नाशिक : शहरात कडाक्याच्या थंडीने मुक्काम ठोकला असून घसरणाऱ्या तापमानाने शनिवारी ८.९ अंश ही हंगामातील नीचांकी पातळी गाठली. निफाडच्या कृषी विज्ञान केंद्रात या दिवशी आठ अंशाची नोंद झाली. मागील आठ वर्षात नोव्हेंबरमधील शनिवार हा शहरातील सर्वात थंड दिवस ठरला. याआधी २०१६ मध्ये नोव्हेंबर महिन्यात ८.८ अंशाची नोंद झाली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नोव्हेंबरच्या मध्यानंतर तापमानात बदल होऊन पंधरवड्यात तापमान जवळपास आठ अंशांनी कमी झाले आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव स्थानिक वातावरणावर पडतो. एरवी डिसेंबर, जानेवारीत कडाक्याच्या थंडीची अनुभूती मिळते. यंदा नोव्हेंबरमध्ये तशी स्थिती निर्माण झाली आहे. सोमवारपासून घटणाऱ्या तापमानाची श्रृंखला शनिवारी कायम राहिली. सलग पाचव्या दिवशी पारा खाली उतरला. आदल्या दिवशीच्या तुलनेत तापमानात १.७ अंशांनी घट होऊन ते ८.९ या नीचांकी पातळीवर आले. हवामानशास्त्र विभागाच्या नोंदीनुसार मागील आठ वर्षात नोव्हेंबरमधील हे सर्वात नीचांकी तापमान आहे. सर्वत्र कमालीचा गारठा पसरला आहे. दिवसाही तो जाणवतो. थंडीमुळे जॉगिँग ट्रॅक व व्यायामशाळेत गर्दी वाढली आहे. सकाळी उबदार कपड्यांशिवाय बाहेर पडता येत नाही. ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. ग्रामीण भागात थंडीची तीव्रता अधिक आहे.

हेही वाचा…समाज माध्यमात विधानसभा निवडणूक निकालाआधी आलेले आकडे आणि निकालानंतरच्या आकड्यांमध्ये साम्य कसे ?

हवामानशास्त्र विभागाच्या नोंदीनुसार ११ नोव्हेंबर २०१६ रोजी शहरात ८.८ या नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. त्यापुढील (२०१७) वर्षात नोव्हेंबर महिन्यात पारा १०.२, २०१८ मध्ये १०.८, २०१९ मध्ये १३.८, २०२० वर्षात १०.४, २०२१ मध्ये १२.२, २०२२ मध्ये ९.२ अंश आणि गेल्या वर्षी (२०२३) नोव्हेंबरमध्ये तापमान १४.१ या नीचांकी पातळीवर गेले होते. याचा विचार करता गेल्या आठ वर्षात शनिवार हा सर्वात थंड दिवस ठरला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cold winter gripped city with temperatures dropping to 8 9 degree on saturday sud 02