वारी न करणारे वारकरी

देहूहून कोल्हापूरला तुकोबांची कविता पोचली नि बहिणाबाईंना त्या कवितेतच विठोबा दिसला.

books on sant tukaram
(संग्रहित छायाचित्र)

विनायक होगाडे

‘तुकारामायण’, ‘मीडिया ट्रायल ऑन तुकोबा’ आणि ‘डियर तुकोबा’ या पुस्तकांच्या माध्यमातून तुकारामाचा शोध घेणाऱ्या लेखकाचं आजच्या तरुण पिढीलासुद्धा वारी आणि विशेषत: तुकाराम किती जवळचा वाटतो याबद्दलचं चिंतन..

कीर्तन करताना कसा नाचला असेल तुकोबा? कशी धरली असेल वीणा नि कसे असतील त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव? ‘जय हरी विठ्ठल’ गात नाचताना कशा घेतल्या असतील तुकोबाने गिरक्या? विषमतेवर प्रहार करणारा अभंग मुखातून उमटताना कशी डुलत असेल तुकोबाची भुवई? त्वेषाने अनीतीवर आसूड ओढताना अधूनमधून कशी वळत असेल त्याची मूठ? आपल्याच अंतरीच्या गोष्टी जेव्हा तुकोबाच्या मुखातील एकेका अभंगातून परतत असतील लोकांच्या हृदयात- तेव्हा कसा असेल त्यांचा आविष्कार? परदु:खाचं गाऱ्हाणं मांडताना कसा गहिवरला असेल तुकोबा? नि विठुरायाला साद घालताना खुदकन् कसा हसला असेल तुकोबा? तुकोबांनी छेडलेल्या वीणेच्या झंकारात कशी शहारत असेल खळाळती इंद्रायणी?

मला तुकोबांसंदर्भात विचार करताना नेहमीच त्यांच्या आयुष्यातील अशा बारीकसारीक गोष्टींबाबत प्रश्न पडायचे.. अजूनही पडतात. ‘तुकाराम’ नावाचं जे काही एक मोठं आकाश आपल्या अवतीभवती व्यापून राहिलेलं आहे, ते अथांग आहे यात शंका नाहीच. मात्र, ते अथांग आहे असं म्हणून कुणीच त्याचा थांग लावायचा प्रयत्न करूच नये असं नक्कीच नाहीये ना?

चारशे वर्षांपूर्वी देहूसारख्या एका छोटय़ा खेडय़ात कुणीतरी ‘तुका’ नावाची व्यक्ती एकापेक्षा एक सरस कविता प्रसवते आणि ती चारशे वर्षांनंतरही लोकांना तितकीच आपलीशी वाटते, तेव्हा त्या माणसाचं आयुष्य समजून घेणं माझ्यासारख्या तरुणाला महत्त्वाचं वाटतं. कारण त्या माणसाने त्याचे शब्द नाइलाजाने का होईना, पण त्या पाण्यात भिजवले म्हणून खळाळणारी नदी ‘इंद्रायणी’ झाली.. त्या लिहित्या हातांनी प्रसवलं म्हणून त्या पिटुकल्या गावाचं ‘देहू’ झालं.. आणि त्याच लिहित्या हातांनी तेव्हा कधीतरी वारंवार पायवाट तुडवली म्हणून त्या डोंगराचा ‘भांबनाथ’ झाला. एक व्यक्ती किती अफाट बदल करू शकते? विशेष म्हणजे हे सगळं चारशे वर्षांपूर्वी.. 

हे ही वाचा : पालखी सोहळ्याला सुरुवात तरी पंढरीच्या वाटेची प्रतीक्षा!

मला प्रश्न असा पडायचा, की आता तुकोबा ही दैवत्वाला पोहोचलेली व्यक्ती आहे. मात्र, ती दैवत्वाची पुटं बाजूला काढून एखाद्याला तुकोबांचं फक्त ‘माणूस’ म्हणून असणं आवडलं आणि त्याविषयी चिंतन करायची इच्छा झाली, तर..? एकीकडे ‘तुकाराम’ हा विषय फक्त वारकऱ्यांचा आहे आणि जीन्स घालणारा महाराष्ट्रातील तरुण तुकोबांशी रिलेट करूच शकणार नाही, अशी आपणच आपली करून घेतलेली समजूत किती वरवरची आहे. खरं तर ज्याला ज्या माध्यमातून तुकोबांच्या जवळ जावंसं वाटतं, त्याला त्या माध्यमाचा अवकाश उपलब्ध करून देणं, हीदेखील आपली जबाबदारी आहे. खरं तर भेदाभेदाचा भ्रम न मानणारे आणि शब्दांची शस्त्रे घेऊन उभे असलेले असे कित्येक ‘वारी न करणारे वारकरी’ आपल्या आसपास आहेतच.

