लोकसत्ता टीम

नागपूर : एप्रिल महिन्यात उन्हाच्या झळासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उन्हाळ्यात पावसाळ्यासारखी स्थिती निर्माण झाली. परंतु, अजूनही उन्हाळ्याचे दोन महिने शिल्लक असून नागपूर जिल्ह्यातील धरणातील जलसाठ्यात घट झाली आहे.

जिल्ह्यातील लघु, मध्यम आणि मोठ्या धरणातील जलसाठ्यात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी घट झाल्याचे दिसून येत आहे. तरीही अवकाळी पावसाची भर पडल्याने व पाणी वापर कमी झाल्याने मे आणि जूनमध्ये पाण्याचा तुटवडा भासण्याची शक्यता कमी असल्याचा सिंचन खात्याचा अंदाज आहे. नागपूर जिल्ह्यात १६ मोठे प्रकल्प आहेत. त्यामध्ये उपयुक्त जलसाठा २० एप्रिलपर्यंत १५०४.७८ दसलक्ष घनमीटर (दलघमी) एवढा होता. मध्यम प्रकल्प ४२ आहेत. त्यातील एकूण जलसाठा २७४.०८ दलघमी आहे. तर लघु प्रकल्प ३२५ असून त्यात एकूण उपयुक्त जलसाठा १९७.६७ दलघमी एवढा आहे.

आणखी वाचा-धक्कादायक! पोलीस भरतीचा सराव करताना २४ वर्षीय तरुणाचा ‘हार्टअटॅक’ने मृत्यू

मोठ्या प्रकल्पातून विविध शहरांना पाणीपुरवठा केला जातो. तसेच शेतीसाठी पाण्याचा वापर केला जातो. नागपूर शहराला तोतलाडोह येथून पाणीपुरवठा होतो. या धरणात ५८५.६० दलघमी जलसाठा आहे. जलसाठ्यात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी २० एप्रिलपर्यंत ८.७१ टक्क्यांनी घट झाली आहे. खिंडसी धरणात ६३.२७ दलघमी जलसाठा आहे. टक्केवारीचा विचार करता ६१.४३ टक्के पाणी आहे. गेल्यावर्षी या काळात ६८ टक्के जलसाठा होता.

वडगाव धरणातील जलसाठ्यात देखील गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी घट झाल्याचे दिसून येते. गेल्यावर्षी २० एप्रिलला ५०.३८ दलघमी जलसाठा (३८.७२ टक्के) होता. आता तो ३७.३५ टक्के आहे. नांद धरणात या कालावधीत मागील वर्षी १९.३५ टक्के पाणी होते आणि आता १०.०६ टक्क्यांवर आले आहे. कामठी खैरी धरणात ९२.१८ दलघमी म्हणजेच ६४.९२ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

आणखी वाचा-शासकीय रुग्णालयात दाखल रुग्णाने घेतलेल्या विषाचा प्रकार शोधणारी सुविधाच नाही!

ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसामुळे कुलरचा वापर कमी झाला आहे. तसेच इतर बाबींसाठीही पाण्याच्या वापरात घट झाली आहे. शिवाय पाण्याचे बाष्पीभवन देखील कमी झाले. त्यामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत कडक उन्हामुळे होणारी घट कमी होईल, असा अंदाज विदर्भ पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

अवकाळी पावसाची भर पडल्याने व पाणी वापर कमी झाल्याने मे आणि जूनमध्ये पाण्याचा तुटवडा भासण्याची शक्यता कमी असल्याचा सिंचन खात्याचा अंदाज आहे.

जलसाठयाची आता व गतवर्षीची स्थिती

धरणआत्ताची स्थितीगतवर्षीची स्थिती
तोतलाडोह ५७.५९ टक्के६६.३० टक्के
खिंडसी ६१.४३ टक्के६८.०० टक्के
वडगाव ३७.३५ टक्के३८.७२ टक्के
नांद १०.०६ टक्के१९.३५ टक्के