पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी पर्यटकांवर झालेल्या नृशंस हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील दहशतवादाइतकीच चर्चा पाकिस्तानी लष्कराबाबतही सुरू झाली. काश्मीर खोऱ्यात पलीकडून घुसखोरी करणारे दहशतवादी हे नेहमीच पाकिस्तानी लष्करामार्फत प्रशिक्षित, पुरस्कृत आणि समर्थित असतात हे उघड आहे. पण पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल असिम मुनीर यांनी या हल्ल्याच्या आधी काही दिवस केलेले वक्तव्य चर्चेत आले. ‘काश्मीर ही आमची जीवनदायी नस आहे’ असे मुनीर म्हणाले होते. त्या विधानामुळे दहशतवाद्यांची भीड चेपली आणि त्यांनी निःशस्त्र पर्यटकांवर हल्ला केला, असे मानले जाते. पाकिस्तानच्या इतिहासात अनेक जनरलनी यापूर्वी भारताचा दुःस्वास केला आणि प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हल्ले केले. परंतु असिम मुनीर तुलनेने वलयात कमी राहतात, पण इतर लष्करप्रमुखांपेक्षा अधिक जिहादी मनोवृत्तीचे मानले जातात. त्यामुळे त्यांच्यापासून अधिक सावध राहिले पाहिजे, असे येथील विश्लेषकांना वाटते.
कोण आहेत असिम मुनीर?
असिम मुनीर यांचे वडील फाळणीनंतर भारतातील जालंधर येथून पाकिस्तानात रावळपिंडीला वास्तव्यास आले. ते एका शाळेत मुख्याध्यापक होते तसेच स्थानिक मशिदीचे इमामही होते. त्यांच्याकडूनच असिम मुनीर यांना धार्मिक शिक्षणाचे बाळकडू मिळाले असावे. मुनीर यांचे प्राथमिक शिक्षण मर्काझी मदरसा दारुल तजवीद येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी मांगला येथील ऑफिसर्स ट्रेनिंग स्कूल येथे प्रशिक्षण घेऊन सैन्यात प्रवेश केला. मितभाषी मुनीर अनेक बाबतींत वेगळे ठरतात. त्यांच्याआधीचे बहुतेक पाकिस्तानी लष्करप्रमुख अबोटाबाद येथील पाकिस्तान मिलिटरी अॅकॅडमीत प्रशिक्षण घेऊन सैन्यात भर्ती झाले होते. शिवाय मुनीर यांनी कधीही पाश्चिमात्य देशांमध्ये काम केले नाही किंवा अमेरिकी वा ब्रिटिश लष्करी संस्थांमध्ये प्रशिक्षणही घेतले नाही. पाकिस्तानी लष्करात ते फ्रंटियर फोर्स रेजिमेंटच्या एका बटालियनमध्ये दाखल झाले.
