कोल्हापूर : बिद्री साखर कारखान्याच्या आसवणी , इथेनॉल प्रकल्पावर उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ मंगळवारी कारखाना कार्यस्थळावर सर्व कामगारांनी निषेध सभा घेतली. प्रसंगी उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला. कामगारांनी आज दिवसभर निषेधार्थ काळ्या फिती लावून काम केले.

यावेळी कामगार संचालक शिवाजी केसरकर म्हणाले, बिद्री कारखाना हा कुणा एकाच्या मालकीचा नाही. त्यावर लाखो लोक अवलंबून आहेत. केवळ राजकीय सुडबुध्दीने चांगल्या प्रकल्पावर चुकीची कारवाई करीत असेल बिद्रीचे कामगार गप्प बसणार नाहीत.

हेही वाचा : बिद्री कारखान्याचा डिस्टलरी परवाना रद्द; के. पी. पाटील, हसन मुश्रीफ यांना धक्का

मौनीनगर कामगार पत संस्थेचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण फराकटे म्हणाले, बिद्रीचा कारभार कसा आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. केवळ के. पी. पाटील कारखान्याचे अध्यक्ष आहेत म्हणून त्यांना अडचणीत आणण्याच्या दृष्टीने कारवाई करणे हे चुकीचे आहे. अजित आबिटकर, अशोक फराकटे यांनी कारखान्याच्या कारभाराला आमदार प्रकाश आबिटकर केवळ राजकीय द्वेशापोटी सातत्याने विरोध करीत असल्याचा आरोप केला.