सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि ‘दृश्यम २’ फेम अभिनेता सिद्धार्थ बोडके यांचा लग्नसोहळा २६ फेब्रुवारी २०२४ रोजी थाटामाटात पार पडला. साखरपुडा, हळद, मग लग्न असे एकापाठोपाठ एक विधी करत त्यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला. तितीक्षा आणि सिद्धार्थच्या लग्नाला गौरी नलावडे, रसिका सुनील, खुशबू तावडे, संग्राम साळवी, अनघा अतुल, ऐश्वर्या नारकर, सुरुची अडारकर अशा बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती.

दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता नवजोडप्याने वेळात वेळ काढून त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यात त्यांनी कलाकार मंडळी आणि चाहत्यांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी कृतज्ञता व्यक्त केली आहे आणि त्यांचे आभार मानले आहेत. यात त्यांनी लग्नाचा व्हिडीओ शेअर करत कॅप्शन दिले, “आमच्या लग्नाच्या दिवशी आमच्यावर भरभरून प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव केल्याबद्दल आम्ही मनापासून तुमचे आभार व्यक्त करतो. तुमच्या प्रेमामुळे आमचा आनंद द्विगुणीत झाला आहे. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद हा एक अनमोल खजिना आहे, जो या आयुष्यभराच्या प्रवासात आम्हाला नक्कीच साथ देईल.”

हेही वाचा… पूजा सावंतच्या लग्नात सुखदा खांडकेकरच्या नखांची चर्चा; अभिनेत्रीकडून फोटो शेअर; म्हणाली, “आज या…”

तितीक्षा आणि सिद्धार्थच्या लग्नातील ‘चाहूल कुणाची’ हे गाणंही सध्या व्हायरल होत आहे. लग्नातील हे गाणं तितीक्षा आणि सिद्धार्थने खास बनवून घेतलं होतं आणि आणि काही दिवसांपूर्वी प्रपोजलच्या व्हिडीओमध्ये त्यांनी हे गाणं प्रदर्शित केलं होतं. आता ‘स्पॉटिफाय’, ‘ॲपल म्युझिक’ आणि इतर ॲप्सवरही हे गाणं ऐकायला मिळणार आहे. या गाण्याची स्टोरी शेअर करत दोघांनी लिहिले, ‘चाहूल कुणाची’ आता ‘स्पॉटिफाय’, ‘ॲपल म्युझिक’, ‘जिओ सावन’ आणि अर्थातच इन्स्टाग्राम रिल्सवर उपलब्ध आहे.”

पुढे प्रेक्षकांना संबोधित करत त्यांनी म्हटले, “या गाण्यावर रिल्स करा आणि आम्हाला टॅग करायला विसरू नका.”

हेही वाचा… अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग कार्यक्रमासाठी बॉलीवूड कलाकारांची मांदियाळी, पाहा व्हिडीओ

दरम्यान, तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडकेने ‘तू अशी जवळी रहा’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. त्यानंतर गेल्या अनेक महिन्यांपासून तितीक्षा-सिद्धार्थच्या डेटिंगच्या चर्चा सोशल मीडियावर चालू होत्या. अखेर ८ फेब्रुवारीला एकत्र फोटो शेअर करत या जोडप्याने इन्स्टाग्रामवर प्रेमाची जाहीर कबुली दिली. दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास, तितीक्षा सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे, तर सिद्धार्थ बोडके ‘दृश्यम २’ या बॉलीवूड चित्रपटात व ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटात झळकला होता.