अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा तिच्या ‘व्हॉट द हेल नव्या’ या पॉडकास्टमुळे खूप लोकप्रिय आहे. यामध्ये ती तिची आई श्वेता बच्चन आणि आजी जया बच्चन यांच्याशी विविध विषयांवर गप्पा मारते. नवीन पॉडकास्टवर तिची मामी ऐश्वर्या राय बच्चन असेल का? हा प्रश्न विचारल्यावर तिने उत्तर देणं टाळलं होतं. आता नव्याने एका मुलाखतीत तिची मामेबहीण आराध्याबद्दल विधान केलंय.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ ला दिलेल्या मुलाखतीत नव्याला १२ वर्षांच्या आराध्याला काय सल्ला देशील असं विचारण्यात आलं. त्यावर नव्या म्हणाली की ती १२ वर्षांची असताना जशी होती, त्यापेक्षा आराध्या खूप जास्त हुशार आहे. “आराध्या १२ वर्षांची आहे, पण ती तिच्या वयाच्या तुलनेने खूप जास्त हुशार आहे आणि तिला मी आयुष्याबद्दल कोणताही सल्ला देण्याची गरज नाही. आजकालची तरुण पिढी त्यांच्याहून वयाने मोठ्या असलेल्या लोकांपेक्षा खूप हुशार आहेत. त्यांच्यात जगाला चांगल्यासाठी बदलण्याची इच्छा आहे,” अशा शब्दांत नव्याने कौतुक केलं.

सलमान खानचं गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घर कसं दिसतं? पाहा Inside Photos

आराध्याकडे बघून प्रेरणा मिळत असल्याचं नव्याने म्हटलं. “मला तिचं कौतुक वाटतं की इतक्या लहान वयात, तिला गोष्टींची जाणीव आहे आणि ती खूप समजूतदार आहे. गोष्टी शेअर करण्यासाठी घरात एक लहान बहीण असल्याचा मला आनंद आहे पण मला वाटत नाही की मी तिला सल्ला देऊ शकेन, कारण ती खूप आत्मविश्वासू आणि काय घडतंय याची पुरेपूर जाणीव असलेली मुलगी आहे, ही कौतुकास्पद गोष्ट आहे, असं मला वाटतं,” असं नव्या न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

नव्या नवेली नंदा ही अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता बच्चन व निखिल नंदा यांची मुलगी आहे. तर, आराध्या ही ऐश्वर्या व अभिषेक यांची मुलगी आहे. आराध्या व नव्या या दोघींचं बाँडिंग खूप चांगलं आहे. अनेकदा श्वेता आराध्याचं कौतुक करताना दिसते.