नागपूर : जिभेचे चोचले फक्त माणसांचेच पुरवले जात नाहीत, तर प्राण्यांचेही पुरवले जातात. याचा प्रत्यय गुरुवारी वनखात्याला आला. एकतर या बिबट्याने त्याचा नैसर्गिक अधिवास सोडून कोराडीच्या महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या वसाहतीत मुक्काम ठोकला. त्याने येऊन परत जावे म्हणून वनखात्याने त्याला कोंबडीचे आमिष दाखवले, पण कोंबडीवर ऐकेल तो बिबट कसला? शेवटी खात्याच्याच ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राने त्याला बकरीची मेजवानी दिली आणि केंद्राच्या या आमिषाला तो बळी पडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोराडी येथील महानिर्मिती विभागाच्या विद्युत विहार वसाहतीत फिरणाऱ्या बिबट्याला सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राच्या चमुने जेरबंद केले. गेल्या चार महिन्यापासून हा बिबट या वसाहतीत होता. रात्रीच्यावेळी त्याच्या वसाहतीतील वावर वाढला होता. महानिर्मितीच्या वसाहतीत ठाण मांडून बसलेल्या बिबट्याने आजपर्यंत वसाहतीतील कोणत्याही नागरिकावर हल्ला केला नव्हता. मात्र, विद्युत विहार प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या भिंतीवर हा बिबट सतत येऊन बसत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. सायंकाळनंतर घराबाहेर पडण्यासही नागरिक घाबरत होते. यानंतर वनविभागाचे पथकही बिबट्यावर लक्ष ठेवून होते. मात्र, या पथकालाही बिबट गवसला नाही. दरम्यान, सेमिनरी हिल्सवरील प्रादेशिक वनविभागाच्या अखत्यारितील ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राच्या चमुने राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य कुंदन हाते यांच्या नेतृत्वात गुरुवार, पाच डिसेंबरला रात्री आठ वाजता बिबट्याच्या संभाव्य भेटीच्या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला. पिंजऱ्यात बिबट्यासाठी शिकार लावण्यात आली. रात्री ८.३० वाजता शिकार पाहिल्यानंतर पिंजऱ्यात प्रवेश करताच त्याला जेरबंद करण्यात आले. अवघ्या अर्ध्या तासात बिबट पिंजऱ्यात जेरबंद झाला. त्यानंतर ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राच्या चमुने त्याला तात्काळ केंद्रात नेले.

हेही वाचा…हे काय चाललेय नागपुरात? पंचनामा करायला गेलेल्या पोलिसावरच हल्ला….

याठिकाणी त्याची प्राथमिक तपासणी करण्यात आली. त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वैद्यकीय तपासणीनंतर तो शारीरिकदृष्ट्या निरोगी असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याला शुक्रवारी त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. हा बिबट गेल्या सहा महिन्यांपासून कोराडीमागील जंगलातील झोपडीत फिरताना दिसत होता. तर गेल्या चार महिन्यापासून तो महानिर्मितीच्या वसाहतीत देखील दिसत होता. त्याला जेरबंद करुन जंगलात सोडल्यामुळे कोराडी विद्युत विहार वसाहतीतील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. ही कारवाई प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंग हाडा यांच्या मार्गदर्शनात डॉ. राजेश फुलसुंगे, प्रतीक घाटे, हरीश निमकर, वनरक्षक बंडू मंगर, विलास मंगर, चेतन बारस्कर, आशिष महल्ले, सौरभ मंगर, खेमराज नेवारे यांनी यशस्वी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The forest department caught leopard by offering goat after it rejected chicken rgc 76 sud 02