मी काही वारकरी नाही. अथवा माझ्या घरी आजी सोडली तर कुणीही त्या परंपरेशी निगडितही नाही. तरीही मला तुकोबांवर दोन शब्द लिहावेसे वाटत असतील- आणि तेही तुकोबांना ‘डियर तुकोबा’ अशी साद घालून- तर त्यांच्याविषयी मला वाटणारं प्रेम आणि जिव्हाळा हा वारकऱ्याला वाटणाऱ्या आपुलकीइतकाच मोलाचा ठरतो असं मला वाटतं. वारकऱ्यांच्या मुखातून ‘जय हरी विठ्ठल’ अथवा ‘ज्ञानोबा-तुकाराम’ हे शब्द जितक्या आतून मन:पूर्वक बाहेर पडतात, अगदी तितक्याच मन:पूर्वक कुणी तुकोबांना ‘डियर तुकोबा’ म्हणून साद घालत असेल, तर तुकोबा अशांनाही नक्कीच कवेत घेणारे आहेत अशी मला निश्चितच खात्री आहे.

याचं कारण असं की, तुकोबांनी ज्या काळात कविता लिहायला सुरुवात केली ती त्यांच्या वयाची विशी-पंचविशी होती. आज विशी-पंचविशीत असलेल्या तरुणाईचे प्रश्न नक्कीच वेगळे आहेत याची मला जाणीव आहे. मात्र, वाटय़ाला येणारी अस्वस्थता आणि नैराश्य त्यांचंही सारखंच आहे. एका सुखवस्तू घराण्यात जन्मलेल्या तुकोबांच्या वाटय़ालाही दुष्काळाच्या निमित्ताने का होईना, बराच संघर्ष आला. त्याआधीच घरातील जवळच्या व्यक्ती जेव्हा एकामागोमाग एक करत निघून गेल्या, तेव्हा आलेली पोकळी तुकोबांनाही खायला उठली असेलच. एकीकडे प्रापंचिक दु:खाचा किती मोठा तो डोंगर.. आणि दुसरीकडे दुष्काळाचा आगडोंब! इतकं सारं दु:ख असूनही त्या निराशेच्या अवस्थेनंतर एखादा माणूस कवितेनं गर्भार राहतो ही विलक्षण गोष्ट आहे. अस्वस्थतेच्या पोटात सृजनात्मक निर्मितीचेही डोहाळे असतात हे आपल्याला तुकोबांनीच दाखवून दिलंय. अपेक्षाभंगाच्या कोलाहलात कधीतरी तुकोबाही हरवले असतीलच.. म्हणूनच सतत ते कदाचित गायब होत असतील. आठ-पंधरा दिवस एकटेपणाच्या तळाशी स्वत:ला बुडवून घेत असतील.

आज एखाद्या तरुणाला जबर नैराश्य येत असेल तर त्याला तुकोबांचं ते नैराश्य का आठवू नये? अशाच एखाद्या डिप्रेस्ड अवस्थेत तुकोबा भंडाऱ्यावर जाऊन बसले असतील. त्यांनी स्व-संवादाचे डोहाळे पुरवले असतील आणि स्वत:च्या मनातील नकारात्मक विचारांची चिवट वार काढून टाकली असेल. मग दु:ख-वेदनेच्या अमाप प्रसवकळा सोसून स्वत:लाच नव्याने जन्माला घातल्यानंतर तुकोबा लिहून गेले असतील की, ‘मीचि मज व्यालों, पोटा आपुलिया आलो..’

सावकारीच्या गहाणखतांवर दगड ठेवून इंद्रायणीच्या डोहात सोडून देण्याइतपत निष्ठुरपणा तुकोबांनी कुठून आणला असेल, हा प्रश्न मला आजही पडतो. तुकोबांसंदर्भात विचार करताना त्यांच्या आयुष्यातले हे बारकावे समजून घेण्याची तीव्र ओढ मला आजही वाटते. तुकोबांच्याच त्या वयातील एक तरुण म्हणून आपण तुकोबांशी कुठे कुठे रिलेट करू शकतो असा मला प्रश्न पडतो. मला जेव्हा निराश वाटतं, अस्वस्थ वाटतं, चिंता वाटते, तेव्हा तेव्हा मला माझ्या त्या अवस्थेशी तुकोबांची अवस्था जुळवून पाहावीशी वाटते.

