लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) पाट्यांच्या नोंदणीसाठी बनावट संकेतस्थळ तयार करणाऱ्या आरोपीला बंगळूरू येथून अटक करण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. आरोपी बंगळुरू येथील रहिवासी आहे. या गुन्ह्यांतील सहा बनावट संकेतस्थळांपैकी एकाची निर्मिती आरोपीने केल्याचा संशय आहे. याप्रकरणी सायबर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाट्यांच्या नोंदणीसाठी बनावट लिंकद्वारे फसणूक करण्यात येत असल्याची तक्रार मुंबई पोलिसांना प्राप्त झाली होती. सहाय्यक परिवहन आयुक्तांनी ५ मार्च रोजी दक्षिण प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर फसवणूक करणाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्याप्रकरणी दक्षिण प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सायबर फसणूक करणाऱ्या भामट्यांनी सरकारी संकेतस्थळाप्रमाणे बनावट संकेतस्थळ बनवले होते.

याप्रकरणी दक्षिण प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर उपायुक्त दत्ता नलावडे यांनी याप्रकरणी तपासाचे आदेश दिले. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांनी पथक स्थापन केले. या पथकाने https://indnumberplate.com हे बनावट लिंक तयार करून फसवणूक करणाऱ्या आरोपीची माहिती घेतली. त्यावेळी संबंधित व्यक्ती बंगळुरू येथून बनावट संकेतस्थळ हाताळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बंगळुरू येथे जाऊन विनोद व्यंकट बावळे (५७) याला अटक केली. आरोपी तेथील मुथ्याल्लानगर येथे राहत होता.

परिवहन विभागाने उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाट्या नोंदणीसाठी तीन विक्रेत्यांची नियुक्ती केली आहे. त्यात रोस्मर्टा सेफ्टी सिस्टीम्स लि., रियल मॅझॉन इंडिया लि. आणि एफटीए एचएसआरपी सोल्युशन्स लि. यांचा त्यात समावेश आहे. सायबर फसणूक करणाऱ्यांनी रोस्मर्टा आणि रियल मॅझॉन यांची उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बनावण्यासाठी बनावट नोंदणी लिंक तयार केली. याबाबत कंपनीकडून परिवहन विभागाला कळवण्यात आले. फसवणूक करणाऱ्यांनी वाहनमालकांकडून उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्याच्या नावाखाली पैसे उकळल्याचा आरोप आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, परिवहन अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली, त्यानंतर भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्यांतर्गत अज्ञात व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

महाराष्ट्र परिवहन विभागाने एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी ३० जून २०२५ पूर्वी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवणे बंधनकारक केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, वाहन – संबंधित गुन्हे रोखण्यासाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी आवश्यक आहे. या सूचनेनंतर राज्यात वाहनांच्या पाट्या बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, वाहनमालकांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी मिळवण्यासाठी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी लिंक उपलब्ध करून दिली आहे. त्याचा गैरफायदा घेऊन आरोपी सामान्य नागरिकांची सायबर फसवणूक करीत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man arrested from bengaluru for creating fake website for hsrp plate mumbai print news mrj