बॉलिवूड अभिनेता आमिर खान सध्या त्याचा ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटामुळे सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. आमिर मागच्या काही दिवसांपासून चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. या निमित्ताने चित्रपटाशी संबंधीत वेगवेगळे किस्से सोशल मीडियावर चर्चेत आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीतही आमिर खाननं त्याच्या आईचा एक किस्सा शेअर केला. हा किस्सा शेअर करतानाच आमिरनं आपल्या आतापर्यंतच्या यशाचं श्रेय त्याच्या आईला दिलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमिर खाननं नुकतीच ‘एबीपी माझा’ला मुलाखत दिली. आमिरच्या या मुलाखतीची सध्या बरीच चर्चा आहे. ही मुलाखत प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी घेतली होती. या मुलाखतीत आमिरने ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाचा संपूर्ण प्रवास कसा झाला हे सविस्तर सांगितलं. या मुलाखतीत आमिरला ‘तू एवढा संवेदनशील का आहेस?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना आमिरनं या चित्रपटातील भूमिकेवर आणि त्याच्या खऱ्या आयुष्यावरही त्याच्या आईचा कसा प्रभाव आहे हे सांगितलं.

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याशी बोलताना आमिर खान म्हणाला, “या चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा लाल सिंग चड्ढाची आहे आणि त्या भूमिकेत एक वेगळीच निरागसता आहे. त्यामुळे हे व्यक्तिरेखा साकारणं थोडं आव्हानात्मक होतं. पण मी आज जो काही आहे ते माझ्या आईमुळे आहे. या भूमिकेवर आणि माझ्या संपूर्ण आयुष्यावर माझ्या आईचा फार मोठा प्रभाव आहे. तिच्यामुळेच मी या भूमिकेसाठी अपेक्षित असलेली निरागसता माझ्या चेहऱ्यावर आणू शकलो.”

आमिर पुढे म्हणाला, “माझ्या बालपणीचा एक किस्सा आहे. मला आजही ते सर्व लख्ख आठवतंय. मला त्यावेळी टेनिस खेळण्याची आवड होती आणि मी जवळपास रोज मॅच जिंकत असे. मी घरी आल्यावर नेहमी आई विचारायची, आज काय झालं? आणि मी तिला सांगायचो मी जिंकलो. असंच एक दिवस तिने मला विचारलं आणि मी नेहमीप्रमाणे जिंकलो असं उत्तर दिलं. आम्ही सर्वजण त्यावेळी संध्याकाळचा चहा घेत होतो आणि आई अचानक स्वतःशीच म्हणाली, आज तू ज्याच्याशी खेळलास तो मुलगा पण घरी गेला असेल आणि त्याच्या आईने त्याला विचारलं असेल की काय झालं. पण जेव्हा तो म्हणाला असेल की मी हरलो तेव्हा त्याच्या आई वाईट वाटलं असेल ना?”

आईचा किस्सा सांगताना आमिर म्हणतो, “आई स्वतःशीच बोलत होती. पण जेव्हा ती म्हणाली की त्याच्या आईला वाईट वाटलं असेल ना? तेव्हा अचानक माझ्या लक्षात आलं. अरे आपण तर हा विचार केलाच नाही. त्यानंतर माझ्या मनात माझ्या त्या प्रतिस्पर्धीबद्दल सहानुभूती दाटून आली. मला वाटतं अशा प्रकारे माझ्या आईने मला त्यावेळी वेगवेगळ्या प्रसंगातून शिकवण दिली. तिच्यामुळेच मी एवढा संवेदनशील आहे. निरागस आहे आणि तेच या भूमिकेसाठी मला उपयोगी पडलं.”

दरम्यान आमिर खानचा अद्वैत चंदन दिग्दर्शित ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट येत्या ११ ऑगस्ट २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील आमिर खानच्या लूकची विशेष चर्चा होत आहे. या चित्रपटात करीना कपूर खान आणि मोना सिंग यांच्याही भूमिका आहेत. दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan nagraj manjule interview actor share special memories about his mother mrj
First published on: 07-08-2022 at 23:00 IST