नाशिक :देवळा तालुक्यातील दहिवड येथील धबधब्याजवळ मालेगाव येथील एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. देवळा पोलीस ठाण्यात या मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
गुरुवारी दुपारी मालेगाव येथील काही जण देवळा तालुक्यातील दहिवड आणि चिंचवे गावाच्या सरहद्दीवरील चोरचावडी धबधबा पाहण्यासाठी गेले होते. त्यातील काही तरुण हे धबधब्याजवळील डोहात पोहण्यासाठी उतरले.

हे ही वाचा…नाशिक शहरातील खड्डे दुरुस्तीची मनपा आयुक्तांकडून पाहणी

राहुल काळे (१८, रा. गवळीवाडा, मालेगाव कॅम्प) याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. देवळा पोलिसांनी घटनास्थळी हजर होत शोधकार्य सुरू केले. सायंकाळी उशिरा मालेगाव येथील अग्निशमन दलाचे जवान व स्थानिकांना राहुलचा मृतदेह सापडला. मृतदेह मालेगाव येथे विच्छेदनासाठी पाठविण्यात आल्याची माहिती देवळा पोलिसांच्या वतीने देण्यात आली. चार वर्षांपूर्वी याच ठिकाणी वडाळीभोई येथील तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेची स्थानिकांना यामुळे आठवण झाली