सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरांच्या नामांतराची लाटच आली आहे. उस्मानाबाद, औरंगाबाद पाठोपाठ आता अलिबागच्याही नामांतराचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून अलिबागचे नाव ‘मायनाक नगरी’ करण्याची मागणी केली आहे. मायनाक भंडारी यांनी स्वराज्याच्या रक्षणात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मराठा नौदलाच्या इतिहासात त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण होते. त्यामुळे अलिबागचे नाव बदलून त्यांचे नाव या शहराला देण्यात यावे अशी मागणी आहे. असे असले तरी, खुद्द अलिबाग मधून मात्र या मागणीला विरोध होत आहे. याच पार्श्वभूमीवर अलिबाग हे नाव कसे पडले? आणि हा अली कोण होता? आणि त्याच्या समाजाचा आणि अलिबाग या भागाचा नेमका संबंध काय या विषयी जाणून घेणे महत्त्वाचे ठरावे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अधिक वाचा: इस्रायलमध्ये स्थलांतर भारतीय ज्यूंसाठी (बेने इस्रायली) सोपे का नव्हते?

अलिबाग हे कोकण किनारपट्टीवरील एक महत्त्वाचे शहर आहे. अलिबाग हे उत्तरेकडे समुद्राने वेढलेले असून शहराच्या दक्षिणेला कुंडलिका नदी आणि रोहा आहे तर पूर्वेकडे अंबा नदी आणि नागोठाणा गाव आहे. मुंबईच्या जवळील स्थळ म्हणून अलिबाग हे पर्यटकांच्या विशेष आकर्षणाचे केंद्र आहे. शिवाय, गर्भश्रीमंतांचे बंगलेही अलिबाग किनारीच वसलेले आहेत. त्यात अनेक सेलिब्रिटिजचाही समावेश होतो. अलिबागमध्ये रेवदंडा, चौल, नागाव, आक्षी, वरसोली, थळ, नवगाव, किहीम आणि आवास या गावांचा समावेश होतो. त्यांना एकत्रितपणे ‘अष्टागार’ (आठ गावे) म्हणून ओळखले जात होते. अलिबागमध्ये हिंदू, मुस्लिम, पोर्तुगीज- ख्रिश्चन, बेने इस्रायल ज्यू आणि पारशी यांसारखे अनेक समुदाय प्राचीन काळापासून वास्तव्यास आहेत.

अलिबाग नावाची व्युत्पत्ती

अलिबागच्या नावाला ऐतिहासिक संदर्भ आहे. ‘अली’ हे एका व्यक्तीचे नाव आहे तर बाग म्हणजे बगीचा. याचा अर्थ ‘अलीची बाग’ असा होतो. असे म्हटले जाते की हे नाव अली/ एली नावाच्या एका श्रीमंत बेने इस्रायली व्यक्तीच्या नावावरून हे नाव पडले आहे. त्याने या भागात अनेक विहिरी खोदल्या आणि बागा उभ्या केल्या. जुन्या कुलाबा गॅझेटियर मध्ये ‘अलीबाग, म्हणजे अलीची बाग, अली नावाच्या श्रीमंत मुस्लिमाच्या नावावरून हे नाव पडले असे म्हटले जाते, साधारणपणे ३०० वर्षांपूर्वी तो होऊन गेला आणि त्याने अनेक विहिरी खोदल्या आणि बागा निर्माण केल्या, असा संदर्भ सापडतो. त्यामुळे अनेकदा अली हा मुस्लीम होता असा कित्ता गिरवला जातो. कुलाबा जिल्हा गॅझेटियर १८८३ साली प्रकाशित झाले. मध्ययुगीन कालखंडात या परिसरात हबशींचे प्राबल्य होते. त्यामुळेच अलिबागमधला अली हा मुस्लीम असल्याचे मानले जात होते. नवीन संशोधनानुसार मात्र अली हा मुस्लीम नसून बेने इस्रायली असल्याचे सिद्ध झाले आहे.

अधिक वाचा: विश्लेषण: कच्चथीवू बेटावर ‘या’ हिंदू राजांनी केले होते राज्य? त्यांचा रामाशी नेमका संबंध काय होता?

कोण होता हा अली/ एली?

