बुधवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात कर वाढणार, असे संकेत त्यांनी दिले आहेत. करोनामुळे राज्यांना खूप फटका बसला आहे. सर्व राज्याच्या अर्थमंत्र्यांनी करोनाची दोन वर्ष कठीण गेली असून अर्थव्यवस्थेला फटका बसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे त्या पाच वर्षांमध्ये अजून दोन वर्ष वाढवावी, अशी मागणी केंद्र सरकारला केली आहे, असे अजित पवारांनी म्हटले आहे. त्यावर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“पूर्वी फक्त सेल्स टॅक्स आणि एलबीटी होतं. त्यानुसार टॅक्स गोळा करून महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती चालायच्या. नंतर त्याच्या तक्रारी वाढल्या. नंतर गेल्या काळात वन नेशन वन टॅक्स असा निर्णय झाला आणि जीएसटी आलं. त्याला आता पाच वर्ष झाली आहेत. त्या पाच वर्षाच्या काळात केंद्र ठराविक रक्कम राज्यांना देत होतं. ती आता बंद होणार आहे. सर्व राज्याच्या अर्थमंत्र्यांनी करोनाची दोन वर्ष कठीण गेली असून अर्थव्यवस्थेला फटका बसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे त्या पाच वर्षांमध्ये अजून दोन वर्ष वाढवावी, अशी मागणी केंद्र सरकारला केली आहे. आता त्यावर काय निर्णय घेतात ते पहावं लागेल,” असे अजित पवार यांनी म्हटले होते. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे.

“तुम्ही आता राज्यच केंद्राला चालवण्यासाठी द्या. २२ राज्यांनी पेट्रोलवरील व्हॅट कमी केल्याचे तुम्हाला दिसत नाही. त्यामुळे सगळेच मागत असाल तर राज्यच केंद्राला चालवायला द्या. करोनाकाळात केंद्राने जीएसटी परिषदेला कर्ज दिले. त्यानंतर जीएसटी परिषदेकडून राज्यांना थोडेथोडे पैसे देण्यात आले. जीएसटीचे पैसे रात्री बारा वाजताच राज्यांना आणि केंद्राला पाठवले जातात. लोकांना वेडे बनवण्याचे काम चालू आहे,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, “महाराष्ट्रात जमा होणारा जीएसटी निम्मा केंद्राला जातो. त्याबद्दल मी अर्थमंत्रालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा करुन आढावा घेतला. उद्या कॅबिनेट होण्याची शक्यता असून तिथे मी हा विषय मांडणार आहे. वेगवेगळ्या प्रकारची संकटं असतात. पण त्यातूनच मार्ग काढण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना उद्या कॅबिनेट घेण्याची विनंती केली आहे. तो निर्णय मुख्यमंत्री घेतील,” असेही अजित पवारांनी म्हटले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant patil reaction to ajit pawar demand abn 97 svk