X

संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

त्या पोलीस अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार आहात? असा सवाल देखील केला आहे.

सध्या राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपाने यावर आक्रमक भूमिका घेत, याप्रकरणी आरोप असलेले महाविकासआघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तसेच, जर मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला नाही तर अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशाराही दिला होता. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज(शनिवार) अखेर वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत राठोड यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. यावर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राठोड यांना त्यांच्या वरिष्ठांचा पूर्ण आशीर्वाद – फडणवीस

माध्यमांशी बोलाताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “खरं म्हणजे पहिल्याच दिवशी हे सगळं प्रकरण बाहेर आल्यानंतर हा राजीनामा यायला हवा होता. याचं कारण, ज्या प्रकारचे पुरावे या संपूर्ण प्रकरणात आपल्याला पाहायला मिळत आहेत, ते इतकं भयानक आहे की अशा परिस्थितीत मंत्रिपदावर राहणं हे पूर्णपणे चूक होतं. पण कुठंतरी आपल्याला वरिष्ठांचा आशीर्वाद आहे, अशी अवस्था वाटल्यामुळे आणि ती दिसत असल्यामुळे हा राजीनामा आला नाही. जरी आता राजीनामा दिला असला, तरी तो स्वीकारला आहे की नाही आम्हाला माहिती नाही. तो स्वीकारणार आहेत की नाही हे देखील आम्हाला माहिती नाही.”

… म्हणून राज्य सरकार अधिवेशनापासून पळ काढत आहे – फडणवीस

तसेच, “पण त्याही पेक्षा महत्वाचं आहे, जे मी पत्रकारपरिषदेत बोललो. की त्या पोलीस अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार आहात? अजूनही एफआयआर त्यांनी केलेला नाही. एवढे पुरावे असताना प्रकरण पूर्ण दाबण्याचा प्रयत्न जे पोलीस अधिकारी करत आहेत, त्यांच्यावर कारवाई का होत नाही? म्हणून आमचं मत असं आहे, एकतर हा उशीरा आलेला राजीनामा आहे, वाचवण्याचा सगळा प्रयत्न झाला पण आमच्या चित्राताई वाघ असतील, आमची महिला आघाडी असेल किंवा समाजमाध्यमं असतील किंवा माध्यमांचे रिपोर्टर्स असतील. या सर्वांनी दबाव तयार केल्यामुळे सरकारला कुठलाही उपायच उरला नाही, म्हणून शेवटी हा राजीनामा घेतला गेला आहे. हा राजीनामा जरी आला असला तरी एफआयआर झाला पाहिजे, असं आमचं स्पष्ट मत आहे.” असं देखील यावेळी फडणवीस यांनी बोलून दाखवलं.

“काँग्रेसच्या नादी लागून स्वातंत्र्यवीर सावरकरांना अपमानित करू नका”

“राजीनामा तूर्तास आहे की पूर्तास हे आम्हाला माहिती नाही, सरकारचा खरा चेहरा उघड झाला आहे. ज्या प्रकारे वाचवण्याचा प्रयत्न झाला हे देखील उघड झालं आहे. बूंद से गयी वो हौदो से नही आती…त्यामुळे राजीनामा तूर्तास आहे की कसा हे त्यांनाच ठरवू द्या. जो पर्यंत पूजाला अंतिम न्याय मिळत नाही, तोपर्यंत भाजपा याचा पाठपुरावा करेल. ” असंही यावेळी फडणवीस म्हणाले.

23
READ IN APP
X