मुंबई : नायर रुग्णालयामध्ये डिसेंबरपासून पदव्युत्तर चिकित्सा प्रतिक्षमताशास्त्र आणि संधिवातशास्त्र (क्लिनिकल इम्युनोलॉजी ॲण्ड रुमॅटोलॉजी) हा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. यामुळे गरीब रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळण्यास मदत होणार आहे. हा अभ्यासक्रम सुरू करणारे नायर रुग्णालय महाराष्ट्रातील पहिले सरकारी रुग्णालय ठरणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मुलुंडमध्ये पदपथ खचल्याने सहा दुचाकींचे नुकसान

नायर रुग्णालयामधील संधिवातशास्त्र विभागाचा बाह्यरुग्ण विभाग आठवड्यातून दोन दिवस सुरू असतो. या विभागामध्ये आठवड्याला जवळपास १०० ते २०० रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र यासंदर्भातील पदव्युत्तर अभ्यासक्रम मोजक्याच महाविद्यालयांमध्ये शिकविण्यात येत आहे. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या फार कमी असल्याने संधिवाताच्या रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवेपासून वंचित राहावे लागते. नायर रुग्णालयामध्ये संधिवाताचे पदवीपर्यंतचे शिक्षण दिले जात असल्याने विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी अन्य महाविद्यालयांमध्ये जावे लागते. त्यामुळे संधिवातासाठी रुग्णालयात येणारे रुग्ण तज्ज्ञ डॉक्टरांना मुकतात. नायर रुग्णालयामध्ये संधिवाताच्या रुग्णांना विशेषोपचार मिळावेत यासाठी पदव्युत्तर चिकित्सा प्रतिक्षमताशास्त्र आणि संधिवातशास्त्र हा नवीन अभ्यासक्रम डीएनबीच्या माध्यमातून सुरू करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू असून, डिसेंबरपासून अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> परवडणारी घरे उपलब्ध करण्यासाठी म्हाडा कटिबद्ध- संजीव जयस्वाल

पदव्युत्तर चिकित्सा प्रतिक्षमताशास्त्र आणि संधिवातशास्त्र या अभ्यासक्रमामुळे नायरमध्ये तज्ज्ञ डॉक्टर घडण्यास मदत होणार आहे. यामुळे गरीब रुग्णांना उत्तम व चांगले उपचार मिळण्यास मदत होईल. हा अभ्यासक्रम राज्यामध्ये सरकारी रुग्णालयामध्ये प्रथमच सुरू करण्यात येत आहे. – डॉ. सुधीर मेढेकर, अधिष्ठाता, नायर रुग्णालय

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Post graduate rheumatology and clinical immunology coure will start in nair medical college mumbai print news zws