Samruddhi Highway accident : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर शनिवारी (१४ ऑक्टोबर) मध्यरात्री एक भीषण अपघात झाला. बुलढाण्याहून नाशिकला जाणाऱ्या खासगी टेम्पो ट्रॅव्हलरने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या एका ट्रकला धडक दिली. या अपघातात १२ जण जागीच ठार झाले असून २३ जण जखमी झाले आहेत. या टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये एकूण ३५ प्रवासी होते. हे सर्वजण बुलढाण्यातील बाबा सैलानींच्या दर्शनाला गेले होते. तिथून घरी (नाशिक) परतत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात १२ जण दगावले असून चालकासह २३ जण जखमी झाले आहेत. या जखमी प्रवाशांपैकी १४ जणांना छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात आणि नऊ जखमींना वैजापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली असून जखमींवर शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश दिले आहेत. त्यापाठोपाठ पंतप्रधान कार्यालयाने या घटनेची दखल घेत अपघातातील मृतांच्या कुटुबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीद्वारे प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना ५०,००० रुपयांची मदत जाहीर केली आहे.

या अपघातातील जखमी प्रवाशांनी दावा केला आहे की आरटीओ अधिकाऱ्यांनी एक ट्रक थांबवला होता. हा ट्रक रस्त्याकडेला उभा होता. ट्रकचालक तिथून ट्रक काढत असताना टेम्पो ट्रॅव्हलरने मागून धडक दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील जखमी प्रवाशांच्या दाव्याला दुजोरा दिला आहे. तसेच या घटनेतील दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वी ठाण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना समृद्धी महामार्गावरील अपघाताबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, समृद्धी महामार्गावरील अपघाताची घटना अतिषय दुर्दैवी आहे. मी या अपघाताची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अपघाताच्या प्राथमिक पाहणीनुसार, आरटीओने ट्रक थांबवला होता. त्या ट्रकला ही टेम्पो ट्रॅव्हलर गाडी धडकली. यामध्ये आरटीओचे जे अधिकारी दोषी असतील किंवा ट्रकचा चालक असेल, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. त्याचबरोबर याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा >> समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, छ. संभाजीनगरमध्ये टेम्पो ट्रॅव्हरलची ट्रकला धडक, १२ ठार, २३ जखमी

मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश

एकनाथ शिंदे म्हणाले, या घटनेबाबत मी पोलीस महानिरीक्षकांशी, तिथल्या पोलीस अधीक्षकांशी बोललो. मी त्यांना याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना मदत देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. तसेच जखमींवरील उपचारांचा खर्च आपलं सरकार करेल. आमच्या कॅबिनेटमधील मंत्री दादा भुसे, संदीपान भुमरे, तसेच अतुल सावे, रमेश बोरनारे यांनी आज घटनास्थळी भेट दिली, तसेच जखमींची विचारपूसही केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde how did samruddhi expressway accident happened order of action against convicts asc