मुंबई : विनातिकीट प्रवाशांच्या मुसक्या आवळण्यासाठी पश्चिम रेल्वेवरील मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा, लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्या, प्रवासी रेल्वेगाड्या आणि सुट्टीकालीन विशेष रेल्वे गाड्यांमध्ये नियमित तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ व्यावसायिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तिकीट तपासणी पथकाने एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत अनेक वेळा तिकीट तपासणी मोहीम राबविली असून या मोहिमेत १३४.२८ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. मुंबई उपनगरीय विभागात दंडापोटी वसूल करण्यात आलेल्या ४२.७४ कोटी रुपयांचा त्यात समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पश्चिम रेल्वेवरून दररोज १,४०६ लोकल फेऱ्या धावतात. या लोकल फेऱ्यांमधून सुमारे ३० लाख प्रवासी प्रवास करतात. परंतु, हजारो नागरिक तिकीट न काढताच प्रवास करीत असल्याने या प्रवाशांची नोंद होत नाही. त्यामुळे तिकीटधारक प्रवाशांना योग्य सुविधा पुरवण्यात काही वेळा अडचणीचे ठरते. तसेच पश्चिम रेल्वेवर सध्या १०९ वातानुकूलित लोकल फेऱ्या धावतात. यामधून दररोज सुमारे १.२६ लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र, गर्दीचा फायदा घेऊन अनेक विनातिकीट प्रवासी वातानुकूलित लोकलमधून प्रवास करतात. अशा प्रवाशांना रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत. २०२४-२५ या आर्थिक वर्षात (फेब्रुवारी २०२५ पर्यंत) म्हणजे गेल्या १० महिन्यांत मुंबई सेंट्रल विभागाच्या तिकीट तपासणी पथकाने वातानुकूलित लोकलमध्ये विनातिकीट प्रवाशांची ५७ हजार प्रकरणे सापडली. या प्रकरणांमध्ये १.९० कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली.

फेब्रुवारी २०२५ मध्ये २.५५ लाख तिकीट नसलेल्या / अनियमित प्रवाशांना शोधून १६.७४ कोटी रुपये वसूल करण्यात आले. आरक्षित न केलेल्या सामानाच्या प्रकरणाचा त्यात समावेश आहे. तसेच, पश्चिम रेल्वेने मुंबई उपनगरीय विभागात फेब्रुवारी महिन्यात ९४ हजार प्रकरणे शोधून ४.६४ कोटी रुपये दंड वसूल केला. तसेच वातानुकूलित लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तक्रार करण्यासाठी मदतवाहिनी क्रमांक १३९ उपलब्ध करण्यात आला आहे. तसेच व्हाॅट्स ॲप संदेश क्रमांक ९००४४९७३६४ वरही तक्रार करता येणार आहे. या तक्रारींची त्वरित दखल घेऊन निवारण करण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे प्रशासन विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी आणि तिकिटधारक प्रवाशांना आरामदायी प्रवास करता यावा यासाठी अथक प्रयत्न करीत आहे. प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी योग्य आणि वैध रेल्वे तिकिटे खरेदी करून प्रवास करावा, असे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 134 crore fine from ticketless railway passengers mumbai print news ssb