वडील, आई, वहिनी आणि बायको रखमाई एकापाठोपाठ गेले आणि त्यानंतर दाटला दुष्काळ, चित्ती अपार दु:ख आणि अन्नान्न करत मरणाऱ्यांची काळीकुट्ट परिस्थिती.. कुठून आणावी आशेची ज्योत? कुठून फुटावी पालवी? नैराश्याच्या त्या खोल पोकळीत तुकोबा शिरले आणि कित्येक दिवस त्यांनी स्वत:ला कोंडून घेतलं! तुकोबांनी ही अवस्था कशी भेदली असेल? नंतरचा तुका धर्मपीठाला अंगावर घेण्याइतपत ‘बंडखोर’ कुठून झाला? कुठून स्फुरलं कवित्व? दरम्यानच्या काळात त्यांनी स्वत:च्या आत नेमकं काय पेरलं? कुठून पेरलं? ज्याच्यावर जप्ती आणावी त्याचा आणि माझा शेवट एकच.. मग मी सावकार होऊन का लुबाडावं, असा प्रश्न तुकोबांनाही पडला असेल. आणि मग तुकोबांना इंद्रायणीत सावकारी बुडवायची दुर्बुद्धी (?) सुचली असेल का? आणि तोच ‘तुकोबांचा साक्षात्कार’ होता का?

आज माझ्या वयाची अनेक तरुण मुले जेव्हा वाटय़ाला आलेला संघर्ष झेपत नाही म्हणून असो वा अगदी क्षुल्लक कारणावरून असो; जेव्हा आत्महत्येचा पर्याय उचलतात तेव्हा मला तिथेही तुकोबांची आठवण येते. कारण तुकोबांच्याही विशीमध्ये परिस्थितीमुळे वाटय़ाला आलेलं इतकं सारं फ्रस्ट्रेशन आणि त्रास सोसूनही कधीच त्यांना फाशीचा दोर आपलासा करावा वाटला नाही.

इतकंच काय, एखाद्या लेखकाला त्याचंच साहित्य त्याच्याच हातून नष्ट करायला सांगणं म्हणजे आत्महत्या करायला सांगण्यासारखंच होतं! तरीही तुकोबा ‘तरतील’ या आशेवर गाथेला इंद्रायणीचा डोह दाखवून उपाशीपोटी तेरा दिवस एकटक इंद्रायणीकाठी कसे बसून राहिले असतील? त्यांना वीणेने धीर दिला? चिपळ्यांनी आशा दिली की टाळेने सकारात्मकता दिली? तुकोबांसारखा व्यक्ती सगळी व्यवस्था अंगावर आलेली असतानाही ‘पुरून उरतो’ तेव्हा मला तुकोबा अधिक जवळचे वाटतात. ‘अँग्री यंग मॅन’ असा हा तुकोबांचा लढाऊ बाणा आजच्या तरुणाईला दिसलाच नाहीये, की तो त्यांच्यापर्यंत पोहोचलाच नाहीये?

मला एक प्रश्न असाही पडतो, की तुकोबांच्या आयुष्यात जर प्रामुख्याने रामेश्वर आणि मंबाजी या व्यक्ती आल्याच नसत्या तर तुकोबा ‘तुकोबा’ झालेच नसते का? मला असं वाटतं की, तुकोबांचं हिरो असणं कोणत्याच अंगाने व्हिलनवर अवलंबून नव्हतं. हे आणखी एक तुकोबांचं मोठं वेगळेपण म्हणावं लागेल. अर्थात त्यांच्यामुळे तुकोबांच्या आयुष्यात अनेक निर्णायक घटना घडल्या, त्या मी नाकारत नाहीये. मात्र, तुकोबा हे सर्वस्वी स्वयंभू पद्धतीने घडलेलं व्यक्तिमत्त्व होतं हे मला अधिक प्रकर्षांनं जाणवतं. मात्र, तरीही तुकोबांसंदर्भात विचार करताना एकटय़ा तुकोबांचा विचार करून चालतच नाही. कारण कविता बुडवल्यानंतर जितकं दु:ख तुकोबांना झालं असेल, तितकंच दु:ख आवलीलाही झालं असेल, आणि त्यांचा धाकटा भाऊ कान्होबालाही झालं असेल. इतकंच काय, ते त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनाही झालंच असेल.

