मी गगराणी यांना भेटण्यासाठी गेलो होतो. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट घेतलेली नाही. गगराणी यांच्याकडे माझं काम होतं म्हणून भेटायला गेलो होतो. उगाचच मी आणि मुख्यमंत्री भेटलो, आमची गुप्त बैठक झाली अशा बातम्या देण्यात आल्या अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. पत्रकारांच्या बुद्धिवर काय करावं? असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले. जितेंद्र आव्हाड सह्याद्री अतिथीगृहात गेले होते त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली अशा बातम्या आल्या होत्या. त्याबाबत आज जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सह्याद्री अतिथीगृहावर मी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलोच नव्हतो

सह्याद्री अतिथी गृहावर मी गेलो होतो. मी माझ्या कामासाठी गेलो होतो. पण एवढी घाई पत्रकारांनी केली. माझी आणि मुख्यमंत्र्यांची गुप्त भेट झाल्याच्या बातम्या देऊनही टाकल्या. मला दुर्दैवाने हे म्हणावं लागतं आहे की मी आणि मुख्यमंत्री बंद दाराआड भेटलो या बातम्या चालवून टाकल्या. नशीब की दरवाजाला कडी लावली आहे अशी बातमी दिली नाही, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी कुठलीही भेट झाली नसल्याचं सांगितलं आहे. या बातम्या चुकीच्या पद्धतीने पसरवल्या गेल्या आहेत. मी उघडपणाने सांगितलं की मुख्यमंत्र्यांना एक सेकंदही भेटलो नाही. माझ्यावर ३५४ चा गुन्हा दाखल केला तेव्हाच मी त्यांना भेटलो होतो. इतकं घाणेरडं राजकारण माझ्याविरोधात केलं गेलं ते मी आयुष्यात विसरणार नाही असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात महापुरुषांच्या इतिहासाचं विद्रुपीकरण सुरू आहे

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात महापुरुषांच्या इतिहासाचं विद्रुपीकरण सुरू आहे. हा एक कट आहे. ज्येष्ठ तत्वज्ञ अँतोनियो ग्रामची असं म्हणाले होते की एखादा समाज तुमच्यामागे येत नसेल तर त्या समाजाचे उद्ध्वस्त करा, त्याचे आदर्श उद्ध्वस्त केले की तो आपोआप तुमच्यमागे येईल. सध्या राज्यात हेच सुरु आहे. महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा सातत्याने अपमान करणं सुरु आहे. आधी अशा महापुरुषांबाबत उपहासात्मक बोलायचं आणि एक नवा वाद निर्माण करायचा असं सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्राला खरा इतिहास समजावा म्हणून आम्ही बाहेर पडतो आहोत. माझ्यासोबत सुषमा अंधारे, संभाजी भगत, वैशाली डोळस आम्ही सोबत जाऊन महाराष्ट्राचा दौरा करणार आहोत.आवाज बहुजनांचा, सन्मान महाराष्ट्राचा असा हा दौरा असणार आहे असंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

कोण कुठला धीरेंद्र?

तो कोण कुठला धीरेंद्र येतो आणि तुकाराम महाराजांबाबत बोलतो? त्याल लोक उगाच बाबा वगैरे म्हणतात, तो चपला खाण्याच्या लायकीचा आहे असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. आमची विचारांची लढाई आहे आम्ही लढाई तशीच लढणार आहोत. धीरेंद्र महाराज वगैरे नाही तो धीरेंद्र चपला खाण्याच्या लायकीचा आहे. कोण कुठला तो असं बोलतो. मराठी माणूस षंढ झालेला नाही. नेमके जे कर्मकांडाच्या विरोधात उभे राहिले त्यांच्यावरच टीका करत आहेत असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंं आहे. आमचा दौरा याचसाठी आम्ही काढतो आहे. आमचा दौरा हा अराजकीय असणार आहे असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I had met the chief minister only on the day a case under 354 was registered against me know what jitendra awhad said rno scj
First published on: 02-02-2023 at 18:55 IST