मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये पदवीच्या ३ आणि ४ वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची पहिली गुणवत्ता यादी गुरूवार, १३ जून रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रत्येक महाविद्यालय विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी त्यांच्या स्तरावर जाहीर करणार आहे. विद्यार्थ्यांना पहिली गुणवत्ता यादी संबंधित महाविद्यालयांच्या संकेतस्थळावरून पाहता येईल. पहिल्या गुणवत्ता यादीअंतर्गत संबंधित महाविद्यालयात जागा मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी आणि शुल्क भरून प्रवेश निश्चिती (हमीपत्र अर्जासह) १४ जून ते २० जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत होईल.

मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणीस विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून एकूण २ लाख ५० हजार ४५३ विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी केली आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी ८ लाख ७० हजार ५९५ एवढे अर्ज सादर केले आहेत. विद्याशाखानिहाय सादर केलेल्या प्रवेश अर्जांमध्ये सर्वाधिक वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेसाठी ४ लाख ७५ हजार ७९ एवढे अर्ज असून, विज्ञान विद्याशाखेसाठी २ लाख ९२ हजार ६०० अर्ज आणि मानव्यविज्ञान शाखेसाठी १ लाख २ हजार ८२५ एवढे अर्ज विद्यार्थ्यांनी सादर केले आहेत.

हेही वाचा…राहुल शेवाळे यांच्या बदनामीचे प्रकरण : ठाकरे, राऊत यांची विशेष न्यायालयात धाव

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार व महाराष्ट्र शासनाच्या २० एप्रिल २०२३ च्या शासन निर्णयानुसार ३ वर्षीय पदवी अभ्यासक्रम, ४ वर्षीय ऑनर्स / ऑनर्स विथ रिसर्च, पाच वर्षीय इंटिग्रेटेड प्रोग्राम्स विथ मल्टीपल एन्ट्री अँड मल्टीपल एक्जिट या अनुषंगाने ही प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये आणि स्वायत्त महाविद्यालयांनी निर्गमित केलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी तसेच महाविद्यालयांकडे असलेल्या प्रवेश क्षमतेनुसार, आरक्षणाचे नियम व तरतूद आणि अभ्यासक्रमांच्या पात्रतेनुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा…मतमोजणीत गैरप्रकार झाल्याची कीर्तिकर यांची तक्रार; ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रामध्ये फेरफार केल्याचा आरोप

बी.कॉम. अभ्यासक्रमासाठी सर्वाधिक अर्ज

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अर्जांमध्ये बी.कॉम. अभ्यासक्रमासाठी सर्वाधिक १ लाख ८८ हजार ३९० अर्ज, बी.कॉम. (मॅनेजमेंट स्टडीज) ४१ हजार ५१, बी.कॉम. (अकाऊंट ॲण्ड फायनान्स) १ लाख ११ हजार ८१२, बी.ए. ६० हजार ८२६, बी.एस्सी. आयटी १ लाख ४ हजार ९८४, बी.एस्सी. ४१,२९२, बी.एस्सी. संगणक शास्त्र ६६ हजार १८७, बीएएमएमसी (स्वायत्त) २५ हजार ६४०, बी.कॉम. (बँकींग ॲण्ड इन्शूरंस) (स्वायत्त) १२ हजार ९५२, बी.कॉम. (फायनान्शिअल मार्केट) (स्वायत्त) २५ हजार १२३, बी.एस्सी. (बायोटेक्नोलॉजी) (स्वायत्त) १८ हजार ९५३, बॅचरल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (ई-कॉमर्स) (स्वायत्त) १४ हजार ८६१ यासह विविध अभ्यासक्रमांनाही विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत.