नवी मुंबई: नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी भागात असलेल्या खदानच्या पाण्यात पोहण्यास उतरलेल्या हिमांशू उल्हास म्हात्रे या युवकाचा मृत्यू झाला आहे. हिमांशू हा नवी मुंबई शिवसेना माजी जिल्हाध्यक्ष हरिभाऊ म्हात्रे यांचा नातू होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रविवार सुट्टी असल्याने हिमांशू हा आपल्या काही मित्रांच्या समवेत पावसाचा आनंद घेण्यासाठी तुर्भे एमआयडीसी परिसरातील गणपती मंदिराजवळ, गणपती पाडा, इंदिरा नगर, येथे गेला होता. संध्याकाळी यातील काही मित्र खदानमध्ये पोहण्यास उतरले होते. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास हिमांशू दिसत नसल्याचे लक्षात आल्यावर मित्रांनी याबाबत पोलिसांना कळवले. तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी तात्काळ ही माहिती आपत्ती व्यवस्थापन यांना देत एक पथक घटनास्थळी रवाना केले. मात्र काल रात्री हिमांशूला शोधण्यात यश आले नाही. त्यामुळे आज सकाळी आपत्ती प्रतिसाद दलाने (टीडीआरएफ) पुन्हा शोधमोहीम हाती घेतली. त्यात हिमांशू सापडला, त्याला बाहेर काढण्यात यश आले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता, अशी माहिती रवींद्र दौंडकर यांनी दिली.

हेही वाचा – नवी मुंबई: एनएमएमटीची फुकट्या प्रवाशांकडून २.८ लाख दंड वसूली

हेही वाचा – नवी मुंबई: हार्बर लोकल विस्कळीत; ट्रॅकला तडा, १५-२० मिनिटांनी लोकल उशिरा

हिमांशू हा नवी मुंबई शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष हरिभाऊ म्हात्रे यांचा नातू होता. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून आम्ही सर्व शिवसैनिक म्हात्रे कुटुंबियांच्या दुःखात पाठीशी आहोत, अशी भावना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे बेलापूर अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी व्यक्त केली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death of a youth who went down to swim in the mine water in turbhe midc area of navi mumbai ssb