अनेक वेळा बॉलिवूडमधील प्रस्थापित कलाकारांची पुढची पिढी बॉलिवूडच्या मायाजाळात आपले पाय रोवण्यासाठी खटाटोप करताना दृष्टीस पडते. काहींची मुलं चांगली कामगिरी करीत यशाची शिखरे गाठतात, तर काहींना एखाद-दुसऱ्या चित्रपटावर समाधान मानून काढता पाय घ्यावा लागतो. आता यात भर पडत आहे ती गतकाळची अभिनेत्री बिंदिया गोस्वामीच्या (दत्त) मुलीची. बिंदिया गोस्वामीची मुलगी निधी लवकरच एका चित्रपटात काम करताना दिसणार आहे. बिंदिया गोस्वामीने आपल्या सुरुवातीच्या काळात गोलमाल आणि खट्टा मिठासारख्या अनेक चित्रपटातून कौटुंबिक प्रकारातील भूमिका साकारल्या. निधीनेदेखील आपल्या पाऊलावर पाऊल ठेवत अशाचप्रकारच्या भूमिका साकाराव्यात, अशी तिची इच्छा आहे. चित्रपटकर्ता जे. पी. दत्ता यांची पत्नी बिंदिया जे. पी. जेने या आपल्या चित्रपट निर्मितीसंस्थेद्वारे निधीला लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. आजही आपण मुलीबरोबर बसून आपला कोणताही चित्रपट पाहू शकतो असे म्हणणाऱ्या बिंदियाची आपल्या मुलीनेदेखील अशाच प्रकारचे काम करावे, अशी इच्छा असल्याचे सूत्रांकडून समजते. १९८४ साली जे. पी. दत्ता यांच्याशी लग्न केल्यानंतर बिंदिया चंदेरी पडद्यावरून दिसेनाशी झाली. असे असले तरी, या काळात तीने पती जे. पी. दत्ता यांच्या चित्रपटासाठी कॉश्चुम डिझायनरचे काम करीत स्वत:ला व्यस्त ठेवले. आता ती निधीच्या पहिल्या चित्रपटासाठी उत्सुक असून, चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनचे काम आणि चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटाच्या नावाची निश्चिती होणे अद्याप बाकी आहे. गेल्या तीन दशकांत चित्रपटसृष्टीने कात टाकली आहे. आता चित्रपट अधिक बोल्ड आणि वास्तववादी बनत आहेत. असे असले तरी, आपली मुलगी स्वत:मधील अंगभूत गुणांना प्राधान्य देणाऱ्या चित्रपटकथेवर लक्ष केंद्रित करेल, अशी बिंदियाला आशा आहे.
 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Golmaal actress bindiya goswami wants daughter to do her kind of films