ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दिन शाह हे त्यांच्या बेधडक स्वभावासाठी आणि लाजवाब अदाकारीसाठी लोकप्रिय आहेत. चित्रपट, ओटीटी, नाटक अशा तीनही माध्यमांत नसीरुद्दिन यांनी उल्लेखनीय काम केलं. सध्या ते त्यांच्या ‘ताज: डिव्हाइड बाय ब्लड’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहेत. ते यात मुघल सम्राट अकबराची भूमिका साकारत आहेत. या वेब सीरिजवरूनही बराच गदारोळ झाला होता, पण लोकांना ही सीरिज आवडली असून याचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच 'Tried and refused productions' या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील अनुभवाबद्दल भाष्य केलं. तसंच या मुलाखतीमध्ये नसीरुद्दिन शाह यांच्या उर्दू भाषेवरील प्रेमाचाही उल्लेख निघाला. नसीरुद्दिन यांची उर्दूवर चांगलीच पकड आहे, पण तरी या भाषेकडे काही लोक राजकीय दृष्टिकोनातून बघतात याबद्दल नसीरुद्दिन यांनी भाष्य केलं आहे. आणखी वाचा : "ते चौघेही मुस्लिम…" नसीरुद्दीन शाह यांनी सांगितला 'A Wednesday' चित्रपटादरम्यानचा 'तो' किस्सा या मुलाखतीमध्ये ते म्हणाले, "आजही कोण्या एका युनिव्हर्सिटीमध्ये उर्दू ही फॉरेनची भाषा मानली जाते याचे वाईट वाटते. मी ज्यांना अभिनय शिकवतो त्या विद्यार्थ्यांना बऱ्याचदा हा प्रश्न विचारला आहे की पाकिस्तान सोडून असा एखादा देश सांगा जिथे उर्दू बोलली जाते. पाकिस्तानमध्येही उर्दूपेक्षा पंजाबी, पश्तून आणि इतर भाषा जास्त बोलल्या जातात. यावर त्यांच्याकडे उत्तर नसते. पाहायला गेले तर भारत हा एकमेव असा देश आहे जिथे उर्दू बोलली जाते, उर्दूचा जन्म भारतात झाला, इथेच ती भाषा नावारूपाला आली. कारण इतर बऱ्याच भाषांमधून उर्दू तयार झाली आहे." पुढे ते म्हणाले, "उर्दूमध्ये हिंदी, तुर्की, पर्शियन, अरेबिक असे वेगवेगळे शब्द आहेत. या सगळ्यांचे एकत्रित स्वरूप म्हणजे उर्दू भाषा आहे." याबरोबरच मराठी भाषेतही बरेच असे शब्द आहेत, जे पर्शियन आहेत, असाही दावा नसीरुद्दिन यांनी या मुलाखतीमध्ये केला आहे. नसीरुद्दिन शाह यांची आगामी वेब सीरिज ‘ताज’ ही तुम्हाला ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.