लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : मुंबई पोलिसांनी नुकताच रेलिगेअर एन्टरप्रायझेस प्रा. लि. प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्याच्या आधारावर आता ईडीनेही याप्रकरणी गुन्हा (एन्फोर्समेंट केस इन्फर्मेशन रिपोर्ट) दाखल केला आहे. याप्रकरणी कंपनीच्या कार्यकारी अध्यक्ष डॉ. रश्मी सलुजा, सीएफओ नितीन अग्रवाल व अध्यक्ष निशांत सिंगल यांच्याविरोधात ईडीला बर्मन कुटुंबीयांबाबत चुकीची माहिती देणे व त्याआधारे १७९ कोटी रुपयांचा बेकायदेशीर फायदा घेतल्याचा आरोप आहे.

ईडीचे साहाय्यक संचालक राम नारायण यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी नुकताच माटुंगा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे. त्या प्रकरणातील तक्रारीनुसार, ईडी मलविंदर मोहन सिंह आणि इतरांविरुद्ध तपास करीत होती. त्यात बर्मन कुटुंबियांवरही आरोप करण्यात आले होते. हे प्रकरण वैभव जालिंदर गवळी (रिलिगेअर एंटरप्रायझेस लि. चे शेअर होल्डर) यांनी दाखल केले होते. त्याबाबत गवळी यांना ईडीने पुराव्यांसह बोलावले होते. त्यावेळी ते कोणतेही पुरावे देण्यास असमर्थ ठरले व त्यांनी हे प्रकरण रेलिगेअरच्या सलुजा यांच्या सूचनेवरून दाखल केल्याचे ईडीला दिलेल्या जबाबात सांगितले होते. त्यानुसार ईडीने बर्मन कुटुंबियांबाबत खोटी तक्रार करणे व ‘एम्प्लॉई स्टॉक ओव्हनरशिप प्लान’द्वारे निधी वळवून एकूण १७९ कोटी ५४ लाख रुपयांचा बेकायदेशीर फायदा घेतल्याप्रकरणी डॉ. रश्मी सलुजा, सीएफओ नितीन अग्रवाल व अध्यक्ष निशांत सिंगल व गवळी विरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती. त्याच्या आधारावर माटुंगा पोलीस ठाण्यात गेल्या आठवड्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या नव्याने दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यांच्या आधारावर ईडीनेही गुन्हा दाखल केला आहे. त्याला ईडीच्या अधिकाऱ्याने दुजोरा दिला.