नागपूर : नोकरीचे आमिष देऊन मध्यप्रदेशच्या युवतीला वाडीत बोलावल्यानंतर तीन दिवस डांबून ठेवण्यात आले. गुलामाप्रमाणे वागणूक देत मार्केटिंगचे काम करण्याची बळजबरी करण्यात आली. ऐनवेळी भाऊ मदतीला धावून आल्याने तिची सुटका झाली. तक्रारीवरून वाडी पोलिसांनी तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पूनम तिवारी (२६) रा. जबलपूर, मध्य प्रदेश, अश्विनी शेंद्रे (२४) रा. मोहन टोला, आमगाव, गोंदिया आणि संजना ठाकरे (२२) रा. बालाघाट, मध्यप्रदेश अशी आरोपी महिलांची आहेत.
पीडित निकिता (२१) ही मध्यप्रदेशच्या खंडवा जिल्ह्यातील गोलखेडा येथील रहिवासी आहे. ती शिक्षण घेत असून नोकरीच्या शोधात होती. आकाश चौहान नावाच्या मित्राने नोकरीसंदर्भात तिचे अश्विनीसोबत फोनवरून बोलणे करून दिले. अश्विनीने मार्केटिंगचा व्यवसाय करीत असल्याचे सांगून तिला कार्यालयीन काम मिळवून देण्याची आश्वासन दिले. निकिताला वाडीतील कार्यालयात त्याने येण्यास सांगितले. त्यानुसार निकिता ३१ जुलैच्या मध्यरात्री वाडीत पोहोचली. संजना आणि अश्विनी तिला घेण्यासाठी बसस्थानकावर आल्या होत्या. वाडीतील सोनबानगरातील एका खोलीत झोपण्यास सांगितले.
हेही वाचा – खते, अवजारांवरील ‘जीएसटी’मुळे शेतीवर आर्थिक ताण
खोलीत बंद करून लावले कुलूप
दुसऱ्या दिवशी मार्केटिंग कंपनीच्या कार्यालयात असल्याचे निकिताला समजले. तिला ४ दिवसांच्या प्रशिक्षणानंतर नोकरी मिळेल, असे सांगण्यात आले, त्याचवेळी प्रशिक्षण शुल्क म्हणून २० हजार आणि राहण्याच्या व्यवस्थेसाठी अडीच हजार असे एकूण २२,५०० रुपये तिच्याकडून अग्रीम घेण्यात आले. मात्र, तिला मार्केटिंगच करावी लागणार असल्याचे ठणकावून सांगण्यात आले. तिने काम करण्यास नकार देऊन रुममध्ये परतली. काही वेळातच तिन्ही आरोपी महिला तिथे आल्या. शिविगाळ करीत तिला खोलीत बंद करून बाहेरून कुलूप लावून तिच्याकडील मोबाइलही हिसकावण्यात आला. तिला सायंकाळी एकचवेळ जेवण दिले जात होते.
भावाला पाठविले ‘लोकेशन’
२ ऑगस्टला तिला परत करून स्पीकरवरच कुटुंबीयांसोबत बोलण्याची सूचना केली. सोबतच इथल्या प्रकाराबाबत त्यांना न सांगण्याची धमकीही दिली गेली. निकिताने भावाला फोन केला. पण, तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. पण, प्रसंगावधान राखत तिने भावाला लोकेशन पाठवून दिले. दिवशी भाऊ तिचा शोध घेत वाडीत पोहोचला. बहिणीची सुटका करून तिला थेट वाडी पोलीस ठाणे गाठले. निकिताच्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १२७(३), ३५२, ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही कारवाई ठाणेदार राजेश तटकरे, पोलीस निरीक्षक राजेश खुणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अविनाश निकाळजे यांनी केली.
हेही वाचा – खते, अवजारांवरील ‘जीएसटी’मुळे शेतीवर आर्थिक ताण
गुन्हा दाखल, शोध सुरु
पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपींचे मोबाईल बंद असून तांत्रिक पद्धतीने लोकेशन मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वीसुद्धा आरोपींनी नोकरीचे आमिष दाखवून पीडितांकडून अडीच हजार रुपये वसूल केले. गयावया केल्याने त्यांच्यावर कारवाई झाली नाही. मार्केटींग कंपनी हरीयाणाची असून कार्यालय वाडीत आहे. कार्यालयात ५० पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात.
© The Indian Express (P) Ltd