malaika arora open up about marriying with arjun kapoor and having child at moving in with malaika | अर्जुन कपूरशी लग्न आणि आई होण्याबाबत मलायकाने सोडलं मौन; म्हणाली, "या काल्पनिक गोष्टी..." | Loksatta

अर्जुन कपूरशी लग्न आणि आई होण्याबाबत मलायकाने सोडलं मौन; म्हणाली, “या काल्पनिक गोष्टी…”

मलायका अरोराने तिच्या ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ शोमध्ये अर्जुन कपूरबरोबरच्या नातेसंबंधांवर भाष्य केलं. तिने लग्न आणि पुन्हा आई होण्याबाबत प्रतिक्रिया दिली

अर्जुन कपूरशी लग्न आणि आई होण्याबाबत मलायकाने सोडलं मौन; म्हणाली, “या काल्पनिक गोष्टी…”
मलायकाने अर्जुन कपूरशी लग्न आणि पुन्हा आई होण्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. (फोटो सौजन्य- मलायका अरोरा इन्स्टाग्राम)

अभिनेत्री मलायका अरोराची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. तिचा ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ हा रिअलिटी शो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये मलायकाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले आहेत. तसेच या शोसाठी मुलगा अरहान आणि बॉयफ्रेंड अर्जुन कपूरने कशाप्रकारे पाठिंबा दिला हेही सांगितलं. या शोमध्ये तिने अर्जुन कपूरशी लग्न आणि पुन्हा आई होण्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

मलायका अरोराने तिच्या ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ शोमध्ये अर्जुन कपूरबरोबरच्या नातेसंबंधांवर भाष्य केलं. पहिल्या एपिसोडमध्ये फराह खानने मलायकाच्या शोमध्ये गेस्ट म्हणून हजेरी लावली होती. यावेळी तिने मलायकाला, “तुझ्या नातेसंबंधांबद्दल बोलल्या जाणाऱ्या गोष्टींचा सामना तू कसा करतेस?” असा प्रश्न विचारला. दरम्यान यावेळी फराह खानने स्वतःच्या लग्नाचाही उल्लेख केला. जेव्हा फराहने स्वतःपेक्षा ८ वर्षांनी लहान व्यक्तीशी लग्न केलं होतं तेव्हा तिलाही समाजाकडून बरंच काही ऐकावं लागलं होतं. जे आता मलायकाबरोबरही घडत आहे.

आणखी वाचा- आधी स्वतःबद्दल भरभरून बोलली, नंतर ढसाढसा रडली, मलायकाबरोबर नेमकं काय घडलं?

फराहच्या प्रश्नाचं उत्तर देताना मलायका म्हणाली, “हे कधीच सोपं नव्हतं. मला रोज नवीन काहीतरी ऐकावं लागतं. तू त्याच्यापेक्षा वयाने मोठी आहेस असं अनेकदा बोललं जातं. जेव्हा एक पुरुष स्वतःपेक्षा २०-३० वर्षांनी लहान असलेल्या मुलीला डेट करत असतो तेव्हा त्याचं कौतुक केलं जातं. त्याला राजासारखं वागवलं जातं. पण जेव्हा एक स्त्री स्वतःपेक्षा वयाने लहान असलेल्या मुलाला डेट करते तेव्हा तिला ‘आई आणि मुलाची जोडी’ असं म्हणून हिणवलं जातं. मला याचं वाईट वाटतं की हे सगळं बाहेरच्या लोकांनी नाही तर माझ्या जवळच्या लोकांनी मला ऐकवलं आहे.”

आणखी वाचा- “…म्हणून माझ्याऐवजी मलायकाची निवड झाली” शिल्पा शिरोडकरने सांगितलं ‘छैया छैया’ गाण्यात तिला न घेण्यामागचं कारण

फराह खानने या शोमध्ये मलायकाला तिच्या भविष्यातील नियोजनाविषयी प्रश्न विचारला, “तुझा भविष्याचा काय प्लॅन आहे? तुला पुन्हा लग्न करायचं आहे का? तुला पुन्हा आई व्हायचंय का?” त्यावर मलायका म्हणाली, “या सगळ्या काल्पनिक गोष्टी आहेत. अर्थातच मी आणि अर्जुन याबद्दल बोललो आहोत. आपण सगळेच आपल्या पार्टनरबरोबर अशा गोष्टीवर बोलतोच. मला वाटतं मी एका नात्यात खूप उत्तम व्यक्ती आहे. मी आजपर्यंत जे काही निर्णय माझ्या आयुष्यात घेतले आहेत ते सगळे यासाठी घेतले होते कारण मला आनंदी राहायचं होतं. आज माझ्या आयुष्यात जो माणूस आहे तो मला आनंदी ठेवत आहे. त्यावर आता लोक काय बोलतात याच्याशी मला काहीच देणं घेणं नाही.”

मराठीतील सर्व ओटीटी ( Ott ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 10:42 IST
Next Story
ओटीटीवरील सर्वात लोकप्रिय शो ‘पिचर्स’च्या दुसऱ्या सीझनची घोषणा; या दिवशी होणार प्रदर्शित