Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Highlights: लखनऊ सुपर जायंट्सचा खेळाडू ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मार्कस स्टॉइनसच्या वादळी खेळीत चेन्नई सुपर किंग्जचा मोठा पराभव केला. स्टॉइनसच्या केवळ ६३ चेंडूत १२४ धावांच्या धडाकेबाज खेळीमुळे लखनऊने चेन्नईविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर सहा विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. स्टॉइनसने त्याच्या या खेळीसह अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. मार्कसने या खेळीसह एकप्रकारे धोनीला गुरूदक्षिणा दिली आहे.

स्टॉइनसने काही वर्षांपूर्वी आयपीएल सामन्यानंतर धोनीशी त्याच्या खेळाविषयी चर्चा केली होती. फिनिशरची भूमिका आणि फिनिशरने सामना शेवटपर्यंत कसा न्यावा यासंदर्भात धोनीने त्याला सल्ला दिला होता. याबद्दल स्टॉइनसनेच त्यावेळेस सांगितले होते. स्टॉइनसने धोनीबद्दलच्या चर्चेविषयी सांगताना म्हटले होचे तो मार्कसला खूप चांगल्याप्रकारे समजून घेतो. या चर्चेदरम्यान धोनीने त्याला स्पष्ट भाषेत त्याच्या खेळाविषयी सांगितले होते.

धोनीने स्टॉइनसचा खेळ चांगला समजून घेत त्याच्याशी चर्चा केल्याचे स्टॉइनस एका मुलाखतीत म्हणाला होता. तो जेव्हा फलंदाजीला यायचा तेव्हा त्याला कशी गोलंदाजी करायची आणि मैदान कसं सेट करण्याचा प्रयत्न केला हेही त्याने सांगितले होते. धोनीने यावेळेस बोलताना त्याला हेही समजावले की सामना शेवटपर्यंत कसा न्यायचा. धोनीने स्टॉइनसच्या सरावाबद्दल ही चर्चा केली होती आणि तेव्हा सांगितले होते की तुमच्या उणिवा आहेत त्यावर काम करत त्याचे संधीत रूपांतर करा. त्याचसोबत शॉर्ट बॉलवर काम करण्यास सांगितले होते, ज्याचा फायदा त्याला सराव करताना झाला.

धोनीच्या या सल्ल्याचा त्याला खेळ सुधारण्यात फायदा झाला आणि चेन्नईविरूद्धच्या सामन्यात त्याने एकट्याने सामना शेवटपर्यंत नेत संघाला विजय मिळवून दिला. गुरूने दिलेली विद्या त्याने गुरूलाच गुरूदक्षिणा म्हणून दिली. यष्टीच्या मागे असलेला धोनीही त्याच्या फटकेबाजी पाहत होता, पण चेन्नईचा एकही गोलंदाज त्याला बाद करू शकला नाही.

चेन्नईने दिलेल्या २११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीची जोडी स्वस्तात बाद झाली. लखनौने अवघ्या ३३ धावांत दोन आणि ८८ धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. पण, इथून स्टॉइनसने आपली वादळी शतकी खेळी करत डावात तीन चेंडू शिल्लक असतानाच लक्ष्य पार केले. लखनऊने चार विकेट्सवर २१३ धावा करून चेन्नईचा अभेद्य किल्ला भेदला.

इतकंच नव्हे तर ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने त्याला केंद्रीय करारातूनही बाहेर केले, कारण त्याची कामगिरीही यथातथाच होती. पण टी-२० फॉरमॅटमधील आयपीएलमधील त्याच्या या शतकी कामगिरीसह त्याने निवडसमितीलाही एकप्रकारे चोख उत्तर दिलं.