाग असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. जैन वगळता आपच्या इतर सर्व नेत्यांना दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ईडीने आपवर लाच घेतल्याचा आरोप केला आहे.
हेही वाचाः जीमेलची सुरुवात आणि एप्रिल फूल कनेक्शन तुम्हाला माहित्येय का?
अरविंद केजरीवाल यांचा तिहारमधील दिनक्रम कसा असणार?
तिहारमध्ये केजरीवाल यांचा दिवस सकाळी ६.३० वाजता चहा आणि नाश्त्यासाठी ब्रेडने सुरू होणार आहे. एनडीटीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार, आंघोळीनंतर सुनावणीसाठी ते न्यायालयात रवाना होतील किंवा त्यांच्याशी कायदेशीर टीम चर्चा करेल. दुपारचे जेवण सकाळी १०.३० ते ११ च्या दरम्यान दिले जाते आणि त्यात एक भाजी, डाळ आणि पाच रोट्या किंवा भात असतो. कैद्यांना दुपारी ३ वाजेपर्यंत त्यांच्या कोठडीत राहावे लागते, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. दुपारी ३.३० वाजता चहा-बिस्किटे खाल्ल्यानंतर ४ वाजता कैद्यांना त्यांच्या वकिलांना भेटण्याची मुभा दिली जाते. रात्रीचे जेवण संध्याकाळी ५.३० वाजता असते आणि कैदी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत त्यांच्या तुरुंगात बंदिस्त असतात.
करमणुकीसाठी कैद्यांना संध्याकाळी ५ ते ११ या वेळेत दूरदर्शन पाहण्याची सुविधा आहे, असे इंडिया टुडेने सांगितले आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, टीव्हीमध्ये बातम्या, मनोरंजन आणि खेळांसह सुमारे १८-२० चॅनेल आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आठवड्यातून दोनदा भेटू शकतात, ज्यांची नावे तुरुंगाच्या सुरक्षेने मंजूर केलेल्या यादीत आहेत.
केजरीवाल यांनी तुरुंगात काय मागणी केली?
केजरीवाल यांच्या वकिलांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या वतीने न्यायालयात पाच विनंत्या केल्या आहेत. त्यांनी रामायण, श्रीमद भगवद्गीता हे दोन ग्रंथ आणि पत्रकार नीरजा चौधरी यांचे How Prime Ministers Decide हे पुस्तक केजरीवालांना तुरुंगात वाचण्यासाठी ठेवण्याची परवानगी मिळावी, यासाठी अर्ज केला आहे. पत्रकारांच्या पुस्तकात भारताच्या सहा पंतप्रधानांच्या कार्यकाळाचा आणि त्यांनी कसे मोठे निर्णय घेतले याची माहिती दिली आहे. हे सहा पंतप्रधान म्हणजे इंदिरा गांधी, राजीव गांधी, विश्वनाथ प्रताप सिंग, पी व्ही नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी वाजपेयी आणि मनमोहन सिंग आहेत. केजरीवाल यांनी परिधान केलेले धार्मिक लॉकेटही त्यांच्याबरोबर कायम ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे.त्यांनी तुरुंगात एक टेबल आणि खुर्चीसुद्धा मागणी केली आहे, असे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. त्यांच्या वकिलांनीही मुख्यमंत्र्यांना मधुमेहाचा त्रास असल्याने त्यांना विशेष आहार देण्याची विनंती केली आहे. त्यांनी केजरीवाल यांना औषधे देण्यासही सांगितले आहे. आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी २४/७ तुरुंगात उपलब्ध असतात. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, तुरुंगात असताना केजरीवाल यांची नियमित तपासणी केली जाणार आहे.
सुनीता यांची केजरीवालांच्या न्यायालयीन कोठडीवर प्रतिक्रिया
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीत पतीला तुरुंगात टाकण्याचा भाजपाचा महत्त्वाचा हेतू असल्याचा आरोप केला. ईडीचा तपास पूर्ण झाला आहे आणि न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले नाही, मग त्यांनी तरीही त्यांना तुरुंगात का ठेवले? लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना तुरुंगात ठेवणे एवढेच त्यांचे उद्दिष्ट आहे,” असे सुनीता यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. तुरुंगात असतानाही केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री राहतील. ११ दिवस चौकशी करूनही ईडीला काहीही सापडले नाही. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. भाजपा आणि त्यांच्या ईडीचा हेतू त्यांना अटक करणे आणि दिल्लीतील आम आदमी पक्षाचा पाडाव करण्याचा आहे, असंही ज्येष्ठ आप नेत्या जस्मिन शाह म्हणाल्या. कालच आमच्या एका आमदाराशी भाजपाच्या एका सदस्याने दयालपूरमधील जाहीर सभेत संपर्क साधला आणि भाजपामध्ये सामील होण्यासाठी २५ कोटी रुपयांची ऑफर दिली होती,” असाही त्यांनी आरोप केला. अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री राहतील आणि तुरुंगातून सरकार चालवतील. ते मुख्यमंत्री म्हणून कर्तव्ये पार पाडू शकत नाहीत, असा कोणताही कायदा नाही,” असेही शाह म्हणाल्यात. दिल्ली भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले की, “दिल्लीची जनता दिल्लीला लुटणाऱ्यांना बघून घेईल, अशी आशा आहे.”