मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेसाठीची मतदान प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या मतमोजणीला आणि त्यानंतर जाहीर होणाऱ्या निकालाला स्थगिती देण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, ठरल्याप्रमाणे शुक्रवारी मतमोजणी झाल्यानंतर निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निवडणूक पुढे ढकलण्याच्या विद्यापीठाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या युवा सेनेच्या याचिकेत महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनने (मासू) हस्तक्षेप याचिका करून मतमोजणी आणि निकालाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने उपरोक्त बाब स्पष्ट करून मासूची मागणी फेटाळली. तसेच, ठरल्यानुसार शुक्रवारीच मतमोजणी करण्याचे आणि त्यानंतर निकाल जाहीर करण्याचे स्पष्ट केले. त्याचवेळी, या प्रकरणी दाखल याचिका निकाली काढली.

हेही वाचा >>>पाणी उपसा करणारे पंप बंद, आपत्कालीन विभागात दूरध्वनीलाही प्रतिसाद नाही, आमदार सुनील प्रभू यांची आयुक्तांकडे तक्रार

मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक २४ सप्टेंबर रोजी घेण्याचे आदेश न्यायालयाने शनिवारी देऊन राज्य सरकार आणि मुंबई विद्यापीठ प्रशासनाला तडाखा दिला होता. तसेच, मतदानाच्या दोन दिवस आधी निवडणूक स्थगित करण्याच्या सरकार आणि विद्यापीठ प्रशासनाच्या निर्णयाबाबतही न्यायालयाने यावेळी प्रश्न उपस्थित केला होता.

हेही वाचा >>>अतिवृष्टीबाधित जोगेश्वरीवासियांना नुकसान भरपाई द्या- जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

तसेच, प्रकरणाची सुनावणी गुरुवारी ठेवली होती. त्यानुसार, गुरुवारी सुनावणी झाली असता न्यायालयाला दिलेल्या आश्वासनानुसार मतदान प्रक्रिया पार पडल्याचे आणि शुक्रवारी मतमोजणीनंतर निकाल जाहीर केला जाईल, असे विद्यापीठ प्रशासनातर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.

युवा सेनेच्या याचिकाकर्त्या उमेदवारांनीही आपल्याला याचिका निकाली काढण्यास काहीच हरकत नसल्याचे सांगितले. त्याचवेळी दोन्हींनी मासूच्या मागणीला विरोध केला. न्यायालयाने विद्यापीठ आणि याचिकाकर्त्यांचे म्हणणे मान्य करून मासूची मागणी फेटाळली व याचिका निकाली काढली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai university general assembly election result today mumbai amy