बुलढाणा : पडणारा पाऊस मौसमी की पूर्वमोसमी ही निरर्थक चर्चा रंगली असतानाच जिल्ह्यात जून महिन्याअखेरीसही लाखो हेक्टरवरील खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील पाणी टंचाईचा मुक्काम कायम असून धरणातील जलसाठा चिंताजनक असल्याचे धक्कादायक आणि गंभीर चित्र आहे.

अर्थकारण कृषी क्षेत्रावर अवलंबून असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील खरीप पिकाखालील क्षेत्र साडेसात लाख हेक्टर च्या आसपास आहे. दमदार पाऊस वेळेवर म्हणजे जून मध्यापर्यंत आला आणि तो नियमित असला तर हे क्षेत्र ७.४० लाख ते ७.५० लाख हेक्टर पर्यंत जाते. मात्र यंदा जून संपत आला तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा आदी तालुक्याचे आजवरचे पर्जन्यमान १०० मिलिमीटर च्या आसपास असले तरी ते अवकाळी आणि सध्याच्या पावसाचे मिळून आहे. त्यामुळे आज १८ जून अखेरीस केवळ ४२ हजार हेक्टर वर पेरण्या झाल्या आहे. झालेल्या पावसावर अवलंबून शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याचा धोका पत्करला आहे. मात्र जिल्ह्यातील खरिपाचे व्यापक पेरा क्षेत्र लक्षात घेतले तर त्या तुलनेत झालेल्या पेरणीची टक्केवारी पाच ते सहा टक्केच्या आसपास इतकीच आहे. यापरिणामी साडेसहा लाख ते पावणे सात लाख हेक्टरवरील पेरण्या दमदार आणि नियमित पावसाभावी रखडल्याचे भीषण चित्र आहे. जिल्ह्यातील साडेपाच लाख शेतकरी यामुळे हवालदिल झाले असून त्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.

आणखी वाचा-ऊर्जामंत्र्यांच्या जिल्ह्यातच स्मार्ट मीटरविरोधी आंदोलन तीव्र होणार… उद्या ठरणार पुढची दिशा…

पावणे चार लाख ग्रामस्थांची ससेहोलपट

आजही पावणेचार लाख ग्रामस्थांची तहान टँकर आणि खाजगी अधिग्रहित विहिरीद्वारे भागविली जात आहे. तीन महिन्यांपासून मानगुटीला बसलेल्या या टंचाई मुळे लाखो ग्रामस्थ हवालदिल झाले असून दमदार पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.

मागील काही दिवसापासून पाऊस अधूनमधून हजेरी लावत आहे. मात्र तो ना पेरणीलायक आहे ना पाणी टंचाईची तीव्रता कमी करणारा आहे. या परिणामी जिल्ह्यातील तेरा पैकी आठ तालुक्यातील पाणी टंचाईचे ग्रहण कायम आहे. जून अखेरीसही जिल्ह्यातील ७ तालुक्यातील ७४ गावांना ८० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामुळे २ लाख २० हजार ८२९ ग्रामस्थांचे यामुळे त्यांचे बेहाल होत आहे. त्यांच्यावर दूरवर भटकंती करण्याची दुदैवी वेळ आली आहे. दुसरीकडे ८ तालुक्यातील २६७ गावांना ३२२ अधिग्रहित खाजगी विहिरीद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्या वर आपली तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे कमीअधिक पावणेचार लाख ग्रामस्थांची ससेहोलपट जून अखेरीस देखील कायम आहे.

आणखी वाचा-कमरेला पिस्तूल खोचले, पोलीस येताच जोरात ओरडला आणि…

धरणे कोरडी होण्याच्या मार्गावर

वेगाने होणारे बाष्पीभवन आणि अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणे कोरडी पडण्याच्या मार्गावर आहे. मोठ्या प्रकल्प पैकी खडकपूर्णा मध्ये शून्य टक्के जलसाठा उपलब्ध आहे. नळगंगा धरणात २४.४० टक्के तर पेनटाकळी धरणात ११.६० टक्केच जलसाठा उरला आहे. मध्यम सिंचन प्रकल्पांची देखील अशीच गत आहे. तोरणा (०.४९ टक्के), पलढग ( २.१६ टक्के), मस (४), कोराडी( २.३६), मन ( ३.६९), उतावळी (३.३५) या धरणातील जलसाठ्याची टक्केवारी चिंताजनक अशीच आहे.