ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाच्या फलंदाजांनी सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवलं. ४०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना भारताच्या हनुमा विहारी आणि रविचंद्रन अश्विन या जोडीने तब्बल ४३ षटकं खेळून काढत सामना वाचवला. भारतीय युवा फलंदाज ऋषभ पंत याने तडाखेबाज खेळी करण्यास सुरूवात केली होती, पण शतकाने त्याला तीन धावांनी हुलकावणी दिली. पंत खेळत असताना भारत सामना जिंकणार अशी आशा चाहत्यांना वाटत होती, पण तो बाद झाल्यावर संघाने सामना वाचवण्याला प्राधान्य दिले. ऋषभ पंतने दमदार खेळी करत तीन विक्रम केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कर्णधार अजिंक्य रहाणे बाद झाल्यावर ऋषभ पंत मैदानात आला आणि त्याने सामन्याची सूत्र हाती घेतली. सुरूवातीला सावध खेळ केल्यानंतर मग त्याने सुसाट फलंदाजी केली. पंतने १२ चौकार आणि ३ षटकारांची आतषबाजी करत ११८ चेंडूमध्ये ९७ धावा कुटल्या. नॅथन लायनच्या फिरकीपुढे तो बाद झाला. या खेळीसह त्याने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर ५०० धावांचा टप्पा पार केला. पंत हा ऑस्ट्रेलियात सर्वात जलद ५०० धावांचा टप्पा गाठणारा पाहुण्या संघाकडून खेळणारा यष्टीरक्षक ठरला. तसेच आशियाई देशांकडून खेळणाऱ्यांपैकी ऑस्ट्रेलियात ५०० धावा करणारा तो पहिलाच यष्टीरक्षक ठरला. याशिवाय ऑस्ट्रेलियात चौथ्या डावात ९०पेक्षा जास्त धावा करणारा तो सर्वात कमी वयाचा यष्टीरक्षक ठरला.

आणखी वाचा- IND vs AUS: विहारी, अश्विनची धाकड खेळी! ४० वर्षांत पहिल्यांदाच केला ‘हा’ पराक्रम

आणखी वाचा- IND vs AUS: ‘टीम इंडिया’ सुसाट!! विहारी-अश्विनच्या खेळीमुळे १२ वर्षांनंतर केला ‘हा’ पराक्रम

दरम्यान, सामन्यात प्रथम ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करत ३३८ धावा केल्या. तर भारताचा पहिला डाव २४४ धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात झटपट धावा करत भारताला विजयासाठी ४०७ धावांचे आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने अर्धशतक केलं. शुबमन गिल आणि अजिंक्य रहाणेला फारशी चमक दाखवता आली नाही. पण पंतने धुवाधार ९७ धावा कुटल्या. पुजारानेही ७७ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यावर हनुमा विहारी आणि रविचंद्रन अश्विन या दोघांनी कमाल केली. या दोघांनी सामना वाचवण्यासाठी तब्बल २५९ चेंडू म्हणजेच ४३ षटकं खेळून काढली आणि त्यात नाबाद ६२ धावांची भागीदारी केली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rishabh pant breaks 3 big records in one inning becomes fastest to reach 500 runs in australia vjb