कारण तुकोबा ज्या ज्या वेळी अतिशय व्यथित झाले असतील, त्या त्या वेळी त्यांनी कवितेच्या माध्यमातून सृजनाचा उत्कट आनंद अनुभवला असेल. पण याउलट आवलीचं काय झालं असेल? आवली कजाग, भांडखोर आणि खाष्ट म्हणून उगाच बदनाम झाली आहे का? कारण घरातला सगळा कारभार पाहणारी सहा मुलांची आई होती ती! तुकोबा आपल्याच तंद्रीत असे मग्न झालेले असताना आणि दुसरीकडे व्यवस्थेनेही तुकोबांना टोचणी लावायला सुरुवात केलेली असताना तिला राग आणि हतबलता येणं किंवा तिची ससेहोलपट होणं, हे साहजिकच म्हणायला हवं ना! हा संसाराचा गाडा एकांडी शिलेदार होऊन ओढताना तिच्या नाकीनऊ येणं साहजिकच आहे. उलट, तुकोबांच्या काव्यनिर्मितीला लागणारा निवांतपणा तिने एकहाती संसार सांभाळल्यामुळे नक्कीच मिळाला असणार. दुष्काळाच्या आधी ‘सावजी’ या थोरल्या भावाची जागा घेऊन सारी सावकारी, शेती आणि बाजारातील दुकान असं सगळं व्यवस्थित सांभाळणारा आपला नवरा नंतर अचानक कसा काय बदलला, आणि त्याला हा कविता प्रसवणारा पान्हा कुठून आणि कसा फुटला, असा प्रश्न तिलाही नक्कीच पडला असेल. कदाचित तिला सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली नसतील, म्हणूनच तिचा त्रागा होत असावा असं आपण का म्हणू नये?

तुकोबांचं आपल्याला ठळकपणे दाखवलं गेलेलं भोळेभाबडेपण खरंच तसं होतं की ते आपल्यावर लादलं गेलेलं आहे? हा आणखी एक प्रश्न मला महत्त्वाचा वाटायचा. अहंकाराचा डंख उतरावा आणि सारा ‘देह देवाचं मंदिर’ व्हावा यासाठी ‘जलदिव्य’ करत इंद्रायणीचा डोह तुकोबांनी दोनदा पाहिलाय. एक म्हणजे वडिलोपार्जित संपत्तीचं ‘गहाणखत’ बुडवताना आणि दुसरं म्हणजे आपल्या कैक वर्षांची मेहनत असणारी ‘गाथा’ बुडवताना. खरं तर या दोन्हीही गोष्टी तितक्याच लीलया इंद्रायणीच्या डोहात तुकोबांना कशा सोडून देता आल्या असतील याचं मला आश्चर्यच वाटतं. तुकोबांनी ‘आयतं मिळालेलं’ आणि ‘स्वत:हून कमावलेलं’ असं दोन्हीही शांतपणे पाण्यात सोडून देण्याइतपत ताकद कुठून आणली असेल? त्यांना ना सावकारीचा ‘गर्व’ होता, ना गाथेचा ‘अहं’ होता. तुकोबा स्वत:तून स्वत:लाच रीतं करत गेले आणि लोकगंगेत ‘आकाशाएवढे’ व्यापून राहिले. ‘माझिया मीपणावर, पडो पाषाण’ असं म्हणत अहंकाराचा डंख उतरवणारं हे प्रतिविष त्यांनी कुठून कमावलं असेल? माझ्या पिढीने त्यांच्या प्रश्नांची त्यांची उत्तरं शोधताना याचा विचार का करू नये?

खरं तर ‘तुकोबा’ हे संवेदनशीलतेचं नाव आहे. जो संवेदनशील नाही, त्याला तुकोबाही नीटसे कळणार नाहीत, इतकं साधं हे समीकरण आहे. आज जो जो हातात शब्दांची शस्त्रे घेऊन संवेदनशील मनाने उभा आहे, जो जो प्रपंचात राहून आपलं स्वत:चं चिंतन करत चांगुलपणाचं बोट धरून उभा आहे, अशा सर्वामध्ये तुकोबा निश्चितच वास करत असतात असं मला वाटतं. मी तुकोबांच्या गाथेचा गाढा अभ्यास केलाय किंवा वारकरी परंपरेवर माझं सखोल चिंतन आहे असं अजिबातच नाहीये. मात्र, तरीही ‘डियर तुकोबा’ हे पुस्तक लिहिण्याच्या माध्यमातून मी तुकोबांच्या अंगाखांद्यावर सहजपणे खेळण्याचा प्रयत्न केला आहे. तुकोबांना ‘डियर तुकोबा’ म्हणून मी हाक मारणं आणि तिकडून त्यांच्याकडून त्या हाकेला ‘ओ’ मिळणं ही माझ्यासाठी मजेशीर गोष्ट होती. ‘मीडिया ट्रायल ऑन तुकोबा’ हे फिक्शन लिहिताना मला मी कित्येक दिवस तुकोबांच्या जवळच बसलोय असं वाटायचं. कुणाला ही अतिशयोक्ती वाटेलही. मात्र, मजा घेत मी ‘आनंदाचे डोही, आनंद तरंग’ अनुभवत होतो, हे नक्की. कारण लिहिणारा माणूस वारकरी असो वा नसो; तो तुकोबांचा वारसा चालवतोय याचा त्याला अभिमानच असायला हवा.

