सांगली : शेतात काम करणाऱ्या परप्रांतीय मजुरांकडून वन्य प्राण्याची शिकार केल्याचे आढळल्यास कामगारासोबतच संबंधित शेतकऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याात येईल, असा इशारा तासगाव तालुक्यातील सावळज ग्रामपंचायतीने दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

द्राक्ष बागांची फळछाटणी, तसेच अन्य कामे आता सुरू होत आहेत. या कालावधीत कामासाठी नाशिकसह बिहारमधून मोठ्या प्रमाणात मजूर या भागात दर वर्षी येतात. मात्र, या कामगारांकडून स्थानिक पातळीवर पक्षी, ससे, घोरपडे, मोर आदी वन्य प्राण्याची मांसासाठी शिकार केली जात असल्याचे आढळून येते. यामुळे गावशिवारात पक्षी व वन्य प्राणी नामशेष होण्याच्या स्थितीत आले आहेत. वन्य प्राण्यांच्या चोरट्या शिकारीला आळा घालण्यासाठी आता ग्रामपंचायतीनेच पुढाकार घेतला आहे.

हे ही वाचा…जास्त पावसानंतर यंदा राज्यात थंडीचाही कडाका

गावच्या सरपंचांच्या स्वाक्षरीसह याबाबत ग्रामस्थांना उद्देशून निवेदन जाहीर केले आहे. द्राक्षबागेत कामासाठी वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय कामगारांकडून वन्य प्राण्याची शिकार केली जाऊ नये अशा सक्त सूचना संबंधित कामगार व मुकादमांना देण्यात याव्यात. कामगाराने वन्य प्राण्याची शिकार केल्याचे आढळल्यास संबंधित कामगाराबरोबरच ज्या शेतकऱ्याच्या बागेत संबंधित कामगार काम करत असेल, त्या द्राक्षउत्पादकालाही जबाबदार धरून कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे. दरम्यान, अशा पद्धतीने ऊस हंगामात साखर कारखान्यांनीही ऊसतोड मजुराबाबत निर्णय घ्यावा, असे आवाहन मानद वनजीवरक्षक अजित पाटील यांनी केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Birds and wildlife near village face extinction gram panchayat is addressing poaching sud 02