अली हा एली या मूळ शब्दाचा अपभ्रंश आहे. एली हे एलीशा किंवा एलिझा/ एलिजा यांचे लघुरूप असल्याचे मानले जाते. एली हा आंबा आणि नारळाच्या बागा असणारा शहरातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून प्रसिद्ध होता, म्हणूनच या क्षेत्राला एलीची बाग हे नाव पडले अशी प्रचलित आख्यायिका आहे. परंतु एली आणि त्याची बाग आणि या जागेचा संबंध समजून घेण्यासाठी इतिहासात डोकावून पाहावे लागते. अलिबाग आणि त्याच्या आजूबाजूच्या गावांमध्ये किमान २२५० वर्षांहून अधिक काळापासून बेने इस्रायलींचे वास्तव्य आहे. त्यामुळे हा भाग आणि बेने इस्रायलींमध्ये एक ऐतिहासिक अनुबंध आहे. शहरातील इस्राएल आळी भागात एक सिनेगॉग आहे. या सिनेगॉगचे बांधकाम १८४८ मध्ये झाले. स्थानिक लोक या भागाला मराठीत एलीची बाग म्हणून संबोधत असत. भाषाशास्त्राप्रमाणेच नंतरच्या कालखंडात त्याचात अपभ्रंश होत रूपांतर ‘अलिबाग’मध्ये झाले असे मानले जाते.

प्रचिलत मान्यतेनुसार प्रेषित एलिजाचे भारतात आगमन झाले, त्यांच्या पाऊलखुणा अलिबागजवळील एका खडकावर दिसतात, या खडकाला मराठीत एलियाहू हनाबीचा टाप (एलिजाह रॉक) म्हणतात. कथेनुसार प्रेषित एलिजा हे बेने इस्रायलींसमोर प्रकट झाले आणि त्यांनी वचन दिले की, त्यांचे वंशज पुन्हा एकदा एरेट्झ इस्राईलमध्ये (Eretz Yisrael) स्थायिक होतील आणि तोपर्यंत ते भारतीय समाजाचा एक भाग होऊन राहतील. बेने इस्रायली समाजात प्रेषित एलियाचे आभार मानण्यासाठी आणि इच्छा पूर्ण करण्यास सांगण्यासाठी मलिदा आयोजित केला जातो. बेने इस्रायलींच्या मलिदा समारंभाला एलियाहू हनावी असेही म्हणतात. हा बेने इस्रायलींच्या जीवनातील एक महत्त्वाचा विधी आहे. भारतीय ज्यू परंपरेनुसार इलियाहू आपल्या रथात बसून भारतातून स्वर्गात गेले. एलियाहू हे इस्रायली समुदायाचे रक्षक असल्याचे मानले जाते.

अधिक वाचा: इस्रायल माझ्या हृदयात आहे, भारत माझ्या रक्तात आहे; भारतातील ज्यू समाज !

बेने इस्रायली आणि मराठा नौदल

१७ व्या शतकात आरोन चुर्रीकर (Aaron Churrikar) नावाच्या बेने इस्रायली व्यक्तीला नायक किंवा मराठा नौदलाच्या ताफ्याचा कमांडर म्हणून नियुक्त केले गेले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात त्यांना इनाम जमीन मिळाली जी अजूनही त्यांच्या वंशजांच्या ताब्यात होती. रेव्ह. जे. हेन्री लॉर्डच्या ‘द ज्यूज इन इंडिया अॅण्ड द ईस्ट’ या पुस्तकात सुमारे १७९३ पर्यंत या कुटुंबाकडे फ्लीटचे कमांडरपद होते असा संदर्भ सापडतो. साधारण १८३१-३२ दरम्यान मराठा सरकारने बेने इस्रायल, एलोजी बिन मुसाजी, इस्रायल, तेली, झिरटकर यांना एक सनद दिली होती.

बेने इस्रायलींच्या निष्ठा, समर्पणाचे आणखी एक उदाहरण म्हणजे एका बेने इस्रायली कुटुंबाने जंजिरा येथील हबशी (Abyssinian) शासकाची सेवा केली. परंतु नंतर मराठ्यांशी झालेल्या युद्धात ते पकडले गेले परंतु त्यांनी निष्ठा बदलण्यास नकार दिल्यावर मारले गेले. त्यांच्या या निष्ठेमुळे मराठा सेनापती प्रभावित झाला. त्याने याच कुटुंबातील इतर दोन सदस्यांना सॅम्युअल (सामजी) आणि अब्राहम (आबाजी) यांना मराठा नौदलात कमांडर म्हणून नियुक्त केले. शिवाय अवचितगड, सागरगड आणि इतर काही किल्ल्यांवरही बेने इस्रायलींची नेमणूक करण्यात आली होती.

एकूणात बेने इस्रायली वगळून अलिबागचा इतिहास लिहिलाच जाऊ शकत नाही. नामांतरणाच्या प्रक्रियेत आपण आपल्याच संस्कृतीच्या अविभाज्य घटकांचा इतिहास पुसत नाही ना याचेही भान ठेवणे गरजेचे आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who was ali of alibaug what is the contribution of alis community in the history of swaraj svs
First published on: 04-04-2024 at 18:14 IST