लातूर : महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले तीन दिवसाच्या लातूर दौऱ्यावर आले होते या दौऱ्यातील बहुतांश वेळ औसा विधानसभा मतदारसंघासाठी त्यांनी खर्ची घातला. त्यांच्या उपस्थितीत औसा शहरातील विविध विकास कामाचे लोकार्पण एक मे रोजी करण्यात आले. शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालय, नगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेली नऊ सार्वजनिक स्वच्छतागृहे, औसा बस स्थानक ते उंबडगा रस्ता ,औसा ग्रामीण रुग्णालय ते लातूर रस्त्यावरील कारंजे खडी केंद्रापर्यंतचा रस्ता याचे लोकार्पण व मराठवाडा व कर्नाटक परिसरातील विठ्ठल भक्तांचे श्रद्धास्थान असलेले प्रति पंढरपूर म्हणून परिचित असलेले श्री क्षेत्र गोपाळपूर देवस्थान येथे पाच कोटी रुपये खर्चून भक्तासाठी आवश्यक सुविधा विकसित करण्याच्या कामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

गोपाळपूर देवस्थान येथे सांस्कृतिक सभागृह बांधकाम, प्रसादालय , सिमेंट काँक्रेटचा रस्ता ,नाली बांधकाम व स्वच्छतागृह बांधकाम करण्यासाठी ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत पाच कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला होता त्याचे भूमिपूजन पालकमंत्र्याच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी वर्ष ठाकूर- घुगे ,आमदार अभिमन्यू पवार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल मीना ,पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, मुख्य अभियंता श्रिनिवास कातकडे, अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख, कार्यकारी अभियंता देवेंद्र निळकंठ, औसा उपविभागीय अभियंता रोहन जाधव, उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार घनश्याम अडसूळ व गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे व नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश शिंदे उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी सर्वाधिक वेळ औसा विधानसभा मतदारसंघासाठी दिल्यामुळे व विविध कार्यक्रमात भोसलेंनी पवारांच्या पाठीशी राहावे असे आवाहन पालकमंत्र्यांनी केल्यामुळे त्यांच्या या विधानाची चर्चा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर सुरू होती.