सोलापूर : मागील शैक्षणिक वर्षाचे शुल्क न भरल्याने इयत्ता आठवीच्या वर्गात शिकणा-या एका विद्यार्थ्याला हिंदुस्थानी काॕन्व्हेंट चर्च इंग्रजी शाळेने गेल्या चार महिन्यांपासून  वर्गात बसू दिले नाही, अशी तक्रार दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या पालकाने केली आहे. दरम्यान, संबंधित शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांनी याबाबत आपणांस काहीच माहीत नसल्याचे सांगितले.

हेही वाचा >>> अर्भकमृत्यूदर एक अंकी करण्याचा आरोग्य विभागाचा संकल्प!

काही दिवसांपूर्वी याच शाळेने एकाच कुटुंबातील चार विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क न भरल्याने परीक्षेला बसू न दिल्याबद्दल पालक रमेश कोळी यांनी जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षणाधिका-यांकडे तक्रार केली होती. त्यांनी मुलांसह शळेसमोर ठिय्या मारला होता. त्यावेळी संबंधित चार विद्यार्थ्यांना पोलिसांनी चौकशीसाठी सदर बझार पोलीस ठाण्यात आणले होते. याप्रकरणी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी गंभुर दखल घेऊन संबंधित महिला पोलीस कर्मचा-यांना तडकाफडकी निलंबित केले होते. शिक्षणाधिका-यांमार्फत शाळेची  चौकशी प्रलंबित असतानाच आता याच शाळेत दुसरा प्रकार घडला आहे. आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या अथर्व कदम या विद्यार्थ्याचे वडील अनंत कदम हे दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत.

हेही वाचा >>> शंकर साखर कारखान्यावर मोहिते-पाटील गटाचे सर्व २१ जागांवर वर्चस्व

सध्या आर्थिक अडचण असल्यामुळे त्यांनी मुलाचे शैक्षणिक शुल्क भरले नाही. त्यासाठी त्यांनी शाळेकडे सवलत मागितली होती. परंतु सवलत नाकारून शैक्षणिक शुल्क भरल्याशिवाय वर्गात बसून देणार नाही, असे ठामपणे सांगत शाळेने अथर्व यास गेल्या नोव्हेंबरपासून वर्गात बसू दिले नाही, त्यास सहामाही आणि नऊमाही परीक्षेलाही बसू दिले नाही, असा आरोप अनंत कदम यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे. शाळेने अथर्व यास त्यांच्या  व्हाट्सअप ग्रुपमधून काढले. त्याच्या वर्गातील इतर मुलांना अथर्व यास नोटस् न देण्याबद्दल बजावले आहे. त्यामुळे शैक्षणिक नुकसान सोसत अथर्व हा प्रचंड मानसिक दडपणाखाली घरीच बसून असल्याचा आरोप अनंत कदम यांनी केला आहे. दरम्यान, यासंदर्भात हिंदुस्थानी काॕन्व्हेंट चर्च शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल विपत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत आपणांस काहीच माहीत नसल्याचे सांगितले. यापूर्वी चार विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क न भरल्याने परीक्षेला बसू दिले नसल्याबाबत पालकाच्या तक्रारीची चौकशी शिक्षण विभागाने केली आहे. परंतु हा दुसरा प्रकार आपल्याकडे आला नाही. त्याबद्दल माहिती घेतल्यावर सविस्तर स्पष्टीकरण देण्यात येईल, असे विपत यांनी सांगितले.