सध्या इस्रायल- पॅलेस्टाईन मधील युद्धाने जगाला सुन्न केले आहे. इस्रायल आणि भारत यांचे प्राचीन काळापासून एक खास नाते आहे. अनेक भारतीय ज्यू इस्रायलच्या स्थापनेनंतर स्थलांतरित झाले. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताचे आणि त्यांचे नाते समजून घेणे महत्त्वाचे ठरावे.
भारताच्या इतिहासात अनेक समाज भारतात आले आणि स्थायिक झाले. हे समाज केवळ भारताच्या भूमीवर स्थायिक झाले एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या संस्कृतीसह एक अतूट ऋणानुबंध तयार केला. याच समाजांच्या यादीतील एक महत्त्वाचा समाज म्हणजे ‘ज्यू समुदाय’. जो देशाच्या सध्याच्या आधुनिक प्रादेशिक सीमांच्या बाहेरून आला होता. भारतात त्यांना एक घर आणि ओळख मिळाली. हीच ओळख पुढील अनेक शतके राहणार होती, हे त्यांच्या भारतातील आगमनानंतरच निश्चित झाले होते. भारतीय ज्यू समाजाने भारतीय संस्कृतीशी आपली समरसता दर्शवली इतकेच नव्हे तर त्यानंतर भारतात सामील झालेल्या इतर गटांसोबत देखील या समाजाने एकरूपता दर्शवली, किंबहुना त्यांच्या याच वैशिष्ट्यासाठी ते ओळखले जातात. भारतातील ज्यू समाज बेने इस्रायली, बगदादी ज्यू, कोचीन ज्यू आणि बेनेई मेनाशे या चार गटांमध्ये विभागला गेला होता. भारतातील ज्यूंनी भारताच्या विविध भागात आपले जीवन चांगल्या पद्धतीने व्यतीत केले.
१९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले, तर १९४८ साली इस्रायल या स्वातंत्र्य राष्ट्राच्या स्थापनेची घोषणा झाली. भारताला मिळालेले स्वातंत्र्य आणि इस्रायल या देशाची पायाभरणी यामुळे भारत-इस्रायल संबंधांनी संपूर्ण नवीन युगात प्रवेश केला होता. भारतात ज्यू समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात होती. आपल्या भूमीकडून आलेल्या परतीच्या आवाहनामुळे भारतातील ज्यूंनी इस्रायल या त्यांच्या धार्मिक भूमीत स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामागे अनेक उद्देश होते, काही जण या निर्णयामागे एक चांगली आर्थिक संधी म्हणून, तर काही जण इस्रायलकडून आलेले धार्मिक आवाहन म्हणून पाहत होते. केवळ भारताला आपले घर मानणाऱ्या ज्यूंचाच नव्हे, तर भारतातून इस्रायलमध्ये गेलेल्या लोकांचाही १९४८ नंतरच्या भारत- इस्त्रायल संबंधांवर परिणाम झाला आहे.
आणखी वाचा: ३३ टक्के महिला आरक्षणाचे मूळ रोवणाऱ्या महिला खासदार कोण होत्या? काय आहे त्यांचा इतिहास?
भारतीय ज्यूंचे इस्राइल मधील वास्तव्य
भारतातून इस्रायलमध्ये ज्यूंचे झालेले स्थलांतर आणि तेथील त्यांची वसाहत या घटनांचे आणि त्यांच्या सद्यस्थितीचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. भारतीय ज्यू हा एकसंध गट नव्हता. भारतातील ज्यूंच्या चार गटांमध्ये मूलतः सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी आणि सांस्कृतिक परंपरांमध्ये लक्षणीय फरक होता, अनेक बाबतीत विसंगती होती. भारतीय ज्यूंमधील अंतर्गत मतभेद, इस्त्रायलमधील युरोपियन वंशाच्या ज्यूंकडून आलेल्या रंगाच्या पूर्वाग्रहामुळे स्थलांतराच्या सुरुवातीच्या दशकांमध्ये भारतीय ज्यूंचे इस्रायल मधील स्वागत खूपच गुंतागुंतीचे झाले.
