लोकसत्ता टीम

नागपूर: राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्तीच्यावेळी भविष्य निर्वाह निधी मधील रक्कम प्राधिकृत करण्यासाठी अनेकदा विलंब होतो. ते टाळायचे असेल तर भविष्य निर्वाह निधीबाबत नोंद न झालेले क्रेडिट व अग्रीमाचे समायोजन करण्याचे आवाहन प्रधान महालेखाकार कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

राज्य शासनाचे वर्ग-४ चे कर्मचारी वगळता प्रधान महालेखाकार -२ कार्यालयाकडे कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीमधील लेखे ठेवले जातात. अशा कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह लेख्यांचे २०२३-२४ या वर्षा करिता वार्षिक विवरण या कार्यालयाच्या संकेतस्थळावर तसेच राज्य शासनाच्या सेवार्थ पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहे. कर्मचारी त्यांचे वार्षिक विवरण व मार्गदर्शिका या संकेतस्थळ व पोर्टलवर पाहू शकतात.

आणखी वाचा-गडचिरोली वन विभागात रोपवन लागवड घोटाळा; चातगाव वनपरीक्षेत्र अधिकारी पडवे निलंबित

प्रधान महालेखाकार कार्यालयामधून कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्यात भविष्य निर्वाह निधी लेख्यामध्ये जमा अभिदान तसेच त्यांना दिलेली अग्रीम राशी, भविष्य निर्वाह निधीच्या अंतिम आहारणाच्या आवेदनाची प्राप्ती व प्राधिकृत होण्याबाबतचा मोबाईल संदेश प्राप्त होतो. त्यासाठी राज्य शासनाच्या १७ मे २०१९ च्या अधिसूचनेनुसार सर्व कर्मचाऱ्यांना प्रधान महालेखाकार कार्यालयात मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करणे आवश्यक आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी मोबाईल क्रमांक नोंदणीकृत केला नसेल त्यांनी fm.mh2.ae@cag.gov.in या ई-मेलवर किंवा पत्राद्वारे संपूर्ण नाव, भविष्य निर्वाह निधी लेखा क्रमांक, व सेवार्थ आयडीसह पाठविण्याचे आवाहन या कार्यालयाने केले आहे.

भविष्य निर्वाह निधी विवरणपत्र तसेच सेवार्थ प्रणालीमध्ये कर्मचाऱ्यांचे नाव व जन्मतारीख तपासून घेण्याचे व त्यात तफावत आढळ्यास सेवार्थ प्रणालीत सुधारित करुन आहरण व संवितरण अधिकाऱ्याद्वारे या कार्यालयास दुरुस्तीसह gpfpakrarngp@gmail.com वर पाठवावा असेही सांगण्यात आले आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या मासिक अभिदानाची राशी अथवा घेतलेल्या अग्रिम भविष्य निर्वाह निधी लेख्यात नोंद झाली नसल्यास आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या माध्यामातून कोषागाराकडे पाठविण्याचेही सांगण्यात आले आहे.

आणखी वाचा-MNS Activist Jay Malokar Death: मनसैनिक जय मोलाकारच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी? संतप्त नातेवाईकांकडून कारवाईची मागणी

राज्य शासनाच्या सेवेतून निवृत्त झाल्यावर भविष्य निर्वाह निधीची राशी त्यांना वेळेत मिळावी म्हणून केंद्र व राज्य शासनाकडून वेळोवेळी प्रयत्न केले जातात. अनेकदा काही तात्रिक कारणांमुळे किंवा कर्मचाऱ्यांकडून वेळेत आवश्यक माहिती सादर न केल्यामुळे भविष्य निर्वाह निधी मिळण्यास विलंब होतो. तो टाळावा म्हणून प्रधान महालेखाकार कार्यालयाने वरील आवाहन केले आहे. त्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचा लाभ कर्मचाऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अनेक कर्मचाऱ्याच्या मोबाईल क्रमांकाची नोंद भविष्य निर्वाह निधी कार्यालयात नोंदवले नसल्याने त्यांना त्यांच्या खात्यात जमा झालेले अंशदान माहिती पडत नाही. त्यामुळे मोबाईल क्रमांकाची नोंद करण आवश्यक आहे.