लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : निरनिराळे रंग, गुलालाची उधळण करीत शुक्रवारी मुंबईकरांनी धुळवडीचा आनंद लुटला, मात्र त्याचवेळी विविध ठिकाणी धुळवडीचा आनंद लुटताना ५२ जण जखमी झाले. यापैकी अनेकांच्या डोळ्याला, डोक्याला व पायाला मार लागला आहे. यापैकी दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उर्वरित जखमींना उपचार करून घरी पाठविण्यात आले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जखमींची संख्या कमी असून, गतवर्षी ९३ जण जखमी झाले होते.

मुंबईमध्ये गुरुवारी होळी, तर शुक्रवारी धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मात्र धुळवड साजरा करताना आपापसांत मारामारी, रंगामुळे डोळ्याला झालेला अपाय अथवा पडून ३९ जण जखमी झाले आहेत. या जखमींवर उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले. शीव रुग्णालयामध्ये १० जणांना अपघात विभागामध्ये नेण्यात आले होते. त्यातील दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी एका रुग्णाला अस्थिव्यंग विभागात, तर दुसऱ्याला शस्त्रक्रिया विभागामध्ये दाखल करण्यात आले आहे.

उर्वरित रुग्णांना उपचार करून घरी पाठविण्यात आल्याची माहिती शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली. धुळवड खेळताना डोक्याला मार लागल्याने, डोळ्याला दुखापत झालेले असे १० जण उपचारासाठी अपघात विभागामध्ये दाखल झाले होते. या सर्व रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थितर असल्याने त्यांना घरी पाठविण्यात आल्याची माहिती कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांनी दिली.

त्याचप्रमाणे केईएम रुग्णालयामध्ये सातजण उपचारासाठी दाखल झाले. यातील एका रुग्णाच्या डोळ्याला किरकोळ दुखापत झाली होती, तर अन्य सहा जणांपैकी काहींच्या डोक्याला तर काहींच्या हाता व पायाला दुखापत झाली होती. या सर्वांना उपचार करून घरी पाठविण्यात आल्याची माहिती केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी दिली. नायर रुग्णालयामध्ये दोघांवर उपचार करण्यात आल्याची माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी दिली. तसेच धुळवडीच्या वेळी झालेल्या मारामारीत जखमी झालेल्या दोघांना वांद्रे भाभा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. त्यांना किरकोळ दुखापत झाल्याने उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती वांद्रे भाभा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद खाडे यांनी सांगितले.

जे. जे. रुग्णालयामध्ये शुक्रवारी दुपारी १ वाजल्यानंतर सहा जण उपचारासाठी दाखल झाले होते. यातील सर्वांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांना उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली. त्याचप्रमाणे जी.टी. रुग्णालयामध्ये चार जण उपचारासाठी दाखल झाले. यामध्ये मारामारी झाल्याने एकजण जखमी झाला होता. तर होळी खेळताना दोघांच्या डोक्याला किरकोळ मार लागला होता. या चौघांवर अपघात विभागामध्ये उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जी.टी. रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जीतेंद्र संकपाळ यांनी दिली.

वरळी येथील पोदार आयुर्वेद रुग्णालय व महाविद्यालयात ११ रुग्ण दाखल झाले. यांना किरकोळ दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती पोदार आयुर्वेद रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संपदा संत यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 52 people injured while celebrating dhulwad two admitted to hospital mumbai print news mrj