बेने इस्रायली, हे मुख्यतः महाराष्ट्रातून स्थलांतरित झालेले होते. त्यांना इस्रायलमध्ये स्थायिक झाल्यावर सर्वाधिक भेदभावाचा सामना करावा लागला होता. १९४८ ते १९५२ या कालखंडादरम्यान अंदाजे २३०० बेने इस्रायली इस्राइलमध्ये स्थलांतरित झाल्याची नोंद आहे. १९५० च्या अखेरीस, अनेक अहवालांमध्ये इस्रायलमधील समुदायांनी अनुभवलेल्या वर्णद्वेषाकडे लक्ष वेधले आहे. शिफ्रा स्ट्रिझोवर हे ज्यू समुदायाचे अभ्यासक आहेत, त्यांनी नमूद केले की, ‘१९५० च्या दशकाच्या सुरुवातीस अनेक बेने इस्रायली (मराठी ज्यू), इस्रायलमधील जीवनाशी जुळवून घेऊ शकले नाहीत. सुरुवातीच्या काळात भारतीय ज्यू समुदायाशी खूप भेदभाव केला जात होता, असे प्राथमिक कारण होते अशी माहिती अनेक बेने इस्रायलींनी दिली. विशेषतः नोकऱ्या आणि गृहनिर्माणमध्ये हा भेदभाव प्रामुख्याने आढळत असे. येथील जनजीवन कशा प्रकारे असेल याची कोणतीही माहिती त्यांना देण्यात आली नव्हती. बेने इस्रायलींशी झालेला भेदभाव इतर भारतीय ज्यूंच्या तुलनेत अधिक होता. यामागील मुख्य कारण स्थलांतराच्या उद्देशात होते, असे मानले जाते. कोचीन ज्यूंनी प्रामुख्याने धार्मिक कारणांसाठी इस्रायलमध्ये स्थलांतर केले होते. तर बेने इस्रायलींनी त्यांची भौतिक परिस्थिती सुधारण्यासाठी स्थलांतर केले होते असे मानले जाते. बेने इस्रायलींना झिओनिस्ट म्हणजेच धार्मिकता नसलेले मानले जाते, तर कोचीन ज्यूंना धार्मिक मानले जाते. यामुळेच बेने इस्रायलींनी चुकीच्या हेतूने इस्रायलमध्ये स्थलांतर केल्याचे मानले जाते.
भारतातील ज्यूंच्या चार शाखांमधील आर्थिक परिस्थितीतील फरक हे त्यांच्यातील अंतर्गत वैमनस्याचे एक प्रमुख कारण होते. स्ट्रिझोवर यांनी नमूद केल्याप्रमाणे, ज्या वेळेस बेने इस्रायलींना विचारले गेले की कोचीन यहुदी त्यांच्या सारखी वांशिक भेदभावाची तक्रार का करत नाहीत, तेव्हा त्यांनी सांगितले की “काळ्या ज्यूंचा गरिबीमुळे छळ झाला, ते रोगाने ग्रस्त होते; कोचीन- ज्यू हे त्यांच्या कनिष्ठ स्थानाबद्दल नाराज होते. शिवाय सोडवणूक करण्यासाठी मसिहा येणार या आशेवर ते जगत होते आणि त्यातच त्यांना आनंदही होता. त्या तुलनेने बेने इस्रायल ही जात विचारांच्या बाबतीत अत्याधुनिक होती!” दुसरीकडे बगदादी ज्यू, बेने इस्रायली समाजाला निकृष्ट समजत होते कारण शुद्ध ज्यू असण्यासाठी आवश्यक असलेल्या धार्मिक परंपरांचा अभाव बेने इस्रायलींमध्ये होता, असे त्यांना वाटत होते.
