महेश बोकडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : राज्यात एकीकडे विजेची मागणी वाढत असतानाच दुसरीकडे महानिर्मितीच्या कोराडी वीजनिर्मिती प्रकल्पातील ६६० मेगावॅटच्या दोन संचात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे राज्यातील वीजनिर्मितीवर परिणाम झाला आहे. राज्यात शुक्रवारी (२ जून) दुपारी ४.३० वाजता विजेची मागणी २७ हजार ३० मेगावॅट होती. त्यापैकी राज्यात १६ हजार ४५८ मेगावॅट वीजनिर्मिती होत होती. केंद्राच्या वाट्यातून राज्याला १० हजार ३०३ मेगावॅट वीज मिळत होती. राज्यात तयार होणाऱ्या विजेपैकी महानिर्मितीच्या औष्णिक व गॅस वीजनिर्मिती प्रकल्पातून ६ हजार २७१ मेगावॅट, जलविद्युत प्रकल्पातून १,४९३ मेगावॅट वीज मिळत होती.

दरम्यान, अदानीकडून २,५१९ मेगावॅट, जिंदालकडून ८६६ मेगावॅट, रतन इंडियाकडून १,२५३ मेगावॅट आणि इतर असे मिळून खासगी कंपन्यांकडून राज्याला एकूण ७ हजार ४५० मेगावॅट वीज मिळत होती. सध्या कोराडीमध्ये ६६० मेगावॅटचे ३ आणि २२० मेगावॅटचा एक संच आहे. गुरुवारी ६६० मेगावॅटच्या दोन संचातील ‘ट्यूब लिकेज’ झाल्याने त्यातून वीजनिर्मिती थांबवून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे येथील वीजनिर्मिती सुमारे ८०० मेगावॅटने कमी झाली आहे.

हेही वाचा >>> नागपूर : संतापजनक! चाॅकलेटचे आमिष दाखवून तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार

येथे सध्या ६६० मेगावॅटचा एक आणि २२० मेगावॅटचा एक अशा दोन संचातून ६८१ मेगावॅट वीजनिर्मिती सुरू असल्याचे ‘स्टेट लोड डिस्पॅच सेंटर’च्या संकेतस्थळावरील माहितीतून पुढे आले आहे. कोराडीतील ६६० मेगावॅटच्या दोन वीजनिर्मिती संचात ‘ट्यूब लिकेज’ झाली आहे. त्यामुळे या संचांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले गेले आहे. परवापर्यंत दुरुस्ती पूर्ण होऊन संच कार्यान्वित होतील. इतर संचातून सुमारे ७२० मेगावॅट वीजनिर्मिती सुरू आहे. – विजय राठोड, मुख्य अभियंता, कोराडी (महानिर्मिती),

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Failure of two 660 mw power generating sets in koradi mnb 82 ysh