वाई : सातारा हा निसर्ग संपन्न जिल्हा आहे, एका बाजूला मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे, तर दुसऱ्या बाजूला दुष्काळ आहे, अशा भौगोलिक दृष्ट्या विविधतेने संपन्न असलेल्या सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असल्याचे साताऱ्याचा नव्याने पदभार घेतलेले जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आज पत्रकारांशी संवाद साधला. विकास हा येणाऱ्या काळात नक्कीच करण्यात येईल. सर्वसमावेशक सर्व लोकांना बरोबर घेऊन सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध राहणार असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा – सांगली : भक्ष्याच्या शोधात बिबट्या विहिरीत

महाबळेश्वर, पाचगणी, कास येथील अतिक्रमण भागातील सर्व कागदपत्रांची छाननी ही मी स्वतः करणार असून कायद्याच्या आदेशाचा सर्वोच्च सन्मान राखला जाणार आहे. कायद्याप्रमाणे जी काय आवश्यक कारवाई आहे ती केली जाणार आहे. तसेच निसर्गाचाही समतोल राखण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. कुणाच्याही पोटावर विनाकारण पाय येऊ नये याची खबरदारीही माझं प्रशासन घेईल, असं आवर्जून जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.

तत्कालीन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी चांगले उपक्रम विकासासाठी राबवले, त्या चांगल्या परंपराही यापुढे सुरू ठेवल्या जातील. तसेच कास, महाबळेश्वर येथील अतिक्रमणांच्या संदर्भात त्याचा पाठपुरावा करून त्याची अंमलबजावणी करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. कायदेशीर बाबींचे तथ्य तपासूनच पुढील निर्णय घेतला जाईल. डुडी पुढे म्हणाले, कोणताही निर्णय धडकपणे घेणे हे सहज शक्य आहे. मात्र असे निर्णय चिरकाल टिकत नाहीत, त्यामागे कृतिशील रचनात्मक कामाची बैठक असावी लागते. त्यासाठी व्यापक प्रयत्नांची आवश्यकता असते, त्यामुळे माझा जिल्ह्याचा अभ्यास सुरू झाला असून सर्व विभाग प्रमुखांच्या बैठका यापुढे वारंवार घेतल्या जातील.

महाबळेश्वर येथे तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शंभर कोटींचा आराखडा राबवला होता. त्या आराखड्याचा अभ्यास करून त्या धरतीवर सातारा, पाचगणी, कास तसेच इतर ब आणि क वर्गाची जी पर्यटन स्थळे आहेत त्यांना कशा सुविधा देता येतील याचा आराखडा अभ्यास करून बनवला जाईल, असे ते म्हणाले. ज्या पद्धतीने महाबळेश्वर येथे मधाचे गाव मांघर म्हणून प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील उत्पादनक्षम गावांचा अभ्यास करून त्या त्या ठिकाणी ती उत्पादने वाढवण्याच्या दृष्टिकोनातून निश्चित भर दिला जाईल. याशिवाय गौण खनिज, वाळू लिलाव तसेच इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर निश्चितच मार्ग काढून त्याची माहिती दिली जाईल, असे ते म्हणाले.

हेही वाचा – शरद पवारांना आलेल्या धमकीनंतर राष्ट्रवादीचा मुनगंटीवार, राणे-पडळकरांवर गंभीर आरोप; म्हणाले, “त्या ट्विटर अकाऊंट्सचे…”

जिल्ह्याचे पुनर्वसन, सिंचन, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण याचे कोणते प्रश्न आहेत हे समजून घेणे सोपे जाणार आहे. सर्वसामान्यांच्या कामांना कधीही न अडवता तात्काळ ते निकाली कसे निघतील याची दक्षता घेतली जाईल. त्यामुळे मला थोडासा वेळ द्या, या वेळेत सर्व प्रश्नांचा अभ्यास करून त्यानुसार कामाचे प्राधान्यक्रम ठरवलं जाईल. सातारा जिल्हा कशात आघाडीवर आहे आणि काय होणे गरजेचे आहे याचा ताळमेळ साधूनच विकास कामाच्या मुद्द्यांवर बोलणे इष्ट ठरेल, असे ते म्हणाले.

दोन दिवसांपूर्वी दिव्यांग बांधवांचे नुकतेच आंदोलन पालकमंत्र्यांच्या घरासमोर झाले होते, याबाबत दिव्यांग बांधवांची बैठक घेऊन त्यावर उपाययोजना केल्या जातील. आगामी पावसाळ्याच्या दृष्टिकोनातून सातारा जिल्ह्यातील ४२ गावे दरड प्रमुख क्षेत्रामध्ये येतात तेथील भूवैज्ञानिक सर्वेक्षण करून तज्ञांची मते आजमावली जाणार आहेत, त्या पद्धतीने त्या गावांच्या पुनर्वसनाच्या उपाययोजना केल्या जातील.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra dudi said that he is committed for the overall development of satara ssb
First published on: 09-06-2023 at 18:25 IST