वारकरी परंपरेकडे पाहताना ‘आधुनिक’ म्हणवणारे सुशिक्षित बऱ्याचदा हेटाळणीच्या भूमिकेत असलेले दिसून येतात. मात्र, एकूण संतपरंपरेमध्ये झालेले सगळे संत हे फक्त संत नव्हते, तर ते ‘संतकवी’ होते आणि त्यांनी त्या काळात एक सांस्कृतिक जागर घडवला आहे याची जाणीव कदाचित आपण विसरूनच गेलो आहोत. या परंपरेने कित्येक जुन्या रूढी मोडायचं धाडस आपल्याला दिलंय याची गणतीच नाहीये. अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या बहिणाबाई सिउरकरांचं देता येईल.

देहूहून कोल्हापूरला तुकोबांची कविता पोचली नि बहिणाबाईंना त्या कवितेतच विठोबा दिसला. त्या तुकोबांच्या कवितेच्या इतक्या चाहत्या झाल्या की त्यांच्या स्वप्नातच तुकोबा आले आणि ते मनोमन तिचे गुरू झाले. हा अपराध ठरवून त्यांच्या पतीने त्यांना मारहाण केली. ब्राह्मण असूनही ‘शूद्रा’ला गुरू करण्याचं हे पातक त्यांच्या माथी ठसवलं गेलं. मात्र, इतकं असूनही तुकोबांच्या ओढीने बहिणाबाई अखेर देहूला आल्या आणि ‘तुका झालासे कळस’ म्हणत तुकोबांसवे संतत्वालाही पोचल्या.

चारशे वर्षांपूर्वी एक बाई अत्यंत पझेसिव्ह अशा नवऱ्याविरोधात बंडखोरी करते आणि जातीची घट्ट  चौकट मोडून आपल्यापेक्षा खालच्या जातीच्या माणसाचं शिष्यत्व पत्करते- आणि तेही फक्त कवितेच्या प्रेमात पडून- ही किती मोठी गोष्ट आहे! दुसऱ्या बाजूला तुकोबांच्या कवितेच्या गुरुत्वाकर्षणाची खोलीही किती जबरदस्त आहे याचीही प्रचीती येते. तुकोबा हे काही गुरुबाजी करणारे नव्हते. ना त्यांनी मठ आणि आश्रम स्थापन केले होते. तरीही लोकगंगेतून वाहत निघालेल्या त्यांच्या कवितेने बहिणाबाईंना देहूला खेचून आणलं होतं. ही बंडखोरी करण्याची ताकद कवितेनेच दिली होती. इतकंच काय, त्यांनाही कवित्वाची प्रेरणा मिळाली होती आणि त्याही तुकोबांच्या सान्निध्यात संतत्वाला पोहोचल्या होत्या. तुकोबांचं हे गारुड किती गडद आहे, नाही?

तुकोबांच्या कवितेविषयी बोलायचं झालं तर विस्मृतीच्या प्रतिकूल लाटेतूनही एखादी अस्सल कलाकृती अंगच्याच गुणांनी कशी वाचते याचं समर्पक उदाहरण म्हणजे तुकोबांची कविता आहे. ती तेव्हा ‘डेंजर’ ठरवली गेली आणि आक्षेपार्ह ठरवून चक्क बुडवलीही गेली. आणि तरीसुद्धा ती लोकगंगेच्या मुखातून तरली, वाचली आणि वाहतही राहिली. काय कमाल आहे ना? जी त्याकाळी ‘डेंजर’ ठरवली गेली, तीच आज जगाची ‘दृष्टी’ बनली आहे. आज तुकोबांच्या त्याच कवितांच्या दोन ओळींच्या फटीमधून जग सारं पाहायचा प्रयत्न करतं.. ही लिहित्या माणसांच्या आड येणाऱ्या मंबाजी नावाच्या प्रवृत्तीला किती मोठी चपराक आहे, नाही?

vinayakshogade@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pandharpur wari books on sant tukaram sant tukaram maharaj palkhi zws

Next Story
अभिजात : रंगांवर विशुद्ध प्रेम करणारे मातीस
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी