शेतीची कामे नांगरणी, कोळपणी आदी सर्व प्रकार यंत्राच्या माध्यमातून होत असल्यामुळे छोटा शेतकरी यंत्रशेतीचाच वापर करतो आहे. गावोगावी ट्रॅक्टर, पेरणीयंत्र, मळणीयंत्र अशी साधने मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे भाडेतत्त्वावर या यंत्राचा वापर छोटय़ा शेतकऱ्यालाही करता येतो. दुंडणीसारखी जुजबी कामे बलामार्फत करावी लागतात. त्यातही आता सायकलवर चालणारे यंत्र विकसित झाल्यामुळे शेतीत बलाचेच काम शिल्लक राहिले नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हजारो वर्षांपासून कसल्या जाणाऱ्या शेतीत काळानुरूप नवनवे बदल अपरिहार्यपणे होत आहेत. काळाच्या रेटय़ामुळे होणाऱ्या बदलाच्या प्रवाहात सारेच जण निमूटपणे वाहत आहेत. त्याचे अंतिमत: परिणाम काय होतील? शेतीचा समतोल कसा राखायला हवा? यांत्रिकीकरण व पशुधनावर आधारित शेती याचा मेळ घालायचा कसा? याबाबतीत पुरेसा विचार होत नसल्यामुळे भविष्यातील शेतीच्या नव्या समस्यांची पेरणीच जणू आताची पिढी करते आहे.

गावोगावी पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती होती. कुटुंबातील सर्व व्यवहार जसे एकत्रपणे चालत त्याच पद्धतीने शेतीचाही विचार केला जात असे. कुटुंबाच्या गरजेनुसार पिकाची रचना केली जात असे. दरवर्षी पिकाचा फेरपालट होत असे. काळ बदलला. एकत्र कुटुंबपद्धती बदलून विभक्त कुटुंबपद्धती वेगाने वाढली त्यामुळे शेतीचेही तुकडे झाले. विभक्त  कुटुंबपद्धतीत अपरिहार्यपणे कुटुंबापुरता सीमित विचार सुरू झाला. त्याच पद्धतीने शेतीचा विचारही केला जाऊ लागला.

पूर्वी कुटुंबात श्रमाची विभागणी होत असे. एखादा भाऊ बलबारदाना सांभाळत असे तर दुसरा भाऊ अन्य कारभार पाहत असे. आता कुटुंबातील संख्या मर्यादित असल्यामुळे गावोगावी पशुधनाची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. दुष्काळामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, चाऱ्याचा प्रश्न यांनी उग्ररूप धारण केल्यामुळे पशुधनाची संख्या निम्म्यावर आली आहे. विशेषत: शेतीत काम करणाऱ्या बलांची संख्या कमी झाली आहे. त्यापेक्षा शेतीची कामे नांगरणी, कोळपणी, आदी सर्व प्रकार यंत्राच्या माध्यमातून होत असल्यामुळे छोटा शेतकरी यंत्रशेतीचाच वापर करतो आहे. गावोगावी ट्रॅक्टर, पेरणीयंत्र, मळणीयंत्र अशी साधने मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे भाडेतत्त्वावर या यंत्राचा वापर छोटय़ा शेतकऱ्यालाही करता येतो. दुंडणीसारखी जुजबी कामे बलामार्फत करावी लागतात. त्यातही आता सायकलवर चालणारे यंत्र विकसित झाल्यामुळे शेतीत बलाचेच काम शिल्लक राहिले नाही.

बलांची संख्या कमी झाल्यामुळे व शेतीत नगदी पिके घेण्याकडे सर्वाचा कल वाढल्यामुळे पिकांची विविधता संपली. एकच एक पीक वर्षांनुवष्रे घेण्याकडे लोकांचा कल वाढला. आíथकदृष्टय़ा कदाचित हे गणित जुळत असले तरी त्याचे दीर्घकालीन परिणाम शेतीच्या जैवविविधतेवर होत आहेत. आपल्या देशात बलाच्या सुमारे २६ प्रमुख जाती होत्या. त्यात देवणी, खिलार, गीर, डांगी, निमारी, गवलव, केरळमधील वेचूर, तामिळनाडूतील कांगाया, बारगीर अशा प्रमुख जातींचा समावेश होतो. लातूर जिल्हय़ातील देवणी पशूची जात सुमारे २०० वर्षांपूर्वीची आहे. निजामाच्या राजवटीत या जातीचे संगोपन करण्यासाठी काहीसा प्रयत्न झाला. पूर्वी ४० गायी व ६० बल असे आपल्या जनावरांचे प्रमाण होते ते आता वेगाने बदलते आहे. संकरित  वाण मोठय़ा प्रमाणावर दुधासाठी विकसित होत आहेत. संकरित बलाचा शेतीच्या कामात फारसा उपयोग होत नाही म्हणून ते कत्तलखान्यांकडे रवाना होतात. त्यातून गाय, बल यांचे प्रमाणही विषम होत आहे.

जगभर जनावरांच्या जातीचे संगोपन करण्यासाठी मेहनत घेतली जाते. त्यासाठी शास्त्रज्ञ काम करतात. आपल्याकडे मात्र याची वाणवा आहे. देवणी, डांगी, निमारी, गवलव, केरळमधील वेचूर, तामिळनाडूतील कांगाया, बारगीर या जाती आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. याबद्दल फारशी कोणाला खंत वाटते असे चित्र दिसत नाही. २००७ साली आपल्या देशातील एकूण गाय, बलांची संख्या १ कोटी ६१ लाख ८३ हजार होती. यात ३१ लाख २२ हजार २९१ संकरित जनावरांचा समावेश आहे. यापकी ५ लाख ४१ हजार संकरित बलांची संख्या तर उर्वरीत संख्या गायींची आहे. २० टक्के बल व ८० टक्के गायी हे संकरित वाणाचे प्रमाण आहे. एकच एक वाण विकसित होत असल्यामुळे त्याचा परिणाम जैवविविधतेवर होतो. १९५१ साली म्हशीची संख्या ४ कोटी ३४ लाख होती ती २००७ साली १० कोटी ५३ लाख म्हणजे अडीचपट वाढली आहे. मेंढय़ांची संख्या ३ कोटी ९१ लाख होती ती ७ कोटी १५ लाख आहे. शेळ्यांची संख्या ४ कोटी ७२ लाख होती ती आता १४ कोटींवर पोहोचली आहे.

आपल्याकडील जमिनीच्या क्षेत्राचे रूपांतर नागरी वसाहतीत करण्याचा सपाटा गावोगावी सुरू आहे त्यामुळे कसण्यायोग्य जमिनीचे प्रमाण कमी, खाणारी तोंडे वाढली, शिवाय जनावरांची संख्या वाढली. यात हरीण, मोर व अन्य पशू, पक्षी, वन्य प्राणी यांच्या संख्येची भर आहे. हरितक्रांतीमुळे अन्नधान्याचे उत्पादन वाढले मात्र चाऱ्याचे प्रमाण कमी होते आहे. पूर्वी पवना, मारवेल या गवताच्या अतिशय उत्तम जाती होत्या. दख्खनच्या पठारावर याचे प्रमाण अधिक होते. या जमिनीला घट्ट धरून ठेवत असत त्यामुळे जमिनीची धूप होत नसे. पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढत असे. आता वनाखालील जमिनी वापरात आणल्या जात असल्यामुळे गवताचे प्रमाण, जंगलाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होते आहे, त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी होऊन एकूण देशाची पाणीपातळी ३ मीटरपेक्षा खोल गेली आहे.

शेतीची क्षमता किती आहे? ती किती जणांना पोसू शकते व त्यावर आपण किती भार लादतो आहोत? याचा विचार केला गेला पाहिजे. महाराष्ट्रात २ कोटी वृक्ष लावण्याची मोहीम हाती घेऊन ती पार पाडली तर गीनिज बुकमध्ये याची नोंदही होईल मात्र यातील किती झाडे शेळ्या, मेंढय़ांनी खाऊन टाकली याची नोंद ठेवली जाणार आहे का? कारण शेळ्या, मेंढय़ा जगण्याचा प्रयत्न करणारच ना! जॉर्ज वॉिशग्टन यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे, ‘देशाच्या मातीवरून त्या देशाची प्रकृती लक्षात येते.’ आपल्याकडे माती मृतप्राय होत आहे. तिचा पोत सांभाळण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. शेतीची आरोग्यपत्रिका तयार करण्याची भाषा केंद्रातील सरकार करत आहे, मात्र देशातील कोणत्या कृषी विद्यापीठाने आपल्या आवारात असलेल्या जमिनीची तरी दरवर्षी आरोग्यपत्रिका नोंदवून ठेवली आहे, या प्रश्नाचे उत्तर द्यायला कोणी धजावत नाही. यांत्रिकीकरणाबरोबरच रासायनिक खतांचा वापर मोठय़ा प्रमाणावर वाढतो आहे. मातीची गरज लक्षात न घेता आंधळेपणाने रासायनिक खताचा वापर करत बहुराष्ट्रीय कंपन्यांचे घर भरण्याचे काम आपल्याकडील शेतकऱ्यांमार्फत करवून घेतले जात आहे. जमिनीतील पालापाचोळा जाळण्यापेक्षा तो कुजवला पाहिजे. वृक्षाचे संगोपन केले पाहिजे. पशुधनाच्या मलमूत्राचा वापर शेतीत केला तर मातीची गुणवत्ता वाढेल या बाबीकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. प्रत्येकाला जमिनीतून हवे आहे, तिला परत दिले पाहिजे याचे भान विकसित केले जात नाही.

अत्याधुनिक प्रगतीमुळे बी-बियाणांची विविधता वाढली. अधिक उत्पादन व्हावे यासाठी कीटकनाशके, तणनाशकांचा वापर वाढला. खेळाडूंना जसे उत्तेजक पेय दिले जाते त्या पद्धतीने पिकावरही त्याचे प्रयोग केले जात आहेत, हे विनाशाच्या दिशेने टाकले जाणारे पाऊल आहे. निसर्ग हा सर्वासाठी आहे. पशू, पक्षी, प्राणी यांना जगण्याचा अधिकार आहे. स्वत:च्या जगण्यासाठी इतरांच्या जगण्यावर गदा आणण्यात काहीही वैषम्य न बाळगणे म्हणजे आधुनिकता असा समज प्रत्येक पिढीत वेगाने वाढतो आहे.

जगभर पर्यावरणाचे संतुलन, जैवविविधता या विषयाचा जागर केला जातो. प्रत्यक्षात त्यादृष्टीने प्रत्येकाने आपल्या वर्तनात काय बदल केला पाहिजे? याबद्दल फारसे बोलले जात नाही. शेतीतून अधिक उत्पादन घेण्याबरोबरच शेती ही सर्वाना जगवणारी आहे याचे भान बाळगणे महत्त्वाचे आहे.

पिकांच्या नियोजनाची गरज..

शाश्वत शेतीचे स्वप्न वास्तवात आणायचे असेल तर आपल्या गरजा काय आहेत? याचा अंदाज घेऊन पिकांचे नियोजन केले गेले पाहिजे. केवळ नगदी पिकाच्या मागे लागत शेतीबरोबर सर्वाचाच ऱ्हास करण्याची कृती कमी करून वैरणीचे, पिकाचे नियोजन केले तरच भविष्यात याचा लाभ होईल असे मत सेवानिवृत्त पशुवैद्यक विभागाचे उपसंचालक व सेंद्रीय शेतीचे सक्रिय प्रचारक डॉ. महादेव पाचेगावकर यांनी व्यक्त केले.

pradeepnanandkar@gmail.com

मराठीतील सर्व लोकशिवार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agriculture new problems in planting