मुंबई : भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार मुरजी पटेल यांची सुमारे साडेदहा कोटी रुपयांची तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके यांची सुमारे ९४ लाख रुपयांची मालमत्ता आहे. पटेल यांचे शिक्षण नववी उत्तीर्ण असून लटके या वाणिज्य शाखेच्या पदवीधर आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या उमेदवारांनी आपल्या अर्जासोबत निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार मुरजी पटेल यांची एकूण संपत्ती दहा कोटी ४१ लाख रुपयांची आहे. यापैकी पाच कोटी ४१ लाख रुपये मुरजी पटेल यांच्या नावावर आहेत तर पाच कोटी रुपयांची संपत्ती मुलांच्या नावावर आहे. अंधेरीमध्ये मुरजी पटेल यांच्या नावावर तीन फ्लॅट आहेत. गुजरातमधील कच्छ येथे पटेल व त्यांच्या पत्नीच्या नावे प्रत्येकी ३० एकर जमीन आहे. ही जमीन २०१३-१४ मध्ये ९८ लाख रुपयांमध्ये खरेदी केली होती. तिची सध्याची किंमत चार कोटी २५ लाख रुपये इतकी आहे. पटेल आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर दोन कोटी रुपयांचे कर्ज आहे.

ऋतुजा लटके यांच्याकडे ४३ लाख ८९ हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. ऋतुजा लटके यांच्यासह मुलांच्या नावावर १२.३५ एकर जमीन आहे. लटके यांच्यावर १५ लाख २९ हजाराचे गृह कर्ज आहे व त्यांच्याकडे ७५ हजार रुपयांची रोख रक्कम आहे. ऋतुजा लटके यांच्याकडे चिपळूण येथे सुमारे ५१ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता घराच्या स्वरूपात आहे.

अंधेरी पूर्व मतदारसंघात ३ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबर २०२२ रोजी मतदान होणार असून या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी ३ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईच्या इतर भागात कामाला जाणाऱ्या अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या क्षेत्रातील मतदारांना ही सुट्टी लागू असल्याचे आदेशात म्हटले आहे. तसेच केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना ही सार्वजनिक सुट्टी लागू आहे. आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून अंधेरी पूर्व भागातील मतदारांनी मोठय़ा प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murji patel passed ninth while rituja latke graduated patel family latke family property ysh