“शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटतो”, राज ठाकरेंच्या टीकेवर जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले “तुमच्या डोक्यात…”

शरद पवार यांना औरंगजेब सुफी संत वाटतो या राज ठाकरेंच्या आरोपाला जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलंय.

Jitendra Awhad Raj Thackeray 3
जितेंद्र आव्हाड व राज ठाकरे (संग्रहित छायाचित्र)

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी (२२ मे) पुण्यातील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना औरंगजेब सुफी संत वाटतो असा आरोप केला. यावर आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय. शरद पवार औरंगजेबाला कधीही सुफी संत म्हटले नाही, असं जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं. तसेच राज ठाकरेंच्या डोक्यात घुसवलेला पुरंदरेंचा इतिहास त्यांच्या तोंडातून बाहेर येतो आहे, असं मत व्यक्त केलं. ते नवी मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “शरद पवार औरंगजेबाला कधीही सुफी संत म्हटले नाही. शरद पवार यांना काय वाटतं हे राज ठाकरे यांनी ठरवू नये. तुम्हाला काय वाटतं हे सांगा. त्यांच्या डोक्यात घुसवलेला पुरंदरेंचा इतिहास तोंडातून बाहेर येतो आहे. त्या इतिहासावर आता महाराष्ट्राचा विश्वास नाही.”

“राज ठाकरे तीन सभांच्या ठिकाणी छत्री घेऊन उभे होते का?”

पावसात भिजण्यावरून राज ठाकरेंनी शरद पवारांवर साधलेल्या निशाण्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, “राज ठाकरे यांनी पहिली सभा पाडव्याच्या दिवशी घेतली. तेव्हा ते छत्री घेऊन उभे होते का? त्यानंतर तीन सभा झाल्या त्या ठिकाणी ते छत्री घेऊन उभे होते का? पावसाचं वातावरण अजूनही तयार झालेलं नाही. त्यामुळे ते मुद्दे शोधताना किती मोठी चूक करून बसतो याचं हे उदाहरण आहे.”

“सभेला गर्दी होणार नाही त्यामुळे राज ठाकरेंनी पळवाट काढली”

“सध्या पावसाळ्याचे दिवसच नाही. तुम्हाला माहिती होती की सभेला गर्दी होणार नाही त्यामुळे पळवाट काढली,” असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.

“राज ठाकरे महाराष्ट्राच्या मातीतील एक चांगला वक्ता”

जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंच्या वक्तृत्वाबद्दल कौतुक करत ते लवकर बरे होण्याची प्रार्थनाही केली. ते म्हणाले, “राज ठाकरेंनी अयोध्येला जावं, द्वारकेला जावं, कुठेही जावं. आम्हाला त्याबद्दल काहीही करायचं नाही. त्यांनी जे कारण दिलंय की तब्येत बरी नाही. ते महाराष्ट्राच्या मातीतील एक चांगला वक्ता आहे.”

हेही वाचा : वाशीतील वृक्षतोडीला आव्हाड यांचा विरोध; कत्तल रोखण्याचे आदित्य ठाकरेंना आवाहन

“राज ठाकरेंना लवकर आराम पडो हीच मी देवाचरणी प्रार्थना”

“ते चांगलं भाषण करतात. त्यांच्यात आणि माझ्यात मुद्द्यांमध्ये मतभेद असू शकतात, पण त्यांच्या वक्तृत्वकलेबद्दल माझ्या मनात शंका नाही. ते चांगले वक्ते आहेत. त्यांना लवकर आराम पडो हीच मी देवाचरणी प्रार्थना करेल,” असंही आव्हाड यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jitendra awhad answer raj thackeray over aurangjeb remark about sharad pawar pbs

Next Story
वाशीतील वृक्षतोडीला आव्हाड यांचा विरोध; कत्तल रोखण्याचे आदित्य ठाकरेंना आवाहन
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी