Mahim Dargah : राज ठाकरेंनी दाखवलेल्या ‘त्या’ व्हिडीओवर माहिम दर्गा ट्रस्टची प्रतिक्रिया; “ती जागा ६०० वर्षे जुनी, आम्ही तिथे…”

माहीम दर्गा ट्रस्टने राज ठाकरेंनी दाखवलेल्या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे ती जागा ६०० वर्षे जुनी असल्याचं म्हटलं आहे.

the site shown by raj thackeray is 600 years old will not build a dargah there first reaction of mahim dargah Trust
जाणून घ्या माहीम दर्गा ट्रस्टने नेमकं काय म्हटलं आहे?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात माहीमच्या समुद्रात अवैध दर्गा बांधला जात असल्याचा व्हिडीओ दाखवला. तसंच जर महिन्याभरात ते बांधकाम हटवलं गेलं नाही तर त्याच्या शेजारी सर्वात मोठं गणपतीचं मंदिर बांधू असाही उल्लेख केला. त्यानंतर आता या प्रकरणात माहीम दर्गा ट्रस्टची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

काय म्हटलं आहे माहीम दर्गा ट्रस्टने?

“राज ठाकरे यांनी मेळाव्यात ड्रोन व्हिडीओद्वारे दाखवलेली जागा ६०० वर्षे जुनी आहे. ती जागा ऐतिहासिक आहे. आम्ही त्या ठिकाणी दर्गा बांधणार नाही. ती जागा चिल्ला आहे, त्या ठिकाणी धार्मिक शिक्षण दिलं जात होतं” असं माहीम दर्गा ट्रस्टचे विश्वस्त सोहेल खंडवानी यांनी सांगितलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर त्या जागेच्या आजूबाजूला अवैध बांधकाम झालं असेल तर त्यावर सरकारने जरुर कारवाई करावी असंही सोहेल खंडवानी यांनी सांगितलं.

काय म्हणाले राज ठाकरे?
“महाराष्ट्रात अनधिकृतपणे उभ्या राहणाऱ्या गोष्टींकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं. सगळ्यांचं राजकारणाकडे लक्ष. पण दोन-अडीच वर्षांपूर्वी सुरू झालेली एक गोष्ट मला महाराष्ट्र सरकारला दाखवायची आहे. मी मध्यंतरी माहीमच्या बाजूला कुणाकडे तरी गेलो होतो. समोर समुद्रात मला लोक दिसले. काय ते समजेना. मग मी एकाला सांगितलं जरा बघ काय आहे ते. मग त्या माणसाने ड्रोनवरून शूट करून माझ्याकडे काही क्लिप्स आणल्या. आपण समाज म्हणून अशा गोष्टींकडे पाहात नाहीत. त्याकडे आपलं लक्ष जात नाहीत. तुमच्या भागांमध्येही तुमचं लक्ष असलं पाहिजे की आसपास काय घडतंय. या देशाची घटना मानणाऱ्या मुसलमानांना मला विचारायचंय की जे मी दाखवतोय, हे तुम्हाला मान्य आहे का?” असा सवाल राज ठाकरेंनी हा व्हिडीओ दाखवून उपस्थित केला.

काय आहे या व्हिडीओमध्ये?
हा व्हिडीओ माहीमसमोरच्या समुद्रातला असून तिथे एक अनधिकृत बांधकाम उभं राहिल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. व्हिडीओवरून ते बांधकाम म्हणजे कुणाचीतरी समाधी असल्याचं वाटत असून राज ठाकरेंनी या गोष्टीवर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. तसेच, राज्य सरकारला इशाराही दिला आहे.

“इथे मकदूम बाबाचा दर्गा आहे. त्याच्यासमोर समुद्रात अनधिकृतरीत्या उभं केलं गेलेलं ते बांधकाम आहे. त्याचे सॅटेलाईट फोटोही मी पाहिले आहेत. तिथे काहीही नव्हतं. माहीम पोलीस स्टेशन जवळ आहे. पण त्यांचं लक्ष नाही. महानगर पालिकेचे लोक फिरत असतात. पण त्यांनी पाहिलं नाही. दिवसाढवळ्या तुमच्या डोळ्यांसमोर समुद्रात नवीन हाजीअली तयार करत आहेत”, असं राज ठाकरे म्हणाले. मात्र आता या सगळ्यावर माहीम दर्गा ट्रस्टनेच प्रतिक्रिया दिली आहे. या ठिकाणी आम्ही दर्गा बांधणार नाही असं ट्रस्टने म्हटलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 08:10 IST
Next Story
“राज ठाकरेंचं भाषण म्हणजे…”, मनसे पाडवा मेळाव्यावर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया; म्हणे, “उद्धव ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय..!”
Exit mobile version