नाशिक : शिवशाहीचा साक्षीदार असलेल्या बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ल्याचे केंद्र सरकारने युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या २०२४-२५ वर्षाच्या प्राथमिक यादीत नामांकन केले आहे. युनेस्कोची समिती पाहणीसाठी येणार असल्याने जिल्हा प्रशासन व पुरातत्व विभागाने साल्हेर परिसरात तयारीला वेग दिला आहे.

राज्य पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालय आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांनी भारतातील मराठा सैन्याच्या स्थापत्यकलेचा आविष्कार गटात राज्यातील ११ किल्ल्यांचा प्रस्ताव सादर केला आहे. समितीच्या पाहणीनंतर जागतिक वारसा स्थळ म्हणून ते घोषित केले जाऊ शकतात. मध्यंतरी दिल्लीत या किल्ल्यांच्या प्रतिकृतींद्वारे प्रदर्शनातून माहिती समितीसमोर सादर करण्यात आली होती. हे सर्व किल्ले एकतर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले अथवा लढाईत जिंकलेले आहेत. समितीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक अमोल गोटे आणि इतर अधिकाऱ्यांनी साल्हेरला भेट दिली.

हे ही वाचा…नाशिक : अपंगांसाठी जिल्हाधिकारी तळमजल्यावर

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश होण्याचे महत्व, त्यामुळे येणारी जबाबदारी याची माहिती स्थानिक ग्रामस्थांना देण्यात आली. या वारसास्थळात निवड होण्यासाठी स्वच्छता, किमान सोयी-सुविधा, स्थळांशी नागरिकांचे बंध, अशा अनेक निकषांवर मूल्यमापन केले जाते. त्या अनुषंगाने प्रशासनाने महावारसा समिती, स्मारक समितींची स्थापना केली आहे. लोकसहभागातून महास्वच्छता अभियान, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने जनजागृती, चित्रकला, निबंध स्पर्धा, असे विविध उपक्रम वर्षभर राबविले जाणार असल्याचे गोटे यांनी सांगितले.

हे ही वाचा…नाशिक :काँग्रेस सेवादलातर्फे स्मार्ट सिटीच्या कामांविरोधात आंदोलन

साल्हेरचे महत्व

बागलाण तालुक्यातील डोलाबारी डोंगर रांगेवर समुद्रसपाटीपासून ५१४१ फूट उंचीवर साल्हेर किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बागलाण मोहिमेत हा किल्ला स्वराज्यात दाखल झाला. मराठा सैन्याने मोगलांविरुद्धची खुल्या मैदानातील जिंकलेली पहिली लढाई म्हणून इतिहासात साल्हेरची लढाई प्रसिद्ध आहे. सुरत लुटीच्या वेळी शिवाजी महाराज साल्हेरजवळून गेल्याचे संदर्भ काही ग्रंथात आहेत. साल्हेर किल्ल्याच्या माथ्यावरून परिसरातील मोरा-मुल्हेर, रतनगड, हरगड, पिंपळा यांसारखे अनेक किल्ले दिसतात. जैन धर्मीयांचे तीर्थक्षेत्र असलेले मांगी-तुंगी येथून दिसते.