नाशिक – जिल्ह्यात सततच्या वादळी पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. मंगळवारीही शहरात पाऊस सुरू राहिल्याने ठिकठिकाणी झाडांची पडझड झाली. पावसामुळे विजेचा लपंडाव दिवसभर सुरू राहिला. सोमवारी देवळाली गाव येथे राजवाडा परिसरातून सातपूर येथील कंपनीत कामाला जाणाऱ्या युवकाच्या चालत्या दुचाकीवर झाड कोसळल्याने गौरव रिपोर्ट आणि सम्यक भोसले या दोघांचा मृत्यू झाला.

झाड पडण्याची मालिका मंगळवारीही सुरु राहिली. रस्त्यावरील एक मोठे झाड उन्मळून पडत असल्याचे पाहून रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांनी त्वरीत वाहनांमधून उड्या मारल्याने जीवितहानी टळली. झाडाखाली दोन मोटारींसह रिक्षा दाबली गेली. यामुळे रस्त्यावरील वाहतूकही थांबली. अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांनी पडलेले झाड करवतीच्या सहाय्याने कापून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.

दरम्यान, सिटी सेंटर मॉल परिसरातील उषाकिरण सोसायटी, कॅनडा कॉर्नरजवळील रोहित्र, आर.डी. सर्कल येथेही झाडे पडली. याशिवाय शहरात ठिकठिकाणी गुलमोहर, निलगिरी, शिसम, अशोक यासह अन्य काही झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्याने वाहतूक कोंडी झाली. रस्त्यावर पावसामुळे दाणादाण असतांना शहरात ठिकठिकाणी विजेचा लपंडाव सुरू राहिला.