IPL 2024, Gujarat Titans vs Delhi Capitals: दिल्ली कॅपिटल्सने गुजरातच्या घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात यजमान संघाविरूद्ध आयपीएलमधील आपला मोठा विजय नोंदवला. दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सने दिलेले ९० धावांचे माफक लक्ष्य केवळ ८.५ षटकांत पूर्ण केले. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने संपूर्ण सामन्यात आपली जबरदस्त कामगिरी दाखवली. गोलंदाजांनी गुजरात टायटन्सच्या फलंदाजांना १०० धावाही करू दिल्या नाही. नंतर फलंदाजी करताना दिल्लीने हे सोपे लक्ष्य सहज गाठले. पण या सामन्यात कुलदीप यादव दिल्ली संघातील सहकारी मुकेश कुमारवर भडकला होता, सामन्यात नेमकं काय घडलेलं जाणून घ्या.

कुलदीप यादव सहकारी खेळाडू मुकेश कुमारवर चांगलाच भडकला. कुलदीप यादव रागाने म्हणाला, ‘तू वेडा आहेस का?’ त्यानंतर पंत त्याच्या जवळ जात कुलदीपला शांत करतो. ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

मुकेश कुमारने वेगाने धावताना चेंडू पकडला. यावर पंत ओरडत म्हणाला – ‘मार’ (रन आऊटसाठी). मुकेश कुमारने जोरात चेंडू कुलदीपच्या दिशेने फेकला यावर तो चिडतो आणि म्हणतो- ‘तू वेडा आहेस का?’ हे पाहताच डीसीचा कर्णधार ऋषभ पंत ताबडतोब त्याच्याकडे धावला आणि म्हणाला- ‘रागावू नकोस’. आठव्या षटकात राहुल तेवतिया आणि अभिनवची जोडी मैदानावर असताना ही संपूर्ण घटना घडली.

विजयानंतर पंतने आपल्या खेळाडूंचे कौतुक केले आणि म्हणाला – “अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा आम्हाला आनंद आहे. आम्ही चांगले खेळलो. सध्या आम्ही फक्त एका सामन्याचा विचार करत आहोत. हा विजय साजरा करत आहोत. गोलंदाजीबाबत तो म्हणाला- निश्चितपणे सर्वोत्कृष्ट. ही स्पर्धा अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि आम्ही अजूनही इथून कामगिरीत सुधारणा करू शकतो.”

दिल्ली कॅपिटल्सने गेले काही सामने गमावल्यानंतर गुजरातविरूद्धची त्यांची कामगिरी खूपच वाखणण्याजोगी होती. संघाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत मोठा विजय संघाला मिळवून दिला.