लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : वरळी-शिवडी उन्नत रस्त्याच्या कामाअंतर्गत मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील १२५ वर्ष जुना प्रभादेवी पूल पाडून तेथे नवीन द्विस्तरीय पूल (डबलडेकर ब्रिज) मुंबई महागनर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) बांधण्यात येणार आहे. त्यासाठी हा पूल पुढील २० महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार असून पुलाचे बांधकाम आणि पुनर्बांधणीसाठी वाहतूक पोलिसांनी अखेर एमएमआरडीएला ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे.

त्यानुसार शुक्रवारी रात्री ९ वाजल्यापासून प्रभादेवी पूल वाहतूकीसाठी बंद होणार आहे. त्यानंतर पुलाचा ताबा घेऊन एमएमआरडीएकडून पाडकामास सुरुवात केली जाणार आहे. येत्या चार-पाच दिवसांत प्रत्यक्ष पाडकामास सुरुवात होणार असून ते १० जुलैपर्यंत सुरु राहणार आहे. त्यानंतर नवीन पुलाच्या कामास सुरुवात करण्यात येणार आहे. दरम्यान पाडकामासाठी एमएमआरडीएची सर्व तयारी पूर्ण झाली असून पथक तयार करण्यात आले आहे. पाडकामासाठी एमएमआरडीएकडून ८०० मेट्रीक टन क्षमतेच्या क्रेनचा वापर करण्यात येणार आहे.

दक्षिण मुंबईतून अटल सेतूला अतिजलद जाता यावे यासाठी एमएमआरडीएकडून ४.५ किमी लांबीचा वरळी-शिवडी उन्नत रस्ता बांधला जात आहे. हा रस्ता १२५ वर्ष जुन्या अशा प्रभादेवी पुलावरुन जाणार आहे. मात्र, पुलाची दुरवस्था झाल्याने पुलाची पुनर्बांधणी करणे आवश्यक होते. ही जबाबदारी एमएमआरडीएने घेतली. त्यानुसार उन्नत रस्ता प्रकल्पाअंतर्गत सध्याचा पूल पाडून तेथे नवा पूल बांधण्याचे नियोजन करण्यात आले.

पाडकाम आणि नवीन पुलाचे काम करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया सुरु होती. मात्र काही कारणाने ही परवानगी मिळत नव्हती. पण आता मात्र वाहतूक पोलिसांनी प्रभादेवी पूल बंद करून तो पाडण्यास आणि नवीन पुलाचे बांधकाम करण्यासाठी अखेर ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यानुसार शुक्रवारी रात्री ९ वाजता प्रभादेवी पूल वाहतुकीसाठी बंद होणार आहे. त्यानंतर पुलावरील विविध सेवा वाहिन्या (युटिलिटीज) बंद करण्याच्या, काढण्याच्या कामास सुरुवात होईल. त्यानंतर चार-पाच दिवसात पुलावर पहिला हातोडा पडण्याची शक्यता आहे.

पाडकाम कसे होणार?

पुलाच्या पाडकामास सुरुवात झाल्यानंतर १० जुलैपर्यंत पाडकाम सुरु राहील. पाडकामासाठी रेल्वे वाहतूक ब्लाॅकची गरज लागणार आहे. त्यानुसार आवश्यकतेप्रमाणे रेल्वे वाहतूक ब्लाॅक घेत पाडकाम केले जाणार आहे. पुलातील स्टीलच्या तुळई (गर्डर) काढण्यासाठी एमएमआरडीएकडून ८०० मेट्रीक टन क्षमतेच्या क्रेनचा वापर केला जाणार आहे. तर ५०० मेट्रीक टन क्षमतेची दुसरी एक क्रेन राखीव म्हणून प्रकल्पस्थळी असणार आहे. क्रेनसह दोन पोक्लेन, १० डंपरचा वापर पाडकामासाठी करण्यात येणार आहे.

दरम्यान पाडकाम पूर्ण झाल्यानंतर तात्काळ नवीन द्विस्तरीय पुलाच्या कामास सुरुवात केली जाणार आहे. तर नवीन पुलाचे काम पूर्ण करत हा पूल वाहतूक सेवेत दाखल करण्यासाठी किमान दोन वर्षाची प्रतिक्षा मुंबईकरांना करावी लागणार आहे. दरम्यानच्या काळात वाहनचालक-प्रवाशी आणि पादचार्यांना गैरसोयीला,वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे. तर मोठा वळसा घालून वाहनांना जावे लागणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 150 year old bridge will be closed to traffic from tomorrow mumbai print news mrj