१९६० साली सेफर्डिक चीफ (मुख्य) रबाय इत्झाक निस इम यांनी बेने इस्रायली या समाजाला ज्यू म्हणून स्वीकारण्यास नकार दिला, तसेच त्यांना इतर ज्यूंशी लग्न करण्यासही मनाई केली. परंतु नागरी हक्क चळवळीमुळे त्यांच्या भूमिकेला आव्हान दिले गेले, इस्रायली सरकार आणि ज्यू समुदायाच्या दबावामुळे रबाय इत्झाक निस इम यांना आपला निर्णय मागे घ्यावा लागला. नंतरच्या वर्षांमध्ये बेने इस्रायली समाजाची मोठी लोकसंख्या इस्रायलमध्ये अस्तित्वात असतानाही राजकीयदृष्ट्या सक्रिय किंवा आर्थिकदृष्ट्या चांगले नसल्याची नोंद त्यांच्याबाबत करण्यात आली. हिब्रू विद्यापीठातील मानववंशशास्त्रज्ञ आणि भारतीय यहुदी या विषयाचे अभ्यासक डॉ. शाल्वा वेल त्यांनी सांगितले “कोचीन ज्यूंना कृषी वसाहतींमध्ये ठेवण्यात आले होते आणि त्यामुळे ते श्रीमंत झाले. परंतु, याविरुद्ध बेने-इस्रायली समाजाला डिमोना, अश्दोद किंवा यांसारख्या परिघीय (सीमेवरील) शहरांमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांचे वास्तव्य बीरशेवा, तेल अवीव किंवा जेरुसलेम यांसारख्या मुख्य शहरांमध्ये नव्हते. ते एकूणच ज्यू समाजाच्या सीमेवर होते; परंतु या विरुद्ध भारतामध्ये असे घडले नाही. भारतीय समाजात- इतिहासात बेने-इस्रायली समाजाने प्रमुख भूमिका बजावली, याचे उत्तम उदाहरण म्हणजे निस्सीम इझिकेल, ज्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. मात्र, इस्रायलमध्ये भारतीय ज्यू समाज हा समान पदांवर विराजमान नाही, हे वास्तव आहे”
आणखी वाचा: चिंचेच्या झाडाखाली झोपणे वैज्ञानिकदृष्ट्या निषिद्ध का मानले जाते?
भारतीय संस्कृती आत्मसात करण्याचे प्रयत्न
इस्रायलमधील भारतीय ज्यू स्थलांतरितांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असूनही, मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या तिथेच राहिली आणि त्यांनी त्यांच्यासोबत आणलेल्या भारतीय संस्कृतीचे जिवंत पैलू कायम ठेवले. सध्या इस्रायलमध्ये सुमारे ८५ हजार भारतीय वंशाचे ज्यू राहतात. भारतीय भाषा, खाद्यपदार्थ आणि सांस्कृतिक परंपरांचे आकलन-पालन त्यांच्यातील मोठ्या वर्गांमध्ये दिसून येते. विशेषत: इस्रायलमधील भारतीय ज्यू समुदायामध्ये भारतीय सिनेपरंपरेबद्दल, विशेषत: बॉलीवूड चित्रपट आणि गाण्यांबद्दलची प्रबळ आत्मियता दिसून येते. भारतीय ज्यूंमध्ये बॉलीवूडची ओढ त्यांच्या लग्न समारंभात आणि तरुणांच्या पॉप संस्कृतीतही दिसून येते. मानववंशशास्त्रज्ञ गॅब्रिएल शेनार यांनी नमूद केल्याप्रमाणे, “भारतीय- इस्रायली प्रेक्षकांमध्ये, ‘बॉलीवूड’ हा शब्द समुदाय- केंद्रित क्रियाकलाप आणि वैशिष्ट्यांसाठी ओळखला जातो.