मुंबई : स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या गाण्यावरून शिवसेना आक्रमक झाली आहे. खारच्या युनिकॉन्टिनेन्टल हॉटेलमध्ये जाऊन शिवसेनेने तोडफोड केली आहे. या तोडफोड प्रकरणी खार पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना सरचिटणीस राहुल कनाल आणि वांद्रे विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांना पहाटेच्या सुमारास खार पोलिसांनी ताब्यात घेतले. खार पोलिसांनी 20 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात स्टुडिओमध्ये तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात केलेल्या विडंबन कार्यक्रमामुळे शिवसैनिकांननी समर्थकांनी संताप व्यक्त केला असून त्यांनी रविवारी रात्री खार येथील द युनिकॉन्टिनेंटल मुंबई हॉटेलवर हल्ला केला आणि तोडफोड केली.कुणाल कामराने खार येथील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबमध्ये शो घेतला होता. या क्लबमध्ये जाऊन एकनाथ शिंदेंच्या समर्थकांनी धुडगूस घातला. या क्लबमधील खुर्च्यांची आणि संपूर्ण सेटची तोडफोड करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच खिल्ली उडवल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले. त्यामुळे शिंदेंचा ठाण्यातही शिवसेनेच्या समर्थकांनी जोरदार निर्देशने केली. वागळे इस्टेट पोलीस ठाण्याबाहेरही शिवसैनिकांनी कुणाल कामराचे छायाचित्र जाळले.

खारमधील तोडफोडीप्रकरमी राहुल कनाल, कुणाल सरमळकर, अक्षय पनवेलकर, गोविंद पडी, राहुल तुरबाडकर, विलास चावरी, अमिन शेख, समीर महापदी, हिमांशू, शशांक कोदे. संदीप मालप, गणेश राणे, शोभा पालवे, कृष्णा ठाकूर, पवनज्योत सेठी, कल्पेश, कुरेशी हुजेफ, चांद शेख तसेच १५ ते २० कार्यकर्त्यांविरोधात सोमवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १३२, १८९(२), १८९(३), १९०, १९१(२), ३२४(५), ३२४(६), २२३, ३५१(२), ३५२, ३३३, ३७(१), १३५ अंतर्गत खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

खार पोलिसांनी स्वतः याप्रकरणी तक्रार केली आहे. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विजय सैद यांच्या तक्रारीवरून खार पोलिसांनी सोमवारी पहाटे याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार, पोलिसांच्या तीन मोबाईल व्हॅन घटनास्थळी पोहोचल्या असता स्टुडिओमध्ये कार्यकर्ते शिवसेना जिंदाबाद अशा घोषणा देत होते. त्यांनी तेथे जाऊन शो बंद केला. तसेच तेथील नागरिकांना बाहेर काढले. तेथील कार्यरत कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली व शिवीगाळ केली. लोकांना हॉटेलमधून बाहेर जाण्यासाठी सांगत असताना तेथे मोठा जमाव होता. त्यावेळी स्थानिक नेते राहुल कनालसह कार्यकर्त्यांची गर्दी होती, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena became aggressive over kunal kamras song on eknath shinde vandalizing khars unicontinental hotel mumbai print news sud 02