‘मुल्ला जनरल’
झिया उल हक पाकिस्तानचे लष्करशहा असताना त्यांनी पाकिस्तानी लष्कराला जिहादी रूप देण्याचा प्रयत्न केला. भारताशी निव्वळ लष्करी युद्ध किंवा छुपे युद्ध लढले जाऊ नये. त्यास धर्मयुद्धाची जोड मिळाली पाहिजे, असा झिया उल हक यांचा आग्रह होता. त्याच काळात म्हणजे १९८६मध्ये असिम मुनीर पाकिस्तानी लष्करात दाखल झाले. त्यावेळच्या अनेक अधिकाऱ्यांप्रमाणे मुनीर यांच्यावरही इस्लामी वर्चस्ववादाचा प्रभाव होता. त्यांनी धार्मिक ग्रंथांचे वाचन केले होते. सौदी अरेबियात लष्करी प्रतिनिधी म्हणून काम करत असताना मुनीर यांनी संपूर्ण कुराण तोंडपाठ म्हणून दाखवले होते. त्याबद्दल त्यांना हाफीझ-ए-कोरान हा किताबही देण्यात आला. त्यांच्या अनेक भाषणांमध्ये इस्लामचे दाखले, कुराणातील वचने यांचा समावेश असतो. पाकिस्तानच्या निर्मितीसाठी निर्णायक ठरलेला धर्माधिष्ठित द्विराष्ट्रवाद या सिद्धान्ताचे ते खंदे पुरस्कर्ते आहेत. त्यांच्या काही दिवसांपूर्वीच्या वादग्रस्त भाषणातही त्यांनी समोर उपस्थित अनिवासी परदेशस्थ पाकिस्तानींना उद्देशून सांगितले, की इस्लाममध्ये धर्माच्या आधारावर आजवर दोनच राष्ट्रांची निर्मिती झाली. त्यांतील एक म्हणजे रियासत-ए-तैय्यबा किंवा रियासत-ए-मदिना, ज्याची निर्मिती खुद्द प्रेषित मोहम्मद यांनी केली. दुसरे राष्ट्र अल्लाने १३०० वर्षांनंतर निर्माण केले, ते म्हणजेच तुमचा पाकिस्तान! फेब्रुवारी महिन्यात त्यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये मुझफ्फराबादला भेट दिली होती. त्याही वेळी त्यांनी काश्मीरला ज्युग्युलर व्हेन अर्थात जीवनदायी नस असे संबोधले. ही नस तोडली तर जीवन संपते असा इशारा त्यांनी दिला. धर्म आणि श्रद्धेचा आधार घेऊन अल्लाच्या मार्गावर निघालेले धर्मयोद्धे नेहमीच विजयी होतात, असे त्यांनी सांगितले.
‘ते’ भाषण
१५ एप्रिल रोजी इस्लामाबादमध्ये परदेशस्थ पाकिस्तानींच्या सभेत बोलताना मुनीर यांनी म्हटले, की काश्मीर आमची जीवनदायी नस आहे. आमच्या काश्मिरी बंधूंची साथ कधीही सोडणार नाही. हिंदू आणि मुस्लिम ही वेगवेगळी राष्ट्रे आहेत. आमच्या संस्थापकांनी पाकिस्तानची निर्मिती करताना याचाच आधार घेतला. आमचा धर्म वेगळा, आमची भाषा वेगळी, आमचे रितीरिवाज वेगळे, आमची महत्त्वाकांक्षा वेगळी… हे नवीन पिढीच्या ध्यानात नीट राहिले पाहिजे. आपण आपल्या तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या पिढीला हे सांगा. पाकिस्तान म्हणजे काय, संस्थापकांना अपेक्षित काय होते हे सांगा, अशी विधाने मुनीर यांनी त्या भाषणात केली होती.
झिया, मुशर्रफ यांच्यापेक्षा धोकादायक?
झिया उल हक, परवेझ मुशर्रफ, याह्या खान, आयुब खान हे लष्करप्रमुख पुढे बंड करून पाकिस्तानचे शासकही बनले. प्रत्येकाने वेगवेगळ्या भूमिकेतून भारताशी शत्रुत्व मांडले. परंतु हे सगळे जनरल किंवा पाकिस्तानचे अलीकडले लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी भारताशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे चर्चेचा मार्ग खुला ठेवला होता. शिवाय ते मुनीर यांच्याप्रमाणे मितभाषी आणि आतबट्ट्याचे नव्हते. मुनीर यांच्यासमोर अस्तित्वाचा प्रश्न उभा आहे. बलुचिस्तान, अफगाण सीमा या भागांमध्ये पाकिस्तानी लष्कराला मोठी मनुष्यहानी सोसावी लागत आहे. इम्रान खान यांना प्रदीर्घ काळ तुरुंगात ठेवण्यास ते कारणीभूत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे खुर्ची टिकवण्यासाठी काही तरी करणे त्यांना भाग आहे. यासाठीच दहशतवादाचे पुनरुज्जीवन करण्याचा मार्ग त्यांनी पत्करला. ते आधीच्या जनरलपेक्षा अधिक कडवे जिहादी आहेत ही बाब त्यांना अधिक धोकादायक ठरवते.
© The Indian Express (P) Ltd